ब्लॉग

सम्राट अशोकाच्या काळात मगध मध्ये मोठमोठे बुद्ध विहार होते; आजच्या मगध प्रांताची सध्यस्थिती जाणून घ्या!

इसवी सन पूर्व सहाव्या शतकात कपिलवस्तूचे राजपुत्र सिद्धार्थ गौतम हे जेव्हा दुःखाचे कारण शोधण्यासाठी घराबाहेर पडले, तेव्हा ते समाधीमार्गाचे विविध तपस्वीकडून शिक्षण घेत चालत चालत वैशाली वरून मगध येथे आले. तेथे सहा वर्षे ध्यानसाधना केल्यावर वयाच्या ३५ व्यावर्षी सिद्धार्थ गौतम यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले. तेव्हापासून मगध प्रांत हा बुद्धांशी, धम्माशी आणि संघाशी जोडला गेला आहे.तत्कालीन राजा बिंबिसार तसेच सम्राट अशोक यांनी बुद्ध धम्माला आश्रय दिल्यामुळे मगध येथे मोठमोठे विहार बांधण्यात आले. हे विहार म्हणजे धम्मप्रसाराचे व भिक्खूंसाठी वास्तव्याची ठिकाणे होती. हुएंत्संग हा चिनी प्रवासी भिक्खू जेव्हा येथे आला तेव्हा त्याने प्रत्येक गावात, ठिकठिकाणी विहार, बौद्ध मठ पाहिल्याचे लिहून ठेवले आहे.

११ व्या शतकानंतर तुर्क टोळ्यांची आक्रमणे होऊ लागली. धम्माचा राजाश्रय संपला आणि पाखंडी राजकारणामुळे भारतातील बौद्धधम्माची परिस्थिती ओहोटीला लागली. बौद्ध भिक्खू भीतीपोटी निघून गेल्यामुळे मोठमोठी विहारे अक्षरशः ओस पडली. मगध प्रांतात गावोगावी पसरलेल्या विहारांना कुणी वालीच उरला नाही. जसजसा धम्म विस्मरणात गेला तसतसे गावातील लोकानीं येऊन विहाराची लाकडे, कलाकुसर केलेले खांब, तुळव्या, दगडी पायऱ्या, मुर्त्या पळवून नेल्या.जी विहारे एकेकाळी भरभराटीला होती ती जागा खंडहर होत गेली. काही वर्षांनंतर तेथे मातीचा, तुटलेल्या मूर्तींचा, नक्षीकाम केलेल्या दगडांचा ढीग राहिला. तेथील जागेला ग्रामदैवत, गढी किंवा वीरगळ असे संबोधण्यात येवू लागले. आणी त्या जागेवर देवी दैवतांची जागा समजून पूजा करु लागले.

हतीयावन, कलानौर, आणि कोचेगाव येथील शिल्लक दगडी शिल्पे

एकेकाळचा मगधदेश आता सहा भागात विभागला गेला असून पाटणा, नालंदा, औरंगाबाद, जहानाबाद, गया आणि शेखपुरा हे जिल्हे त्यामध्ये येतात. यासर्व जिल्ह्यात सहाशे पेक्षा जास्त गावे आहेत. १८७० मध्ये ब्रॉडले नावाचा उपविभागीय मॅजिस्ट्रेट बिहारमध्ये कार्यरत होता. त्याने या भागातील गावांचे सर्वेक्षण केले होते. त्यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की…
‘There is scarce a mile in the whole tract of country which doesn’t present to the traveler some object of deep interest and curiosity this awakened and intensified at almost every step, is speedy concentration as it were, on the ruins of the hill grit capital of Magadha, or the mounds and figures which mark the site of great Buddhist viharas’. ‘येथील अनेक मैल पसरलेल्या जमिनीवरील प्रत्येक गावात ढिगाऱ्यावर पडून असलेली छोटीमोठी दगडी शिल्पे कोणे एकेकाळी बहरलेल्या बौद्ध धम्माची, त्याच्या समृद्ध विहारांची साक्ष देतात. मी खूप भाग्यवान की हे मला बघावयास मिळाले. पण वाईट ही वाटते की हा अनमोल ठेवा हळूहळू चोरी होऊन परदेशात जात आहे. हा ठेवा नष्ट होण्याअगोदर या दैदिप्यमान वारसाचा परिपूर्ण अभ्यास व्हावा’.

आज ब्रॉडले यांच्या या अहवालास १४९ वर्ष झाली आहेत. मगध प्रांतातील प्रत्येक गावातील पुरातन ठेवा आज सुरक्षित असेलच असे नाही. बुद्धांनीच सांगितले आहे की ‘या जगात नित्य काहीच नाही. सर्व काही अनित्य आहे’. तरीही धम्माचा हा अनमोल ठेवा नष्ट झाल्याबद्दल खंत वाटते. 

संजय सावंत, नवी मुंबई

5 Replies to “सम्राट अशोकाच्या काळात मगध मध्ये मोठमोठे बुद्ध विहार होते; आजच्या मगध प्रांताची सध्यस्थिती जाणून घ्या!

Comments are closed.