जगभरातील बुद्ध धम्म

सिरिलंकेतील वैशिष्ट्यपूर्ण कलुतारा स्तूप

प्राचीन काळापासून स्तूपाचे बांधकाम हे भरीव करण्यात येत होते. बुद्धधातू आतमध्ये ठेवून त्याच्या सभोवताली गोलाकार दगडी बांधकाम किंवा विटांचे बांधकाम करून स्तूप उभारला जात असे. यासाठी मोठ्या प्रमाणावर विटा, दगड, माती लागत असे. अनेक बौद्ध देशातील पुरातन स्तूप असेच भरीव आहेत. त्याभोवती गोल प्रदक्षिणा घालून त्यास वंदन करणे अशी प्रथा सर्वत्र होती. मात्र सन १९५० नंतर स्तूप बांधण्याच्या संकल्पनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्री-स्ट्रेसड काँक्रीट फ्रेम छताचे स्तूप बांधण्यात येऊ लागले. म्हणजे वरून स्तूप भरीव आणि गोलाकार दिसत असलातरी आतून तो मोकळा असल्याने भरपूर जागा उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे तेथे मध्यभागी बुद्धमूर्ती, पवित्र धातू अवशेष ठेवता येऊ लागले. अनेकजण एकाचवेळी ध्यानसाधना करु लागले. शांतता लाभू लागली. बौद्ध जगतात या संकल्पनेचे चांगले स्वागत झाले.

सिरिलंकेतील कलूतारा स्तुप असाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाचशे वर्षापूर्वी तेथील कलू नदीजवळ विहार होते. पोर्तुगीजांनी सतराव्या शतकात ते उध्वस्त केले व तेथे छोटा किल्ला बांधला. पुढे तो डच सैन्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर ब्रिटिश राजवटीत पुलाच्या बांधकामासाठी तेथील बोधिवृक्ष तोडण्याचे कारस्थान सुरू झाले. तेव्हा तेथील अनेक गावातील लोकांनी उस्फुर्त विरोध केला व काम बंद पाडले. स्वातंत्र्यानंतर सन १९५० मध्ये तेथे कमिटी स्थापन झाली व नवीन आधुनिक स्तूप बांधण्याचे ठरविण्यात आले. सरकारने सुध्दा या कामी मदत केली व सिरिलंकेच्या स्टेट इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनने हा स्तूप उभारला. त्याचे उदघाटन २८ फेब्रुवारी १९८० रोजी तत्कालीन अध्यक्ष जयवर्धने यांनी केले.

दीपकट्टा येथे जवळ असलेला बोधिवृक्ष. सम्राट अशोक यांची मुलगी थेरी संघमित्रा यांनी आणलेल्या महाबोधी वृक्षाच्या दुसऱ्या फांदीपासून हा वृक्ष बहरला आहे.

दहा वर्षांपूर्वी सिरिलंकेत पर्यटनास गेलो असताना हा स्तूप पाहिला आणि चकित झालो. या स्तुपाला लागूनच मोठा रस्ता आहे. पण वाहनांची वर्दळ असूनसुद्धा आवाज न करता त्यांची येजा चालू होती. हॉर्न तर येथे बिलकुल वाजवत नाहीत. कमलपुष्प किंवा इतर फुले घेऊन रस्ता ओलांडून या स्तुपाकडे यावे लागते. आतमध्ये मध्यभागी छोटा स्तूप असून चार ही दिशेला बुद्धमूर्ती आहेत. जातक कथांची चित्रे स्तुपाच्या आतील भिंतीवर लावली आहेत. मध्यभागी छताजवळ धम्मध्वज आहे. येथे फुले वाहण्यास व अगरबत्ती लावण्यास मनाई आहे. त्यासाठी बोधिवृक्षाकडे दीपकट्टा आहे. तेथेच बाहेर दीप प्रज्वलित करून बोधिवृक्षाचे दर्शन घ्यावयाचे असते. यामुळे स्तुपातील शांत वातावरणात बुद्ध प्रतिमेचे दर्शन घेणे सुखदायक होते. मन एकाग्र होते. याउलट आपल्याकडे गाभाऱ्यात दीप आणि अगरबत्ती यांच्या प्रज्वलनाने वातावरण धुरकट होते. असे बदल आपल्याकडे सुद्धा झाले पाहिजेत. व विहारात टापटीप व स्वच्छता राखली पाहिजे.

दोनशे वर्षापूर्वी येथून प्रवास करताना नदीजवळील विहाराला नाणे अर्पण करण्याची प्रथा होती. आजही ती प्रथा चालू असून प्रवासी गाडीतून उतरून रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सीलबंद दानपेटीमध्ये दान टाकून पुढे जातात. कुठेही गडबड, गोंधळ नसतो. कलुतारा चैत्यासारखे बांधकाम दीक्षाभूमी स्तुपाचे देखील झाले आहे. त्याची संकल्पना सांचीच्या स्तुपावरून करण्यात आली आहे. त्याचे छत हे अर्धगोलाकार व काँक्रीटचे आहे. सध्या हा स्तूप भारतातील सर्वात मोठे काँक्रीट कवच छत / घुमट असलेला स्तूप आहे. बोरवली जवळ असलेल्या ग्लोबल विपश्यना पॅगोडाचे बांधकाम देखील भव्य आहे. त्याचा घुमट/ छत घडीव दगडांपासून तयार केलेले असल्याने तो एक जगातील वैशिष्ट्यपूर्ण पॅगोडा / स्तूप आहे. तेथे एकावेळेस आठ हजार लोक ध्यान करू शकतात. थोडक्यात आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्तूपाच्या बांधकामात देखील वैशिष्ट्यपूर्ण बदल झाले आहेत.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)