महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात तेलंगणा स्टेट मध्ये नागार्जुना सागर परिसरात ”बुद्ध वनम प्रोजेक्ट” उभारण्यात आला आहे. हा प्रोजेक्ट जगातील सर्वात मोठे बौद्ध हेरिटेज थीम पार्क असून उद्घाटनासाठी सज्ज आहे. या प्रोजेक्ट मुळे तेलंगणा राज्यात जगभरातील पर्यटकांचे आकर्षण वाढवण्यास मदत होईल. या वर्षाच्या सुरुवातीस हा प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा होती पण कोविड -19 आणि लॉकडाऊनमुळे विलंब झाला.
नागार्जुन सागर हे देशातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध धरण असून हैदराबादपासून 150 कि.मी. अंतरावर असलेले एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. तेलंगणा सरकारने आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अपेक्षित असलेला हा प्रतिष्ठित प्रकल्प २७५ एकरांवर उभारला आहे.

बुद्ध वनम प्रकल्प अश्या प्रकारातील पहिलाच प्रोजेक्ट आहे. ज्यामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या संपूर्ण जीवनाची झलक दाखविण्यात आली आहे. तसेच यामध्ये बुद्ध विहार, इको टूरिझम रिसॉर्ट, कॉटेज आणि फूड कोर्ट्स आहेत.
बुद्ध वनम प्रकल्प हा देशातील सर्वात मोठे बौद्ध सर्किट असल्याचा दावा केला जात आहे, त्यात आशियातील सर्वात मोठा घुमट आहे, ज्यामध्ये स्तूप आहे. 100 कोटींच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि तो लोकांसाठी लवकरच खुला होऊ शकेल.
तेलंगणा पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बुद्ध वनम प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन सर्किटमधील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून उद्यानाला विकसित केले गेले आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटक, विशेषत: तिबेट, श्रीलंका, भूतान, थायलंड, सिंगापूर आणि इतर दक्षिण-पूर्व आशियाई देशांना आकर्षित करण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पात आठ बुद्ध चैत्रवनम, एक जातक चक्र पार्क, ध्यान वनम, सूक्ष्म स्तूप पार्क, महा स्तूप, बौद्ध संग्रहालय, आचार्य नागार्जुन आंतरराष्ट्रीय उच्च बौद्ध शिक्षण केंद्र यांचा समावेश आहे.
बौद्ध स्थळांमधून एकत्र केलेले ऐतिहासिक शोध लागलेले शिल्प आणि वस्तू बुद्ध वनम मध्ये ठेवण्यात आली आहेत. महा स्तुपाच्या भिंतींवर बारीक कोरीव कामं आहेत ज्यामध्ये बुद्धांच्या जीवनाची झलक दाखवण्यात आली आहे. तेलंगणात आधीपासूनच समृद्ध बौद्ध इतिहास असल्याने पर्यटन विभागाने बौद्ध सर्किट विकसित करण्यास सुरुवात केली.
2015 मध्ये हा प्रकल्प सुरु करण्याची कल्पना समोर आली आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी नागार्जुन सागरला भेट दिली. त्यावेळी ही कामे सुरु करण्यासाठी तातडीने 25 कोटी रुपये मंजूर केले होते.
हा प्रकल्प कधी सामान्य नागरिकांसाठी खुला केला जाईल आणि त्याचे उद्घाटन कोण करेल हे अजून निश्चित नाही. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना या उद्घाटनासाठी आमंत्रित केले जाईल, असे एका अधिकाऱ्याने यापूर्वी सांगितले होते.
नागपूरचे प्रसिद्ध बुद्धिस्ट आर्किटेक्ट संदीप कांबळे यांचे विशेष योगदान
नागार्जून सागर येथे होत असलेल्या बुद्धवनम प्रोजेक्टसाठी नागपूरचे प्रसिद्ध बुद्धिस्ट आर्किटेक्ट संदीप कांबळे यांनी प्रोजेक्ट सल्लागार म्हणून काम केलं आहे. या आधीही त्यांनी औरंगाबाद येथे ”लोकुत्तरा भिक्खू ट्रेनींग सेंटर” बांधलेलं आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक बौद्ध लेणी, तरी राज्य सरकार उदासीन
महाराष्ट्र राज्य बौद्ध लेण्यांनी समृद्ध असून जगभरातील लाखो पर्यटक अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी येत असतात. मात्र लेणी कडे जाणारे रस्ते, राहण्याची व्यवस्था, मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक लेण्यांमध्ये कोणत्याच सुविधा नाही, तर काहींमध्ये अतिक्रमण झालेले आहे.
राज्य सरकारला तेलंगणा राज्यासारखे नवीन प्रकल्प उभारण्याची गरज नाही. मात्र जे ऐतिहासिक हेरिटेज स्थळ आहेत, त्यांचे जतन करून पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा दिल्यास पर्यटक वाढतील. याकडे राज्याचे पर्यटन मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.