आंबेडकर Live

…म्हणून बाबासाहेबांनी निजामाच्या प्रलोभनांना नकार देत इस्लामचा मार्ग नाकारला

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली. त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी घोषित केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली.

बाबासाहेब हिंदू धर्म त्याग करून दुसर्या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार या बातमीमुळे अनेक धर्मांच्या धर्मगुरूंना मोठी संधी आयती चालून आल्याने आनंद झाला. या धर्मगुरूनी बाबासाहेबांनी आपल्या धर्मात यावे यासाठी अनेक आघाड्या उघडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालू केले. अशा धर्मगुरूंकडून राजगृहावर देश विदेशांतून पत्रांचा व तारांचा वर्षाव झाला होता.

बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रूपये देण्याचे कबूल केले होते. परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.

मुस्लिम धर्मातील विधिमंडळाचे एक सदस्य गौबा यानी बाबासाहेबांना तार केली. निजामाच्या राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरू बाबासाहेबांना भेटण्यास आले. बाबासाहेबानी इस्लाम स्वीकारल्यास हैद्राबाजच्या निजामांकडून कशी पैशाच्या सुविधांची बरसात केली जाईल याचा पाढा वाचला. त्याचबरोबर अस्पृश्यांनी इस्लाम स्वीकारल्यास त्यांच्या केसालाही हात लावण्यास हिंदूंचा कसा थरकाप उडेल हे बाबासाहेबांना ठासून सांगण्यात आले. अस्पृश्यांना हिंदूंच्या छळातून मुक्त करण्याचा खरेतर हा सोपा मार्ग होता.

बौद्धिक पातळीवर मोठी मजल मारायची होती
पण बाबासाहेबांना अस्पृश्यांची फक्त हिंदूपासून मुक्ती करावयाची नव्हती तर त्यांना समतेची वागणूक मिळवून देण्याबरोबरच सर्व आघाड्यावर स्त्री व पुरुष यांचा वैयक्तिक पातळीवरही मोठा बदल घडवून आणावयाचा होता. शैक्षणिक क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिक पातळीवर मोठी मजल मारायची होती. ज्ञानाच्या जगात गरुडझेप घ्यावयाची होती. बाबासाहेबांनी मनोधैर्य एकवटून निजामाच्या प्रलोभनांना नकार दिला व इस्लामचा मार्ग नाकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *