भगवान बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन संगिती भारतात झाल्या. या तीनही संगितीमध्ये स्थविरांनी आणि भिक्खुंनी पाठांतर केलेली बुद्धवाणी गाथेच्या रुपात म्हटली होती. चौथी संगिती ही इ.स.पूर्वी ८७ मध्ये श्रीलंकेत झाली. आणि या संगिती मध्ये बुद्धवाणी पहिल्यांदा लिखित स्वरूपात लिहिली गेली. त्याला कारणीभूत खालील प्रसंग झाला.
राजा वट्टगामिनी अभय हा ताम्रलोहा विहारांमध्ये बुद्ध प्रार्थनेसाठी जाताना त्यांनी बघितले की एका स्थविरांनी काही शिष्यांना शिक्षा केली आहे. तेव्हा त्याने स्थाविरांना शिक्षेचे कारण विचारले. स्थाविर म्हणाले ‘बुद्धवाणी यांच्या लक्षात रहात नाही. जर गाथा यांना भविष्यात आठवल्या नाही तर शास्त्यांचे शासन टिकणार कसे’ ?( म्हणजे पाठांतर झाले नाही तर बुद्धांचा उपदेश टिकणार कसा ? ). हे ऐकून राजा ही विचारात पडला. त्यावेळी युद्ध आणि दुष्काळामुळे जनजीवन सुद्धा अस्थिर झाले होते. परंतु त्यावेळी लिहिण्याची कला अवगत झाली होती. राजाने लगेच बुद्धवाणी लिखितस्वरूपात लिहून ठेवण्याची आज्ञा दिली.

अशातर्हेनें अनुराधापूर येथील विहारात संगिती भरवून ८४,००० पाठांतर केलेल्या गाथा स्थाविरांकडून वदवून घेऊन त्या तालपत्रावर / भोजपत्रावर लिहिण्यात आल्या. पुष्प, साल आणि डिंक या पासून तयार केलेली शाई वापरण्यात आली. एक वर्षभर ही संगिती स्थविर संघारा यांच्या अध्यक्षतेखाली चालली. ८ अक्षरांचे मिळून एक पद होते. व ४ पदे ( ३२ अक्षरे ) मिळून एक गाथा होते. म्हणजे बुद्धवाणी तालपत्रावर लिहिणे त्याकाळी किती अवघड होते हे लक्षात येईल. पण धम्मशक्तीच्या जोरावर त्रिपिटकाचे हे काम राजाने आणि ५००च्या वर स्थाविर आणि भिक्खू यांनी पार पाडले. व त्याच्या प्रती बर्मा, थायलंड, कंबोडिया व लाओस येथे गेल्या. म्हणून आज असंख्य देशात बुद्धगाथा शुद्धस्वरूपात टिकून राहिल्या आहेत.
दोन हजार वर्षांपूर्वी श्रीलंकेत पार पडलेल्या या चौथ्या संगितीस माझा प्रणाम.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)
बुद्ध वाणी लिपी बद्ध करण्याचे ज्यांनी ठरविले त्या महान अभय राजास आणि सर्व स्थविर ज्यांनी सर्व गाथा पिढी दर पिढी लक्षात ठेऊन त्याचे वर्षभर लिपीबद्ध करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, तसेच या सर्व कार्याचे प्रत्यक्ष शिल्पकार स्थविर आणि चौथ्या संगीतीचे अध्यक्ष स्थविर संघार यांचे मनपूर्वक आभार आणि त्रिवार अभिवादन.
Very nice