ब्लॉग

‘या’ प्रसिद्ध कॉमिक्समधून बौद्ध संस्कृती व भारतीय समाज जीवनाची झलक पहावयास मिळते

‘टिनटिन’ या प्रसिद्ध कॉमिक्सचा जनक जॉर्जेस रेमी हा १९८३ मध्ये निवर्तला. पण त्याने रेखाटलेली ‘टिनटिन’ ही हास्यचित्र पुस्तके जगभर यशस्वी झाली. गेल्या ५०-६० वर्षात जगभर लाखों लहानथोरांनी ती वाचली व अजूनही वाचत आहेत.

या कॉमिक्स मधील वेगवेगळ्या व्यक्तिरेखांची चित्रे पाहून हसू येते. तशीच त्याची सुलभ इंग्रजी भाषा मुलांना खूप आवडते. ही व्यक्तिरेखाच अशी होती की मुलांना तो आपल्या जिवलग मित्र वाटे. त्याच्या कुत्र्याचे स्नोई. हा जितका धांदरट तितकाच हुशार सुद्धा आहे आणि गुन्हे शोधण्यात तो टिनटिनला मदत करतो. त्याचे इतर दोन मित्र म्हणजे कॅप्टन हॅडॉक व प्रोफेसर कॅल्क्युलस. या व्यक्तिरेखा सुद्धा जॉर्जस् रेमी यांनी अशा रेखाटल्या आहेत की माणसाच्या स्वभावातील विशिष्ट पैलूंचे दर्शन घडते.

टिनटिनच्या प्रत्येक साहस मोहिमेबरोबर हे दोघे असतात आणि त्यांच्या स्वभावातील गमतीमुळे ही कॉमिक्स खूप रंगतदार होतात. अशीही टिनटिन हास्यचित्र पुस्तके ‘The Adventure of Tintin’ या नावांनी प्रसिद्ध आहे. जगातील अनेक भाषांमधून तिच्या आवृत्त्या निघाल्या आहेत. भारतामध्ये हिंदी व बंगाली भाषेतून तिची आवृत्ती निघाली आहे.

जॉर्ज रेमी यांच्या ‘टिनटिन इन तिबेट’ व ‘व्हॅली ऑफ कोब्रा’ या कॉमिक्समधून बौद्ध संस्कृती व भारतीय समाज जीवनाची झलक पहावयास मिळते. ‘टीनटिन कॉमिक्स’ शिवाय गॉस्कीनी यांनी लिहिलेली व उडेरझो यांनी रेखाटलेली ‘ऍस्टेरिक्स’ नावांची कॉमिक्स सुद्धा खूप लोकप्रिय आहेत.

इंग्रजीतील अशी ही समृद्ध कॉमिक्स मुलांना आवश्यक वाचायला द्या. त्यांची इंग्रजी भाषा ही सुधारेल आणि जगातील माणसांच्या विविध स्वभावांचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू समजतील. त्यातील रंगीत चित्रे भुरळ घालतील.

कॉमिक्स वाचल्याने मुलांमध्ये वाचनाची गोडी अधिक वाढते. तसेच अभिजात साहित्यांचे वाचन केल्याने तिळातीळाने मनाची मशागत होत जाते. वाचनाने आपण सामान्य माणूस म्हणून जगत असलो तरी मनाने ऐश्वर्यसंपन्न बनतो. वाचायचे ते मन समृद्ध करण्यासाठी. अधिक चांगले व्यक्तीमत्व घडण्यासाठी. आणि वाचनासारखा दुसरा आनंद जगात कसलाच नाही.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहासाचे अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *