ब्लॉग

म्हणून…सम्राट अशोका सर्वच बाबतीत सिकंदराहून श्रेष्ठ!

अशोकाचे त्या काळी ज्ञात असलेल्या जगाच्या भू- भागापैकी, सर्वात मोठ्या आणि पूर्व-पश्चिम सलग अशा सात हजार किमीपेक्षाही अधिक भू- भागावर वर्चस्व असून, त्या प्रदेशावर अशोकाचा एकछत्री असा अंमल होता. जगज्जेत्या सिकंदराने जरी ग्रीस पासून भारतापर्यंतची राज्ये जिंकून घेतली असली तरी ती एकसलग अशी नव्हती, तर त्याच्या प्रवासात त्याच्या मार्गात येणारी राज्येच त्याने जिंकली. केवळ तेवढ्याणेच सिकंदराला जगज्जेता म्हणने हे माझ्या दृष्टीने बरोबर ठरत नाही.

सिकंदराने जिंकलेल्या प्रदेशावर आपली शासनव्यवस्था लादणे हे त्या सिकंदराला कधीही शक्य झाले नाही. जिंकून घेतलेले राज्ये, अथवा प्रदेश त्याच्या ताब्यातही काही राहीले नाहीत, कारण सिकंदर परत जाताक्षणीच त्या प्रदेशांवर सिकंदराने नेमलेल्या अधिकार्यांशी चिवटपणे लढून ते प्रदेश ज्यांचे त्यांनी परत मिळवले. त्याही पेक्षा शोकांतिका अशी, की वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी सिकंदराचा भारतीय भूमीवरच भारतीयांशी लढतांना झालेल्या जखमा चिघळून मृत्यू झाला. अन् त्याचे साम्राज्य त्याच्याच तीन सेनापतींनी आपापसातच वाटून घेतले . ईजिप्त टोलेमी फिलाडेल्फीयसने घेतला. टर्की एंटियोकस् ने लुबाडला, पर्शिया सेल्युकस निकेटरने बळकावला.

सिकंदराकडे शौर्य, पराक्रम व धाडस जरूर होते, परंतु त्याच्याजवळ प्रशासकीय दूरदृष्टी मात्र अजिबात नव्हती. सम्राट अशोक मात्र, या बाबतीत सिकंदराहून सर्वच बाबतीत श्रेष्ठ होता. जगात सर्वात प्रथम व सर्वश्रेष्ठ असे प्रशासन अशोकानेच लागू केले. जगातील सर्वात मोठे मंत्रिमंडळही अशोकाचेच होते. निरनिराळ्या खात्यांचे तब्बल ५०० मंत्री अशोकाच्या मंत्रीमंडळात होते, आणि हा कदाचित जागतिक पातळीवरील विक्रमही ठरु शकतो.

अफगाणिस्तानापासून तर नेपाळपर्यंत आणि काश्मिरपासून म्हैसूरपर्यंत ठिकठिकाणी सापडलेले त्याचे कोरीव लेख म्हणजेच संपूर्ण जगातील पहिले लिखित स्वरूपात असलेले ‘संविधानच’ मानावे लागेल. सार्वजनिक आरोग्य, पशूवैद्यक,सार्वजनिक बांधकाम, न्यायपालिका,पाटबंधारे विभाग, परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापार, साक्षरतेचे प्रमाण,स्त्री-पुरुष समानता,सुसज्ज सैन्यदले व प्रभावी गुप्तचर यंत्रणा, केलेली अनेक लोकोपयोगी कामे यामुळे तो सर्वांनाच प्रिय होता.

मौर्य साम्राज्याच्या १३५ वर्षाच्या कालखंडात या ‘जंबुद्वीपाकडे ‘ साधी नजरही वर करून पाहण्याची जगात कुणाचीच हिंमत नव्हती. अशोक सिकंदरहून सर्वच बाबतीत श्रेष्ठ होता. खरा जगज्जेता तोच होता. कारण, तथागताच्या धम्माचा ‘ धम्मविजय ‘ त्याने जगावर मिळविला,आणि तीच खरी त्याची महानता होती.

लेखक -अशोक नगरे
मोडी लिपी तज्ज्ञ, धम्मलिपी ब्राह्मी, बौद्ध लेणी, बौद्ध शिल्पकला – चित्रकला, बौद्ध स्थापत्य, बौद्ध पुरातत्व व बौद्ध इतिहास अभ्यासक,
पारनेर, अहमदनगर.

5 Replies to “म्हणून…सम्राट अशोका सर्वच बाबतीत सिकंदराहून श्रेष्ठ!

Comments are closed.