जगभरातील बुद्ध धम्म

दिवाळी सण का साजरा करतो? दिव्यांची आरास व त्याचा हेतू

आपण भारतीय लोक दिवाळी सण मोठा दणक्यात साजरा करतो. हा दिवाळी सण का साजरा करतो, त्याची वेगवेगळी धार्मिक कारणे आहेत. दोन हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळात सुद्धा दिव्यांची आरास केली जात होती. पण त्यावेळी त्याचा हेतू काय होता, हे आता पूर्णपणे विस्मरणात गेले आहे किंवा दुषित करण्यात आले आहे.

सम्राट अशोक राजाने धम्मप्रसार करण्याकरिता अनेक देशांत धम्मदूत पाठविले. धम्म इतर देशांत गेला, त्याचबरोबर त्याच्या चालीरीती व सण साजरे करण्याच्या पद्धती अनेक पूर्वेकडील देशात गेल्या व तिथे त्या रुजल्या. त्यामुळे सण साजरा करण्याची कारणे त्या देशात शुद्ध स्वरूपात राहिली. इकडे मात्र भारतात परकीय आक्रमण, व संपुष्टात आलेला राजकीय आश्रय यामुळे धम्म लयास गेला. पण तिथीप्रमाणे येणाऱ्या सणांचे अस्तित्व तेवढे येथील समाज जीवनात राहिले. कालांतराने सणांची धार्मिक कारणे व त्यांच्या कथा यात भेसळ केली गेली. त्यामुळे हळूहळू पूर्णपणे सणांचे मूळ उद्दिष्ट लोप पावले.

म्हणून आज भारतातील कोणताही सण साजरा करताना त्याचे मूळ उद्दिष्ट शोधावे. या सणांमध्ये ठळकपणे गुरूपोर्णिमा, कोजागिरी पोर्णिमा, नारळी पोर्णिमा( रक्षा बंधन- म्हणजेच मनगटाला धागा बांधण्याचे मनीबंधन ), वट पोर्णिमा (बोधिवृक्षास प्रदक्षिणा घालून बुद्धांप्रती वंदन करणे), विजयादशमी, दिवाळी, श्रावण ( बुद्ध गाथांचे श्रवण करणे-वर्षावास) असे सण येतात. आणि या सणांचे मूळ शोधायचे असेल तर परदेशातील पूर्वेकडील देशांत याच काळात साजरे होणारे सणांचे स्वरूप पहावे. त्याची कारणे पाहावीत. कारण ती कारणे त्या देशात धम्म शुद्ध स्वरूपात राहिल्याने खरी मानण्यास हरकत नसावी. म्यानमारमध्ये सुद्धा हा दिव्यांचा उत्सव साजरा होतो, परंतु त्याचे कारण हे आहे की, पावसाळा संपल्यावर वर्षावास हा आश्विन पौर्णिमेला समाप्त झाला. त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा संघ परत धम्मप्रसार करण्यास बाहेर पडले. त्यामुळे आनंदित होऊन लोकांनी त्याकाळी दिव्यांची आरास करून त्यांचे स्वागत केले. हे कारण दीपोत्सव करण्यामागे आहे.

या प्रसंगी म्यानमारमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर दिव्यांची आरास करतात. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. विविध खाण्यांच्या पदार्थांचे स्टॉल लागतात. तसेच खेळणी, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व घरगुती सामान यांचे स्टॉल उभारतात. यावेळी लोक पॅगोडा आणि मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन भिक्खूसाठी गरजेच्या वस्तू, औषधे, फळे व भोजनदान करतात. थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद घेतात. लाओसमध्ये सुद्धा या सणाला ‘लई हुवा फाई’ असे म्हणतात. मेणबत्त्या व फुलांच्या माळा लावून बुद्धविहारे सुशोभित केली जातात. थायलँडमध्ये ह्याला ‘लोई क्रॅथोगं’ म्हणतात. यावेळी पाण्यात तरंगते दिवे सोडतात. तर काही ठिकाणी आकाश दिवे सोडले जातात. चीनमध्ये हा सण गेल्या दोन हजार वर्षांपासून साजरा होतो. तेव्हाचा सम्राट मिंग हा बौद्ध अनुयायी होता. आणि त्याने विहारातील दिव्याप्रमाणे घराबाहेर कंदील लावण्याची आज्ञा दिली असा उल्लेख आहे. परंतु जपान व तैवान देशाप्रमाणे हा सण फेब्रुवारीत साजरा होतो.

थोडक्यात आपल्या भारतीय सणांचा उगम तपासल्यास तो श्रमण संस्कृतीपाशी जाऊन थांबतो, हे सत्य आहे. तेव्हा सण साजरे करा अथवा करू नका. मात्र काल्पनिक बनावट कथांच्या मागे धावण्यात हशील नाही.

-संजय सावंत

4 Replies to “दिवाळी सण का साजरा करतो? दिव्यांची आरास व त्याचा हेतू

  1. बौद्ध धम्मामध्ये दिवाळी सण साजरा करणे योग्य आहे का????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *