बातम्या

‘रामायण’ मालिकेतील श्रीरामाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याने बौद्ध धम्म स्वीकारला?

२०१२ साली झी टीव्हीवरील रामायण मालिकेतील श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते गगन मलिक यांनी श्रीलंकेच्या सिरी सिद्धार्थ गौतम चित्रपटात भगवान बुद्धांची भूमिका साकारली होती. त्यानंतर गगन मलिक यांनी आपण बुद्धांच्या विचारांनी प्रभावित झालो असून बौद्ध झाल्याचे माध्यमांना अनेकदा सांगितले आहे. तसेच मागील काही वर्षांपासून गगन मलिक हे बौद्ध धम्माचा प्रसार करण्याचे कार्य जगभरातील विविध देशात जाऊन करीत आहेत.

गगन मलिक यांचा जन्म दिल्ली येथील आहे. त्यांना लहान असल्यापासून अभिनयाची आवड होती. त्यासोबतच रामलीला मध्ये रामाची भूमिका साकारत असे, पुढे मॉडेलिंग मध्ये करिअर सुरु केले. त्यानंतर स्टार प्लस आणि झी टीव्ही सारख्या चॅनेलवरील प्रसिद्ध मालिकेत विविध भूमिका साकारल्या. २०१२ साली झी टीव्हीवर रामायण मालिका सुरु झाली. या मालिकेत श्रीरामाची असलेली प्रमुख भूमिका साकारण्याची संधी गगन मलिक यांना मिळाली. त्यामुळे घराघरात श्रीराम म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

२०१३ साली गगन मलिक यांना श्रीलंकामध्ये भगवान गौतम बुद्धांवर तयार होणाऱ्या चित्रपटासाठी ऑफर आली. श्रीलंका सरकार अनेक वर्षांपासून ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ या चित्रपटासाठी एक भारतीय चेहरा शोधत होते. त्यांना गगन मलिक हे भगवान गौतम बुद्धांच्या भूमिकेत योग्य वाटले. यासाठी श्रीलंका भिक्खू संघाकडून गगन मलिक यांना बौद्ध धम्माचे आचरण करण्याचे शिक्षण दिले. गगन मलिक यांना या भूमिकेसाठी अनेक परीक्षा द्यावा लागल्या त्यानंतर भगवान बुद्ध यांची भूमिका साकारण्याची परवानगी मिळाली.

‘सिरी सिद्धार्थ गौतम’ हा चित्रपट तयार करण्यास ५ ते ६ वर्ष लागले कारण त्यातील प्रत्येक दृश्य श्रीलन्केतील भिक्खूसंघाचे महानायक यांना दाखवूनच ते योग्य आहे का? याची तपासणी करून परवानगी असेल तरच पुढची शूटिंग होत असे. या चित्रपटाने श्रीलन्केत आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. श्रीलन्केसोबतच ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ हा चित्रपट थायलंड, मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हियेतनाम आदी देशात लोकप्रिय झाला. या चित्रपटातील भूमिकेमुळे गगन मलिक यांना वर्ल्ड बुद्धिस्ट फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला.

गगन मलिक यांच्यावर ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपटाची भूमिका करताना बुद्धांच्या विचारांचा इतका प्रभाव झाला की त्यांनी बौद्ध धम्म आचरण करायला सुरुवात केली. भारतात आल्यावर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अभ्यास केला. त्यानंतर भारतात पुन्हा बुद्ध धम्म प्रसार करण्याचे कार्य जोमाने करावे लागेल असे म्हणत धम्म कार्यात झोकून दिले. नागपूर असो की बोधगया या भागात विविध धम्म कार्यात सहभागी होत असतात.

श्रीलंका, थायलंड, मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया आणि व्हियेतनाम आदी देशात गगन मलिक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यासोबतच दिग्गज राजकीय नेते तसेच बौद्ध भिक्खू यांच्याकडून गगन मलिक यांना मोठा सन्मान केला जातो.

Buddham Saranam Gachhami.Jai BhimAfter my journey as a Buddhist for 5yrs I have decided to go on a mission following…

Posted by Gagan Malik on Thursday, September 5, 2019

८४ हजार बुद्धमूर्ती दान करणार

सम्राट अशोकाने जंबुद्वीपात ८४ हजार बौद्ध स्तूप उभारून बौद्ध धम्माला कायमचेच या भूमीत रुजवले होते. या ऐतिहासिक बौद्ध स्तूपांच्या समरणार्थ गगन मलिक यांच्या संकल्पनेतून भारतात ८४ हजार भगवान बुद्धांच्या मूर्ती दान करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. नुकतेच ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनर्वाण दिनी बोधगया येथे १०० बौद्ध मूर्ती दान करण्यात आले आहेत. यापूर्वी नागपूर येथे या उपक्रमाची सुरुवात झाली होती.

छायाचित्र – झी टीव्ही रामायण मालिकेतील स्क्रीनशॉट आणि अभिनेते गगन मलिक यांच्या फेसबुक वॉलवरून…

धम्मचक्र वेबसाईटवर कोणत्याही धर्माच्या प्रतिकांवर टीका अथवा टिपणी केली जात नाही. बौद्ध इतिहास आणि तत्वज्ञान यांची माहिती विविध पुस्तक, संदर्भ, घटना आणि लेखकांचे विचार मांडले जातात.

3 Replies to “‘रामायण’ मालिकेतील श्रीरामाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याने बौद्ध धम्म स्वीकारला?

  1. नमो बुद्धाय मलिक जी …. आपके धम्म कार्य के लीये पंचम प्रणाम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *