बातम्या

ओरिसात सापडले तपुस्स आणि भल्लिक यांचे स्तूप

ज्ञानप्राप्ती पूर्वी बुद्धांनी सुजाताने दिलेल्या खीरचे सेवन केले होते याचे बौद्ध साहित्यात मोठे वर्णन आढळून येते. त्याचप्रमाणे ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी चार आठवड्याच्या ध्याना नंतर राजायतन वृक्षाखाली बसून तपुस्स आणि भल्लिक यांनी दिलेल्या मधुमिश्रित सत्तू पदार्थाचे सेवन केले होते हे ही तितकेच महत्वाचे आहे. खीर सेवनाने एकाग्रता साधून ज्ञानप्राप्तीचे लक्ष्य साधता आले तर मधुमिश्रीत सत्तू खाऊन धम्म उपदेश करण्यास तनमनाला मोठे बळ मिळाले. ज्ञानप्राप्ती नंतर चार आठवडे ध्यानात व्यग्र राहील्याने शरीरास पुढील वाटचाली करीता ऊर्जा मिळणे आवश्यक होते. तपुस्स आणि भल्लिक अंत:प्रेरणेने राजायतन वृक्षाखाली आसनस्थ असलेल्या बुद्धांकडे गेले. वंदन केल्यावर त्यांनी मधुमिश्रित सत्तु बुद्धांना दिल्याने पुढील धम्म उपदेश करण्याची प्रेरणा त्यांना प्राप्त झाली. म्हणूनच भगवान बुद्धांचे पाहिले उपासक म्हणून तपुस्स आणि भल्लिक यांना गौरविण्यात आले आहे.

तपुस्स आणि भल्लिक हे बंधू बुद्धांचे पहिले उपासक होते.

तपुस्स आणि भल्लिक हे प्राचीन उत्कल प्रांताचे ( आताचे ओरिसा राज्य आणि पूर्वीचा कलिंग प्रदेश ) व्यापारी बंधू होते. महानदी आणि ब्रह्मानदी यांच्यामधील प्रदेशातून गया, जाजपुर आणि पाटलीपुत्र या मार्गावर त्यांचा व्यापार चालत असे. या मार्गावर नुकतेच उत्खनन करण्यात आलेले राधानगर हे महत्त्वाचे प्राचीन स्थळ सुद्धा होते. बैलगाडीतून मालवाहतूक करताना त्यांचा तांडा गयेतून जात असे. तपुस्स आणि भल्लिक यांची पूर्व पुण्याई मोठी असल्याने त्यांना बुद्धांचे दर्शन झाले. त्यांची तेजःपुंज मुद्रा पाहून ते भारावले. त्यांना खाण्याचा पदार्थ सत्तू दिल्यावर बुद्धांनी त्यांना डोक्याचे आठ केस दिले. ते घेवून उत्कल प्रांतात आल्यावर या केश धातुवर त्यांनी चैत्य उभारला. तीनशे वर्षानंतर यापैकी दोन केस सम्राट अशोकाच्या वेळी सोण आणि उत्तर या दोन स्थविरांनी ब्रह्मदेशाला नेले. त्यावर तिथल्या राजाने रंगूनला अत्यंत भव्य असा सुवर्णचैत्य (श्र्वेडेगोन पॅगोडा) उभारला.

ओरिसा राज्यात तारापूर येथील उत्खननात आढळून आलेले प्राचीन अवशेष.

ओरिसा राज्यात २००५ मध्ये प्राचीन व्यापारी मार्गावरील राधानगर किल्ला, कायमा, धौली, तारापूर, वज्रगिरी, लांगुडी, कांतिगडीया, नेऊलपुर, पंतुरी आणि बंद्रेस्वर येथे उत्खनन करण्यात आले तेंव्हा लाल मातीची पात्रे, काळ्या रंगाची मातीची विशिष्ट भांडी प्राप्त झाली. तसेच उत्खननांत काही स्तूप, चैत्य आढळून आले. आणि मुख्य म्हणजे तारापूर व धौली येथील उत्खननात पाषाणावर धम्म लिपीत ‘केसा स्तूप’ , ‘भिक्खू तपस्सू दानम’ आणि ‘भल्लिका लेणा’ ही अक्षरे कोरलेली आढळली. काही संशोधकांनी तपुस्स आणि भल्लिक हे अफगाणिस्तान जवळील बल्ख प्रांताचे असल्याचे म्हटले होते. परंतु ओरिसामध्ये झालेल्या या उत्खननामुळे तेथील पुरातत्त्व खात्याने पुराव्यानिशी जाहीर केले की तपुस्स आणि भल्लिक हे बुद्धांचे प्रथम उपासक प्राचीन उत्कल प्रांतातील ( आताचे ओरिसा राज्य) होते.

तपुस्स आणि भल्लिक या उपासकांचा मूळ प्रदेश ओरिसाच्या पुरातत्त्व खात्याने शोधून काढला. त्याचा हा अहवाल नेटवर उपलब्ध आहे.

प्राचीन कलिंग बंदरातून व्यापारा निमित्त अनेक गलबते ब्रह्मदेश व सिरीलंकेच्या प्राचीन मंथाई बंदरात जात असत. तेव्हा सिरीलंकेत देखील व्यापारी बंधूंनी बुद्धांचा एक केशधातू नेला असा तेथील ग्रंथात उल्लेख आहे. धम्माचे बीज मिळाल्यावर तपुस्स आणि भल्लिक यांनी मोठी अध्यात्मिक प्रगती केली. राजगृह येथे पुन्हा बुद्धांची भेट घेतली. पुढे धाकटा भल्लिक अहर्त होऊन संघात दाखल झाला. तर तपुस्स याने स्त्रोतापन्न अवस्था प्राप्त केली. ज्ञानप्राप्ती नंतर बुद्धांना प्रथम भोजनदान देणाऱ्या या बंधूंना माझा प्रणाम.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)