इतिहास

म्हणून भगवान बुद्ध म्हणतात ‘माझ्या धम्मात कसलीही सक्ती नाही’

ज्यावेळी भगवान बुद्धांवर सुखी गृहस्थजीवन उद्ध्वस्त करण्याचा आरोप होऊ लागला त्यावेळी तथागतांनी दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे. हे उत्तर आजच्या काळात सुद्धा लागू होते.

मगध देशातील अनेक कुलपुत्र तथागताचे अनुगामी होत आहेत हे पाहून काही लोक क्रोधित झाले. असंतुष्ट झाले आणि म्हणू लागले.” श्रमण गौतम हा मातापित्यांना अपत्यहीन होण्यास कारण आहे. श्रमण गौतम हा भार्यांच्या वैधव्याला कारण आहे. श्रमण गौतम हा कुटुंब उद्ध्वस्त होण्यास कारण आहे.”

“त्याने एक सहस्त्र जटिलांना दीक्षा दिली. त्याने संजयाचे अनुयायी असलेल्या अडीचशे परिव्राजकांना दीक्षित केले आणि मगधचे अनेक कुलपुत्र श्रमण गौतमाच्या अधीन पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत. पुढे काय होणार कोणीही सांगु शकत नाही.” आणि एवढेच नव्हे तर जेव्हा लोकांच्या दृष्टीस भिक्खू पडतात तेव्हा त्यांना असे म्हणून चिडवितात की, “महाश्रमण मगधाच्या राजगृही आला आहे. तो संजयाच्या सर्व शिष्यांना घेऊन चारिका करीत आहे. आता तो कोणाला दीक्षित करणार माहीत नाही.”

भिक्खूनी हे आरोप श्रवण केले. त्यांनी हे वर्तमान तथागताला कथन केले. तथागत उत्तरले, “भिक्खूनो, हा कल्लोळ फार दिवस टिकणार नाही. हा कल्लोळ फक्त सात दिवस राहील. सात दिवसानंतर हा कल्लोळ समाप्त होईल.”

“आणि भिक्खूनो, जेव्हा ते तुम्हाला चिडवितात तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, जे महावीर आहेत. जे तथागत आहेत, तेच सद्-धम्माच्या मार्गाने नेत असतील तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे? माझ्या धम्मात कसलीही सक्ती नाही. एखाद्याला वाटल्यास तो प्रव्रज्जित होतो. गृहत्याग करतो आणि भिक्खू होतो. अथवा त्याची इच्छा असेल तर तो गृहस्थ राहूनही धम्माचे आचरण करू शकतो.”

जेव्हा तथागताच्या निर्देशानुसार भिक्खूनी लोकांना उत्तरे दिली तेव्हा लोकांना समजले की, शाक्यपुत्र गौतम लोकांना धम्माच्या मार्गानेच नेत आहे. अधम्माच्या मार्गाने नव्हे आणि त्यांनी तथागताला दोष देणे थांबविले.

संदर्भ : बुद्ध आणि त्याचा धम्म – लेखक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर