ब्लॉग

खारघरच्या डोंगरात प्राचीन बौद्ध विहार

नवी मुंबई मधील खारघर हे सर्वात मोठे शहर असून ते काळा कातळ असलेल्या डोंगरा जवळ विकसित झालेले आहे. जवळच्या सीबीडी पासून सुरू झालेली येथील डोंगराची रांग ही पार शिळफाट्याच्या पुढे मुंब्र्या पर्यंत जाते. व पुढे पारसिक टेकडीला जाऊन मिळते. इथला काळा कातळ पाहता या डोंगरांच्या रांगेत एखादे बौद्ध विहार नक्कीच असावे असे पूर्वी वाटत असे. कारण नवीन विमानतळ होत असलेल्या जागे जवळ देखील डोंगर होता व तेथे केरुमाता लेणे होते.

पनवेल तालुक्यात डूगिं लेणी, वाघोलीवाडा पारगाव, रानुमल, दापोली, माघर, मोसरा, पाटलोनी ही पडझड झालेली विहारे दिसून येतात. शिळफाटा जवळील डोंगरात व पारसिक हिल डोंगरात देखील लेण्या सदृश विहारे दिसून येतात. पण तेथे जाण्याच्या वाटा अवघड झालेल्या आहेत. खारघर येथील टेकडीवर उभे राहिले असता देखील कल्याणच्या मलंग गडाचे ( हजारो वर्षांपूर्वीचा “मंगल” गड ) चार सुळके दिसतात.

डाऊनलोड करा – आपल्या हक्काचे JAI BHEEM – SHORT VIDEO APP

अशा या खारघरच्या पांडवकड्या जवळ देखील असेच एक मानव निर्मित खोदलेले चौकोनी विहार दृष्टीस पडते. दुरून पाहिले असता ते प्राचीन बौद्ध लेणे नक्कीच असावे असे अनुमान काढता येते. परंतु तेथे जाणे हे सामान्यजनांना खूपच अवघड व धोकादायक आहे. काळाच्या ओघात तेथील कलाकुसर नष्ट झाली असावी. परंतु त्यांची रचना पाहता तेथे पूर्वी भिक्षुंचे निवासस्थान व विहार नक्कीच असावे यास पुष्टी मिळते. तरुण पिढीतील एक हुन्नरी युवक हरिसिमरन नुकताच या अवघड जागी जाऊन आला. त्याने घेतलेल्या छायाचित्रावरून ते एक छोटेसे विहार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तेथे पूर्वी नक्कीच आजुबाजूस स्तूप असावा पण धबधब्याच्या जोरदार प्रवाहामुळे किंवा भूकंपामुळे निखळून गडगडत खाली गेला असावा. या विहारावरून हे स्पष्ट होते की नवी मुंबईतील खारघर हे एकेकाळी बेडसे गावासारखेच असावे. कारण दोन्ही गावांची व तेथील लेण्यांची भौगोलिक परिस्थिती सारखीच दिसून येते. यदाकदाचित पुढेमागे खारघर धबधब्याच्या ठिकाणी असलेल्या उंचवट्याच्या जागी उत्खनन झाले तर ढासळलेले प्राचीन अवशेष नक्कीच सापडतील.

विहारा मधून समोरचे दिसत असलेले खारघर शहराचे विहंगम दृश्य.

मुंबई हे जगातील असे एकच बेट आहे ज्याच्या आजुबाजुस असंख्य लेण्या खोदलेल्या आढळतात. यामध्ये विरारची जीवदानी लेणी, मागाठाणे लेणी, मंडपेश्वर लेणी, कान्हेरी लेणी, लोणाड लेणी, कोंडीवटे लेणी, घारापुरी स्तूप असे असंख्य बौद्ध संस्कृतीचे अवशेष आढळतात. दुर्लक्ष केल्याने आज अनेक ठिकाणी त्यांची पडझड झाली आहे तसेच तेथे अतिक्रमण झाले आहे. म्हणूनच प्राचीन लेणी अवशेष व सुंदर धबधबा असलेल्या खारघरच्या डोंगरात खोदकामास खाण मालकांना मंजुरी दिल्याने खूप वाईट वाटते.

येथे मोठमोठे सुरुंग लावून निसर्गाचा विध्वंस करणे चालू झाले आहे. येथील दगड माती वाहून नेण्यात येत आहे. यामुळे खारघरची नैसर्गिक संपत्ती देखील नष्ट होत चालली आहे. धुळीचे साम्राज्य वाढत आहे. तरी डोंगर बकाल दिसण्याआधी शासनाने येथील खाणीवर तात्काळ बंदी घालून निसर्गाचा होत असलेला ऱ्हास थांबवावा. प्राचीन विहार अवशेष हा आपला सांस्कृतिक वारसा असल्याने त्याचे जतन व्हावे असे कळकळीने वाटते.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)