ब्लॉग

सुशीलकुमार शिंदेनी पूर्ण पुस्तकातील एकाही लेखात डॉ.बाबासाहेबांचा साधा उल्लेख केला नाही

दोनदा लिहून डिलिट केलं. लिहावं वाटलं, कारण पुस्तकातल्या काही प्रसंगांनी भारावून टाकलं. डिलिट केलं, कारण हे पुस्तक काही स्वतंत्र नि संपूर्ण आत्मकथा किंवा चरित्र नाही. तसं काही वाचल्यावरच सुशीलकुमार शिंदेंवर थोडं विस्तृतपणे लिहिता येईल. पण नाही राहावलं. म्हणून लिहितोय.

ऋतुरंग दिवाळी अंकात गेल्या दोन दशकात सुशीलकुमार शिदेंनी लिहिलेल्या निवडक नऊ लेखांचा हा संग्रह. पण प्रकाशक अरुण शेवतेंनी क्रमावाराने लेखांची मांडणी केल्यानं मिनि-बायोग्राफी वाचल्यासारखं वाटतं.

हे पुस्तक वाचल्यानंतर एकाचवेळी दोन भावना मनात आल्या – एक म्हणजे, सोलापुरातील ढोर गल्ली ते रथी-महारथींची राजधानी दिल्ली असा विस्मयचकित करणारा प्रवास आणि दुसरं म्हणजे, उठ-बस गणेशपूजन, नवरात्रोत्सव यांचा उल्लेख करणाऱ्या सुशीलकुमारांनी पूर्ण पुस्तकातील एकाही लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा साधा उल्लेख केला नाही. हे इतर कुणाचे असते तर व्यक्तिगत आहे म्हणून सोडूनही देता आले असते. पण ४५ हून अधिक वर्षे सार्वजनिक जीवनात राहिलेल्या आणि विशेषत: दलित समाजातून आलेल्या व्यक्तीनं असा नामोल्लेख टाळणं हे काही पटलं नाही.

तर असो. सोलापुरातल्या ढोर गल्लीत राहणारा एक मुलगा, पाचव्या वर्षी पितृछत्र हरपतं, वडिलांच्या जाण्यासोबत घरातली सुबत्ताही निघून जाते आणि गरिबी विळखा घालते, सोबत दोन आया असतात – एक सख्खी आणि एक सावत्र. हा मुलगा अगरबत्त्या विकतो, पेंटिंगची कामं करतो. चोऱ्याही करतो, पण आईच्या धाकानं त्यातून बाहेर पडतो. एखाद्या सिनेमात शोभावे असे आयुष्य बदलत जातं. संघर्षाची कास धरतो आणि शिकत जातो.

कोर्टात ‘हाजीर हो’ म्हणणारा शिपाई, त्याच कोर्टात ‘माय लॉर्ड’ म्हणण्यासाठी धडपडतो, न्यायाधीशांच्या बंगल्याला रात्री पहारा देणारा हा मुलगा पोलिसात सिलेक्शन झाल्यावर सीआयडीमध्ये लागतो. नंतर व्हीआयपी व्यक्तींच्या सिक्युरिटीची जबाबदारी येते आणि मग बॅरिस्टर नाथ पै यांच्या सिक्युरिटीत असताना त्यांचा प्रभाव याच्यावर पडतो. हा प्रभाव किती असावा, तर पोलिसात असतानाही खिशात बॅरिस्टर नाथ पै यांचा फोटो खिशात ठेवतो. मग पोलिसातच काँग्रेस कव्हर करण्याची संधी मिळते आणि ‘शरद पवार’ नावाच्या तेव्हाच्या तरुण, पण यशवंतरावांच्या ‘मानसपुत्रा’शी ओळख होते. मग काय, सारं आयुष्यच पालटून जातं.

1965 ते 1971 अशी सहा वर्षे मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केल्यानंतर शरद पवारांच्या सांगण्यावरून राजीनामा देतात. करमाळ्यातून तिकीट मिळण्याचं आश्वासन असतं. मात्र, दिल्लीत तिकीट कापलं जातं आणि तयप्पा हरी सोनावणेंना तिकीट मिळतं. पण अल्पावधीतच त्यांचं निधन होतं आणि मग पोटनिवडणुकीत सुशीलकुमार शिंदेना उभं केलं जातं. ते निवडून येतात आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांना थेट मंत्रिमंडळातच घेतात. मग सत्तेच्या वर्तुळात ते असे काही एक एक पायऱ्या वर चढत जातात की, या पुस्तकाचे नाव खोटे ठरते. ते मागे वळून पाहतच नाहीत. पण ते पदांच्या बाबतीत. वैयक्तिक आयुष्यात मात्र ते मागे वळून पाहतात, तेव्हा हळवे झालेले जाणवतात. शब्दातून ते प्रकर्षानं दिसून येतं.

पुढे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, देशाचे ऊर्जामंत्री झाले, आंध्र प्रदेशचे राज्यपाल झाले, देशाचे गृहमंत्री झाले…. पक्षनिष्ठा, नेतृत्त्वाचा शब्द अंतिम मानणं, संयमीपणा आणि चिकाटी या गोष्टीचं फळ काय मिळू शकतं, हे सुशीलकुमार शिंदेंच्या राजकीय प्रवासाकडे पाहून सहज लक्षात येईल.

या पुस्तकात ते स्वत:बद्दल लिहितात, सोलापूरबद्दल लिहितात, दोन आयांबद्दल लिहितात, त्यांच्या इंटरकास्ट मॅरेजबद्दल लिहितात, यशवंतराव चव्हाणांबद्दल लिहितात, 2004 साली हुकलेल्या मुख्यमंत्रिपदाबद्दल लिहितात. पण तरीही खूप गोष्टी राहून गेल्यासारखे वाटते. त्यांनी खरंच वैयक्तिक आणि राजकीय आत्मकथा लिहिली पाहिजे. ती नक्कीच वाचनीय असेल. (लिहिलीय का? मला माहित नाहीय.)

मला इथं सुशीलकुमार शिंदेंच्या राजकीय डावपेचांचा, ध्येय-धोरणांचा, त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या कामांचा उल्लेख करायचा नाहीय. तो करायला हवा खरंतर. पण या पुस्तकाचा तो विषय नाहीय. त्यांची स्वतंत्र आत्मकथा किंवा चरित्र वाचल्यावर त्यावर बोलता येईल. पण तूर्तास, त्यांनी लिहिलेल्या या नऊ लेखांमधून सुशीलकुमार यांनी पार केलेल्या अग्निदिव्याची ओळख पटते.

ते वाटेत भेटलेल्या सोबत्यांना विसरत नाहीत, हे त्यांचं वैशिष्ट्य. सब-इन्स्पेक्टरचा फॉर्म भरणाऱ्या सुभाष विळेकरचाही उल्लेख करतात, कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचा, कवितेची गोडी लावणाऱ्या बा. भ. बोरकरांचाही, पोलिसात सहकारी म्हणून काम केलेल्या पोलिसांचाही उल्लेख करतात. श्रेय देण्याचा नम्रपणा यात पानोपानी जाणवतो.

एक गोष्ट मात्र खटकली, तीही इथं नमूद करायला हवी. एक लेख ते राहिलेल्या घरांबद्दल आहे. सोलापूर, मुंबई, पुणे, दिल्ली इथल्या ज्या ज्या घरात राहिले त्या घरांवर त्यांनी लिहिलंय. या घरांमध्ये कसा गणेशोत्सव साजरा केला, कसा नवरात्रोत्सव साजरा केला, कशा पूजा घातल्या, इतकंच काय, मंत्री असताना सत्यसाई बाबाला घरी आणण्यासाठी घराला कसं फुलांनी सजवलं हेही मोठ्या गौडकौतुकानं नमूद करतात. पण ज्या दलित समाजातून ते येतात, ती ओळख ते पानोपानी सांगतात, त्या समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण पुस्तकात पुसटसा सुद्धा उल्लेख नाही. याचं वाईट वाटलं.

बाकी पुस्तक वाचनीय आहे. पुन्हा तेच, सुशीलकुमार शिंदे यांची संपूर्ण आत्मकथा किंवा चरित्र वाचणं अधिक उत्तम ठरेल. पण या पुस्तकाकडे तुम्ही त्यांची मिनि-बायोग्राफी म्हणून पाहू शकता.

पत्रकार नामदेव अंजना यांच्या फेसबुक वॉलवरून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *