आंबेडकर Live

डॉ. आंबेडकर यांचा रहिवास लाभलेला ‘गोविंद निवास वाडा’ कोसळला; महाडमध्ये व्यक्त होतेय हळहळ..

महाडचे थोर समाजभूषण सुरबानाना टिपणीस यांच्या ‘गोविंद निवास’ या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. त्यांच्या जीवनातील अनेक संस्मरणीय प्रसंग आजही रोमांच उभे करतात. ही पवित्र वास्तू नुकतीच जोरदार अतिवृष्टीमुळे कोसळली….

चवदार तळे सत्याग्रहातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी, खोती विरोधातील चळवळीचे प्रणेते दलितमित्र सुरबानाना टिपणीस यांचे ‘गोविंद निवास’

आंबेडकरी चळवळीत महाड शहराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी झालेला महाड चवदार तळे सत्याग्रह जगाच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. याच महाड शहरातील बाबासाहेबांचे निष्ठावान सहकारी, खोती विरोधातील चळवळीचे प्रणेते ‘दलित मित्र’ सुरबानाना टिपणीस यांनी बाबासाहेबांना खंबीरपणे मोलाची साथ दिली होती. कालांतराने सुरबानाना आणि बाबासाहेब यांच्यात जिव्हाळ्याचे मधुर नाते निर्माण झाले. सुरबानानांची बाबासाहेबांवर नितांत भक्तीच नव्हे तर अलोट प्रेम जडले. बाबासाहेब जेव्हा जेव्हा महाडला जायचे तेव्हा तेव्हा ते सुरबांचा ‘गोविंद निवासा’त मुक्काम करायचे. या पवित्र वास्तूत बाबासाहेबांनी तब्बल दहा वर्षे वास्तव्य केले.

त्यांना करंज्या आवडायच्या. ‘जेवण अतिशय सुरेख बनले. समाधान वाटले, असे गौरवोद्गार बाबासाहेब नेहमी काढायचे. जेवणानंतर ते आपल्या जीवनातील अनेक गोष्टी सुरबांना सांगायचे.

सुरबानानांचे चिरंजीव सतीशचंद्र टिपणीस म्हणतात, माझ्या वडिलांचा आणि बोधिसत्त्व डॉ. आंबेडकर यांचा इतका दृढ परिचय होता की कामानिमित्त असो अथवा विश्रांती घेणे असो, कोणत्याही कारणाने का होईना बोधिसत्त्वाचे महाडास आगमन झाले की मुक्काम आमचे घरी असे. आमच्या कुटुंबाची एकूण परिस्थिती यथातथाच होती. वर्षभरात एकदाच पिकविला जाणारा तांदूळ व थोडीफार कडधान्ये हीच आमची श्रीमंती. डोक्यावर छप्पर होते. दाराशी दूधदुभते. वडिलांच्या यथातथा परिस्थितीची बाबासाहेबांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांचे आमच्या घरी येणे वडिलांना जाचक वाटले नाही.

मुळात गरीब, दीनदुबळ्या वर्गाचेच ते प्रतिनिधी असल्याने आपल्या सारख्याच इतरांच्या अडचणी काय असतील याची पूर्ण कल्पना त्यांना होती. ‘डॉ. बाबासाहेब आमच्या घरी येणे म्हणजे आम्हा घरातील मुलांना ते दिवस, सण अथवा उत्सव असल्यासारखे वाटे.’ घराचे एकूण स्वरूपच बदलून जाई. सर्व घर पोटमाळ्यापासून, अंगणापर्यंत चकाचक होई. बाबासाहेब नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात थंडीच्या दिवसात येत. पाऊस नुकताच सरलेला असे. पावसाळ्यात खराब झालेले घराच्या मागील दाराचे अंगण चोपून सारवून सारखे केले जाई. हिरव्यागार शेणाने सारवल्यामळे अंगणाला सौंदर्य प्राप्त होई. नुकत्याच सारवलेल्या ओलसर अंगणात माझी आई (लक्ष्मीबाई) पांढऱ्या रांगोळीने चौपाट काढी आणि मग अंगणाची शोभा आणखी वाढे. ओटीपासून मागील पडवीपर्यंत सर्व घराला पांढऱ्या चुन्यात थोडी नीळ टाकून तयार होणाऱ्या रंगाने रंग दिला जाई. दिवाळीच्या सणाला देखील एवढी रंगरंगोटी होत नसे. महाडच्या गांधी टॉकीजचे मालक देवचंदभाई गांधी यांच्याकडून वाघाच्या अथवा चित्रांचे गालीचे आणले जात. पितांबरभाई गांधी यांचे दुकानात गिऱ्हाईकांसाठी भारतीय बैठक असे. साहजिकच त्यांचेकडे तक्के बरेच असत. पांढरे स्वच्छ अभ्रे घालून ते तक्के पितांबरभाई गांधी पाठवून देत. या साहित्यातून बाबासाहेबांसाठी बैठक तयार होई.

गोविंद निवास हे घर आज पूर्णपणे कोसळले. जीर्ण झाल्याने वापरात नसलेल्या या घराची एक भिंत काही दिवसांपूर्वी कोसळली होती. आज या घराचा बराचसा भाग कोसळला.

जुन्या घराला माडी (दुसरा मजला) व पोटमाळा होता. माडीवर घराच्या दर्शनी भागात २२ फूट लांब व १५ फूट रुंद मापाची एक मोठी प्रशस्त खोली होती. त्या खोलीला ‘हॉल’ असे भारदस्त इंग्रजी नाव होते. बाबासाहेब महाडला आल्यावर ते याच हॉलमध्ये विश्राम करायचे. याच जागी वडिलांबरोबर आणि त्यांच्या इतर अनुयायांबरोबर चर्चा होत. एरव्ही गावातील व गावाच्या पंचक्रोशीतील त्यांना मान देणाऱ्या मंडळीबरोबर मोकळ्या गप्पा याच हॉलमध्ये रंगत. या बैठकी सर्वधर्मसमभाव, जातीबंधनातील असत. बाबासाहेबांबरोबर होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राजकारणावरील चर्चा आणि एरव्ही मित्रपरिवाराशी आमच्या घराच्या माडीवरील हॉलमध्ये रंगणाऱ्या गप्पा यात माझी भूमिका हरकाम्याची होती. पिण्याच्या पाण्याचा तांब्या भरून ठेवणे, बैठक तयार करण्यास मदत करणे, बैठकीत चहा लागल्यास तो निरोप आईला जाऊन सांगणे, जेवणाची पाने वाढली असल्यास वडिलांना माडीवर जाऊन सांगणे. बाबासाहेबांसाठी गादीभोवती पांढरी स्वच्छ चादर गुंडाळून टेकून बसावयास लोड तयार करणे हे काम मला आवडे, अर्थात मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली ही कामे चालत.

महाडचे थोर समाजभूषण सुरबानाना टिपणीस

एकदा बाबासाहेब महाडला आले होते. त्यावेळी नदीला भयंकर पूर आला होता. सभोवताल वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात बाबासाहेब अडकून पडले. त्यांना अतिशय भूक लागली होती. जेवणासाठी त्यांची कोणीच विचारपूस केली नाही याची त्यांना भयंकर चीड आणि राग आला. पुराचे पाणी ओसरल्यावर ते आपल्या मुंबई येथील निवासस्थानी परतले. घरी आल्यावर ते कुणाशीही न बोलता आपल्या खोलीत गेले. खोलीचा दरवाजा आतून बंद करून ते ढसढसा रडले. घरच्या मंडळींनी त्यांना दार उघडण्याची विनंती केली. परंतु त्यांनी दार उघडले नाही. प्रेमळ, मितभाषी सी. के. बोले यांना बोलावण्यात आले. बाबासाहेबांची समजूत काढून त्यांनी दार उघडण्यास बाध्य केले होते. महाडात १७ जुलै २०२२ रोजी कोसळलेल्या धुवांधार पावसाच्या तडाख्यात सुरबानानांचे ‘गोविंद निवास’ हे घर पूर्णपणे कोसळले. जीर्ण झाल्याने वापरात नसलेल्या या घराची एक भिंत चार दिवसापूर्वी कोसळली होती. या वास्तूची सरकारच्या माध्यमातून पुनर्बांधणी करण्यात यावी अशी जोरदार मागणी काँग्रेसचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ही वैभवशाली वास्तू नष्ट झाली असली तरी बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक हृदयस्पर्शी आठवणी येथील प्रत्येक दगड जागविल्याशिवाय राहत नाही.

सुरबानाना आणि बाबासाहेब यांच्यात तासन्तास चालणाऱ्या गप्पागोष्टीचे नादमधुर सूर आजही कानी गुंजारव करीत असल्याचा येथे भास होतो… चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन आणि त्यानंतरची न्यायालयीन लढाईची रणनीती याच गोविंद निवासमधून बाबासाहेबांनी टिपणीस यांच्याबरोबर केली होती. चवदार तळे सत्याग्रहप्रसंगी समता सैनिक दलातर्फे दरवर्षी या वास्तुला मानाचा मुजरा केला जातो. आंबेडकरी चळवळीचे साक्षीदार असलेले गोविंद निवास कोसळल्याने महाडमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त होत आहे. परमपूज्य बाबासाहेबांच्या आठवणीने भीम अनुयायांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत…

मिलिंद मानकर, नागपूर