इतिहास

तथागत म्हणाले येथे कोणतेही दुःख किंवा संकट नाही ; वाचा यशाची धम्मदीक्षा

वाराणसी नगरीत श्रेष्ठीपुत्र यश वास्तव्य करीत होता. तो युवा होता. त्याची शरीरयष्टी आकर्षक होती. तो आपल्या माता पित्यांना प्रिय होता. तो वैभव संपन्न होता. तो अमाप संपत्तीचा स्वामी होता. त्याच्याकडे सेवक – सेविका मोठ्या संख्येने होत्या. त्याचे अंत:पूर मोठे होते. तो आपले जीवन नृत्य, गायन आणि इंद्रियजनित भोगविलासात व्यतीत करीत होता. त्याचे जीवन भोगविलासांनी पूर्णपणे व्यापलेले होते.

जसा काळ व्यतीत होऊ लागला तशी त्याला जीवनात विरक्ती येऊ लागली. पण या भोगविलासातून, सुरा-सुंदरीच्या पाशातून मुक्ती कशी व्हावी. तो जीवन जगत आहे त्यापेक्षा काही वेगळे गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ जीवन आहे काय? काय करावे त्याला सुचत नव्हते. या अनिश्चयाच्या अवस्थेत त्याने पितृगृह त्यागण्याचा निर्णय घेतला.

एके रात्री त्याने पितृगृह सोडले. त्याची भटकंती सुरू झाली. भटकता भटकता तो ऋषीपत्तनच्या दिशेने निघाला. थकला भागला तो जीव विश्रांतीसाठी वृक्षाखाली बसला. बसल्या बसल्याच तो स्वत:शीच मोठ्याने बोलू लागला, “मी कोठे आहे? यातून मार्ग कोणता? अरेरे ! किती हे दुःख, किती हे संकट?”

ज्या दिवशी तथागतांनी ऋषीपत्तन येथे पंचवर्गीय भिक्खूना प्रथम दीक्षा दिली. त्याच रात्रीची ही घटना. ज्यावेळी यश ऋषीपत्तनात होता त्याचवेळी तथागतही ऋषीपत्तन येथे वास करीत होते. तथागत प्रात काळी उठून मोकळ्या हवेत विचरत होते श्रेष्ठीपुत्र यश आपले दुःख व्यक्त करीत असताना तथागतांनी त्याला पाहिले .

त्याचे दुःखोद्गार ऐकून तथागत म्हणाले, “येथे कोणतेही दुःख नाही. येथे कोणतेही संकट नाही. ये माझ्या शरणी ये. मी तुला मार्ग दाखवितो. आणि तथागतांनी त्याला धम्मोपदेश केला. जेव्हा यशाने तथागतांचा धम्मोपदेश श्रवण केला तेव्हा तो आनंदी झाला. तो प्रसन्नता पावला. त्याने आपली सवर्णजडीत पादत्राणे त्यागली. तो तथागतांच्या निकट गेला. त्याने तथागतांना प्रणिपात केला.

तथागतांचे वचन श्रवण करून यशाने त्याला शिष्य म्हणून स्वीकारावे अशी त्यांना प्रार्थना केली. तथागतांनी त्याला ‘ये आणि भिक्खू हो ‘ असे म्हटले. यशाने त्याला सहमती व्यक्त केली. यशाचे माता पिता घोर चिंतेत होते. त्यांचा पुत्र कोठे दिसत नव्हता. पित्याने पुत्राचा शोध घेणे आरंभिले. यशाचा पिता जेथे तथागत आणि भिक्खूवेशात यश उपस्थित होते तेथून गेला. त्याने सहज तथागतांना विचारणा केली, “कृपया आपण माझा पुत्र यश याला पाहिले आहे काय?

तथागत उत्तरले, “आपण यावे आपला पुत्र येथे सापडेल.” तो तथागतानिकट गेला आणि आपल्या पुत्राशेजारीच आसनस्थ झाला. त्याने आपल्या पुत्राला ओळखले नाही. ” यश कसा भेटला, कोठे भेटला आणि धम्माची शिकवण ऐकून तो कसा भिक्ष झाला” हे तथागतांनी त्या श्रेष्ठीला सांगितले. पित्याने पुत्राला ओळखले. पुत्राने योग्य धम्म ग्रहण केला याचा पित्याला आनंद झाला.

“माझ्या पुत्रा ! यशा ‘ पिता उत्तरला, “तुझी माता तुझ्या वियोगाने दुःखी आहे. विलाप करीत आहे. स्वगृही परत ये आणि मातेला जीवदान दे.” यशाने तथागतांकडे पाहिले. तथागत यशाच्या पित्याला म्हणाले, “यशाने गृहस्थ जीवनात परत यावे आणि पूर्वी जसा भोगवासनेत रममाण होता तसेच जीवन जगावे अशी आपली इच्छा आहे काय?”

यशाचा पिता उत्तरला, “माझ्या पुत्राला, यशाला, तुमच्या चरणी संतोष आहे तर त्याला राहू द्यावे.” यशाने भिक्खू म्हणून जीवन जगणे स्वीकारले. निरोप घेण्यापूर्वी यशाचा पिता म्हणाला, “हे तथागता, आपण माझ्या कुटुंबबासह अन्न ग्रहण करण्याचे निमंत्रण स्वीकारावे.” तथागतांनी चीवर धारण केले. भिक्षापात्र घेतले आणि यशासह त्याच्या पितृगृही प्रयाण केले.

तथागत आणि यश जेव्हा यशाच्या पितृगृही पोहोचले तेव्हा तेथे ते यशाच्या मातेला आणि यशाच्या पूर्व भार्येलाही भेटले. अत्रग्रहणानंतर तथागतांनी त्याकुटुंबाला धम्मोपदेश दिला. सर्वच धम्मोपदेशाने प्रमुदित झाले आणि त्यांनी धम्माला शरण जाण्याचे अभिवचन दिले.

वाराणसी नगरीत यशाचे चार मित्र होते. ते धनधान्य संपन्न कुटुंबातील होते. त्यांची नावे विमल, सुबाहू, पुण्यजित आणि गवाम्पती. यश बुद्धाला आणि धम्माला शरण गेला हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनी असा विचार केला की, जे यशाकरिता कल्याणप्रद आहे ते निश्चितच त्यांच्या करिताही कल्याणप्रद असेल.

ते यशाकडे गेले. त्यांनी त्यांच्या वतीने यशाने बुद्धाला वंदन करावे आणि त्यांनाही शिष्य म्हणून स्वीकारण्याची प्रार्थना करावी असे सुचविले. यशाने स्वीकृती दिली. यश बुद्धाकडे गेला. “तथागतांनी माझ्या चार मित्रांना धम्मदीक्षा द्यावी” त्याने तथागतांना प्रार्थना केली. तथागतांनी त्याला स्वीकृती दिली. यशाचे मित्र धम्माला शरण आले.

संदर्भ : बुद्ध आणि त्याचा धम्म : लेखक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

One Reply to “तथागत म्हणाले येथे कोणतेही दुःख किंवा संकट नाही ; वाचा यशाची धम्मदीक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *