इतिहास

सम्राट अशोकाचे प्रमुख १४ शिलालेख

संपूर्ण जगात आपल्या असामान्य कर्तृत्त्वाने “सम्राटांचा सम्राट” हा गौरवोद्गार लाभलेला हा एकमेव सम्राट! राज्याभिषेकाच्या ९व्या वर्षी, शस्त्र म्यान करून केवळ मैत्री आणि धम्माच्या विचारांवर जवळपास ४० वर्षे राज्य करणारा जगातील हा एकमेवादित्य सम्राट होय.

भारतातील सर्वात पहिला लेख, सर्वात पहिली लेणीं, शिल्पकला, स्तूपस्थापत्य, अतिशय गुळगुळीत करून उभारलेले स्तंभ, महामार्गाच्या दुतर्फा झाडे, मनुष्य व प्राण्यांसाठी दवाखाने आणि फार्मसी…अशी अनेक गोष्टी या सम्राटाने लोककल्याणासाठी केल्या ज्या आजच्या राज्यकर्त्यांना एक आदर्श मार्गदर्शिका होईल. भ. बुद्धांच्या आयुष्यातील सर्व ठिकाणे शोधून काढून तेथे स्तूप बांधले किंवा स्तंभलेख उभारले. महाबोधी महाविहार याची उभारणी अशोकाने केली. भ. बुद्धांच्या अस्थी शोधून काढल्या व त्या व्यवस्थित आदरपूर्वक वेगवेगळ्या स्तूपांत जपून ठेवल्या. सम्राटाने हे सर्व केले नसते तर कदाचित बुद्ध या देशात होऊन गेले यावर कोणाचा विश्वास बसला नसता!

या सम्राटाच्या नावाचा शोध जरी जेम्स प्रिन्सेप याने १८३६ साली लावला असला तरी लिखित पुरावा सापडला तो १९१५ साली…आणि त्यावेळेस या सम्राटाची पुन्हा नव्याने ओळख या जगाला झाली.

सम्राट अशोकाने लोककल्याणाच्या हेतूने आपल्या प्रचंड राज्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी अनेक शिलालेख कोरून ठेवले. राज्यातील सर्व लोकांसाठी व येणाऱ्या सर्व पिढीसाठी ही आदर्श जीवन पद्धत एक अभ्यास ठरेल या हेतूने ते कोरण्यात आले होते. या १४ शिलालेखां व्यतिरिक्त सम्राट अशोकाने अनेक लघु, स्फुट व लेणीं शिलालेख कोरले आहेत. भारतात त्या कुठल्या ठिकाणी आहेत याचा नकाशा दिला आहे. खाली १४ शिलालेखांचे शब्दशः भाषांतर नसून, भावार्थ आहे.

१. पूर्वी प्रियदराशी राजाच्या भटारखान्यात हजारों प्राणी मारले जात. आता धम्म समजल्यामुळे, येथून पुढे पशु हत्या निषेध आहे.

२. संपूर्ण राज्यभर तसेच इतर राज्यांच्या सीमेवर देखील मनुष्य आणि जनावरांसाठी हॉस्पिटल आणि फार्मसी ची सोय. तसेच या फार्मसी जवळ औषधी वनस्पतींची लागवड. मनुष्य आणि पशूंसाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडे व पाणपोई.

३. दर पाच वर्षांनी, राज्यातील सर्व कमिश्नर आणि कलेक्टर यांनी आपल्या हद्दीतील सर्व गावांना भेटी देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. तसेच सर्व लोकांनी आपल्या आई वडील, मित्र परिवार, ब्राह्मण, श्रमण यांचा आदर केला पाहिजे. सर्वांशी प्रेमाने बोलायला हवे.

४. माझे सर्व पुत्र, पौत्र, प्रपौत्र मी दाखविलेल्या नीतीमार्गावर चालणार आहेत व हीच अपेक्षा मी माझ्या प्रजे कडून करत आहे.

५. माझे अनेक दूत राज्यभर विखुरले आहेत. सर्व लोके सर्व व्यवहारात नीतिमत्ता पाळतात का याकडे त्यांचे लक्ष असेल. तसेच कोणता अधिकारी लोकांना उगीचच छळतोय अथवा त्यांच्याशी अन्यायकारक वागतो का हे ते पाहतील.

६. मी शयनकक्षेत असो अथवा बागेत अथवा अंतःपुरात, माझ्या राज्याची मला प्रत्येक बातमी समजली पाहिजे म्हणजे लोककल्याणाच्या निर्णय मला ताबडतोब घेता येईल. दिवसातील माझा प्रत्येक प्रहर हा लोकांसाठीच असेल, माझं उर्वरित संपूर्ण आयुष्य त्यांच्यासाठीच असेल.

७. प्रत्येक मनुष्याला उत्कर्ष करायचा असतो, मात्र त्याच्यात तेवढी नैतिकता, सजगता आणि तळमळ असेल तरच तो तेथे पोहचू शकेल. माझ्या राज्यात प्रत्येक माणसाला ही संधी असेल मग तो कुठलाही पंथ मानणारा असो.

८. पूर्वी प्रियदर्शी राजा शिकारी साठी लांब यात्रा करायचा मात्र येथून पुढे त्याच्या यात्रा लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निवारण्यासाठीच असेल.

९. लोकं उत्सवात किंवा लग्नात प्रचंड खर्च करतात मात्र या दिखाव्यामुळे कुठलेही नीतिमान कार्य होत नाही. त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या घरातील नोकर चाकर, शेजारी, मित्रपरिवार व सगळ्यांशी प्रेमाने वागावे. त्यामुळे त्यांचे जीवन नीतिमान होईल व त्यांना पुण्य लाभेल.

१०. खरी प्रतिष्ठा ही सत्ता आणि पदावर अवलंबून नाही तर लोककल्याणासाठी तुमची किती तळमळ आहे यावर प्रतिष्ठा ठरते. लोककल्याणाच्या विचार करणे हा धम्म आहे. लोकांनी खऱ्या प्रतिष्ठेचा अवलंब करावा.

११. लोकधर्म पाळणे या सारखे धर्मदान नाही. आपला मित्र परिवार, नोकर, नातेवाईक, समाजातील प्रत्येक घटक यांच्या बद्दल आपल्याला मैत्री असायला हवे. त्यांच्या सुख दुःखात आपण त्यांना सदोदित मदत केली पाहिजे. हीच धम्माची शिकवण आहे. तेच सर्वश्रेष्ठ धर्मदान होय.

१२. प्रत्येक धर्मात चांगले विचार असतात. ते समजून न घेता दुसऱ्या धर्माला नावे ठेवणे चुकीचे आहे. असे केल्याने तुम्ही तुमच्या धर्माची कमकुवत शिकवण दाखवता. त्यापेक्षा चर्चा करा, दुसऱ्या धर्माची शिकवण समजून घ्या. यातच सर्वांचे कल्याण आहे.

१३. कलिंगातील युद्धात मारलेले लाखों सैनिक पाहून प्रियदर्शी राजाचे मन दुखी झाले आहे. येथून पुढे जग जिंकायचे ते केवळ धम्माच्या मार्गाने. हाच मार्ग योग्य आहे.

१४. हा धम्म प्रियदर्शी राजाने अनेक ठिकाणे कधी लघु, कधी मध्यम तर कधी दीर्घ स्वरूपात लिहिले आहेत. त्याचे कारण म्हणजे तेथे उपलब्ध असलेला दगड. तसेच काही ठिकाणी माझे लेख अर्धवट किंवा चुकीचे शब्द असतील तर ती सर्वस्वी चुकी तेथील लिपिकाराची आहे.

अतुल भोसेकर, नाशिक (लेखक – ज्येष्ठ बौद्ध लेणी आणि इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *