लेणी

…तरच प्रत्यक्षात लेणीचे संवर्धन होईल!

मोबाईल स्मार्ट झाल्यापासून अनेक जण प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक स्थळे यांना दिलेल्या भेटीचे छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पोष्ट करू लागले आहेत. यामध्ये विविध लेण्यांचे उदा.कुडा लेणी, कान्हेरी लेणी, गंधारपाले लेणी, कोंढाणे लेणी यांचे पोष्ट केलेले माहितीपट निश्चितच चांगले आहेत.

या सर्व लेण्यांच्या स्थळांचे दर्शन केले असता तसेच तरुण पिढीने बनविलेले माहितीपट पाहिले असता असे ध्यानात येते की बहुसंख्य लेणी या कालमानानुसार वाईट अवस्थेत आहेत. काही ठिकाणी चैत्या मधील स्तूप भंगला आहे, काही ठिकाणी शिल्पे तुटलेली आहेत, काही ठिकाणी कोरलेली ब्राम्ही लिपीतील अक्षरे पुसट झालेली आहेत. विशेष करून कर्जत येथील कोंढाणे लेणीची अवस्था बिकट आहे.

निसर्ग नियमानुसार प्रखर ऊन, थंडी आणि पावसामुळे हळूहळू खडकांना भेगा पडतात. त्या खडकांमध्ये पाणी जाऊन हळूहळू फट मोठी होते आणि खडक दुभंगला जातो. कोंढाणे लेणी येथे सुद्धा असेच झालेले आहे लेण्यांबाहेरील छताकडील भाग भंगून खाली कोसळला आहे. याचा कालावधी ज्ञात नाही. पण १५ वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती तीच आता आहे.

कदाचित भूकंपाच्या धक्क्याने लेण्यांचा दर्शनीभाग ३००-४०० वर्षापूर्वी कोसळला असेल. परंतु कोसळलेला दर्शनी भाग आजतागायत तेथेच लेण्यांसमोर जमिनीत मोठ्या शिळांच्या स्वरूपात गाडला गेला आहे. व आजपर्यंत ना पुरातत्व विभागाने तो खणून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना कुठल्या संस्थेने. हा कोसळलेला भाग चैत्यगृहाचा दर्शनी भाग असल्याने पाषणांवरील अनेक शिल्प कलाकृती, यक्ष शिल्प, ब्राम्हीलिपी, कमान यांचे भांडार गाडले गेले आहे. या गाडलेल्या शिळा पुरातत्व खात्याच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चेन व पुलीज वापरून बाहेर काढल्या तर अद्वितीय लेणीभांडार उजेडात येईल असे वाटते.

महाड येथील गंधारपाले लेणींच्या सुद्धा असंख्य शिल्पांकृती, स्तुपाचे भाग, शिळा गडगडत खाली शेतात गेल्याचे दृष्टीपथात येते. या जर जेसीबी मशीनने काढून तेथील सपाट जमिनीवर शिल्प प्रदर्शनी सारखे मांडून ठेवल्यास विध्वंस व चोरी होण्यापासून बचावतील. महाराष्ट्रात जेथे जेथे लेण्या आहेत तेथे तेथे अनेक कारणांनी विध्वंस झालेल्या मोठमोठ्या शिळांचे भाग विखुरले गेले आहेत. ते गोळा करून त्यांची लेण्यांच्या परिसरात व्यवस्थित मांडणी झाली पाहिजे तरच प्रत्यक्षात लेणीचे संवर्धन झाले असे म्हणता येईल. यासाठी पुरातत्व खात्याच्या मागे लागून निधीची तरतूद करून घ्यावी लागेल. आणि हे काम लेणीप्रेमींना तडीस न्यावेच लागेल.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *