जगभरातील बुद्ध धम्म

दंतधातूचा इतिहास : श्रीलंकेतील बुद्ध दंतधातूचा मिरवणूक सोहळा

बुद्ध दंतधातू सण श्रीलंकेमध्ये दिनांक १४ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा होणार आहे. या काळात बुद्ध दंतधातूची मोठी मिरवणूक निघते. हा मोठा नयनरम्य सोहळा असतो आणि जगातील असंख्य बौद्धजन आणि पर्यटक दर्शनार्थ श्रीलंकेत येतात. या दहा दिवस चालणाऱ्या सणाला ‘कँडी एसला पेराहेरा’ असे देखील म्हणतात. बुद्ध दंतधातूची ही मिरवणूक श्रीलंकेमध्ये गेल्या दीड हजार वर्षांपासून दरवर्षी भरली जात असल्याने तो श्रीलंकन जनतेच्या जीवनात मानाचे स्थान मिळवून आहे.

दंतधातूचा इतिहास:
या दंतधातूचा थोडक्यात इतिहास असा की चौथ्या शतकापर्यंत भारतातील कलिंग राज्यातील (आताचे ओरिसा राज्य) जग्गनाथपुरी येथील गुहासिव राजाच्या घराण्यात या बुद्ध दंतधातूची पूजा होत होती तसेच त्याची मिरवणूक निघत होती. दंत धातूची वाढती लोकप्रियता पाहून काही असंतुष्टांनी त्यावेळचा पाखंडी मगध सम्राट समुद्रगुप्त याचे कान फुंकले. त्यामुळे सम्राटाने गुहासिव राजाकडे दंतधातूची मागणी केली आणि न दिल्यास युद्धाला तयार व्हा असे कळविले. गुहासिव राजाने बुद्ध दंतधातूवर आलेले संकट ओळखले. परंतु प्राण गेले तरी बेहत्तर पण मी तथागतांचे दंतधातु पाखंडी सम्राटाला देणार नाही असा निश्चय राजाने केला. त्याच रात्री त्याने दंतधातू आपली मुलगी हेममाला व जावई दंतकुमार यांच्याकडे सुपूर्द केला आणि वेषांतर करून श्रीलंकेस जाऊन तेथील राजाकडे तो सुखरूप देण्यास सांगितले.

दंतधातूची मिरवणूक:
श्रीलंकेतील बंदरात उतरल्यावर हेममाला आणि तिचा पती जवळच असलेल्या मेघगिरी विहारात आले. तेथे त्यांनी बुद्धांच्या दंतधातू बद्दल भिक्खूंना सांगितले. ते ऐकून ते संयमी भिख्खू लगेच राजाकडे गेले. तेथील राजाला बुद्धांचे दंतअस्थी आपल्या राज्यात आल्याचे कळताच त्याला आपल्या आनंदअश्रूंना आवर घालणे कठीण झाले. सर्व परिषदेला बरोबर घेऊन दंतधातूच्या स्वागतासाठी तो पळत सुटला. हेममाला आणि तिचा पती दंतकुमार यांच्याकडील बुद्ध दंतअस्थी पाहून तेथेच त्याला गहिवरून आले. मग त्याने दंतधातूंना त्रिवार वंदन केले आणि हर्षभराने तेथूनच वाजतगाजत मिरवणूकीने त्या दंतअस्थी अनुराधापुर राज्यात आणल्या. तेव्हापासून श्रीलंकेत या बुद्ध दंतधातूची दरवर्षी मिरवणूक काढण्यात येते. सोळाव्या शतकात दंतधातूच्या सुरक्षिततेसाठी कँडी शहरात ‘दालदा मालीगवा’ नावाचे मोठे विहार उभारले गेले. त्याच्या सभोवताली खंदक असून तेथील सुरक्षा व्यवस्था कडेकोट असते. दरवर्षी या दंतधातूची जुलै-ऑगस्टमध्ये वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. रस्ते झाडून, जल शिंपडून स्वच्छ केले जातात. मशाली तयार करतात. अस्थी करंडक वाहून नेण्यासाठी सुळेधारक गजराजांना सुशोभित केले जाते. यावेळी पारंपरिक वेशभूषा करून नृत्य सादर केले जाते. तीस बहाद्दर पुरुष विजेच्या लोळाप्रमाणे चाबूकांचा कडकडाट करतात आणि मग वाद्यांच्या खणखणाटात मिरवणूक सुरू होते. या बुद्ध दंतधातू श्रीलंकेत आल्यापासून तेथे कधीही दुष्काळ पडलेला नाही असे समजले जाते.

दाठावंस ग्रंथ:
तेराव्या शतकात महास्थविर धम्मकिर्ती यांनी ‘दाठावंस’ या ग्रंथाची रचना केली. यामुळे बुद्ध दंतधातूचा इतिहास जगापुढे आला. भारतात देखील बुद्ध अस्थींचे करंडक अनेक संग्रहालयामध्ये बंदिस्त आहेत. गेल्या कित्येक वर्षात ना त्यांचे सामान्य जनतेला दर्शन झाले ना त्यांचे पूजन झाले. निदान वैशाख पोर्णिमेच्या दिवशी तरी या अस्थींचे दर्शन जनतेस खुले करावे. तसेच त्यांची मिरवणूक काढण्यास सरकारने परवानगी द्यावी, असे वाटते. भारताचा हा दैदिप्यमान इतिहास सर्व भारतीयांना माहीत असला पाहिजे. भारतात बुद्ध धातूंचे सार्वत्रिक पूजन सुरू झाल्यास त्याच्या बलाने पुन्हा पूर्वीचे सुवर्णयुग अवतरेल असा विश्वास वाटतो. श्रीलंकेतील भगवान बुद्धांच्या या पवित्र दंतधातूस माझे त्रिवार वंदन.

संदर्भ :- दाठावंसो (बुद्ध दंतधातूचा इतिहासातील शोधग्रंथ ) – डॉ. सविता कांबळे, नागपूर 

लेखक : -संजय सावंत, नवी मुंबई, (ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)