बातम्या

दहावीत 100% मिळवणाऱ्या स्नेहल कांबळेला अमेरिकेला जाऊन शिकायचे आहे बायोटेक्नोलॉजी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये नांदेड येथील शारदा भुवन शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल मारोतीराव कांबळे हिने दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिच्या या यशाचे राज्यभरातून कौतुक होत आहे.

स्नेहलचे वडील किनवट तालुक्यातील एका शासकीय आश्रम शाळेत शिक्षक आहेत. तर आई गृहिनी आहे. काल निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावर स्नेहल कांबळेचा मार्कशीट व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्यभरातून तिच्या यशाचे कौतुक होत आहे.

राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे (आयएएस) यांनी आज स्नेहल कांबळे आणि तिच्या पालकांशी संवाद साधून कौतुक केले. तसेच स्नेहलला पुढे काय शिक्षण घेणार असे विचारले? ती म्हणाली बायोटेक्नोलॉजी मध्ये करिअर करण्यासाठी अमेरिकेला जाण्याची इच्छा असल्याचे म्हटले. त्यानंतर डॉ.कांबळे यांनी स्नेहलला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यासोबत पुढे अमेरिकेतील शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती करणार असा शब्द दिला.

बाबासाहेबांमुळेच प्रेरणा मिळाली

माझे वडील शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक वातावरण होते त्यामुळे मला अभ्यासाची आवड निर्माण झाली होती. माझ्यावर कोठेही दडपण नव्हते. हसत खेळत अभ्यास केला होता. पण रेगुलर रोज 10 ते 12 तास अभ्यास करायची. मला सोशल ऍक्टिव्हिटीसची आवड असून नेतृत्व करायला आवडते. घरूनच मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलची माहिती मिळली आणि अभ्यासाची प्रेरणा मिळाली. त्यांच्याप्रमाणेच अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेऊन भविष्यात समाज घडवण्यासाठी कार्य करायचे आहे. तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी जे कष्ट घेतले त्यामुळेच आज मी यशस्वी होऊ शकले. असे धम्मचक्र टीमशी बोलताना स्नेहल म्हणाली.