बुद्ध तत्वज्ञान

मरणाला सामोरे जाण्याची कला

भगवान बुद्धांनी अनेक सुत्तामध्ये सांगितले आहे की शरीर हे एके दिवशी रोगग्रस्त होणार आहे, एके दिवशी परिपक्व होणार आहे आणि नंतर त्याचा क्षय होणार आहे. थोडक्यात मृत्यू होणार आहे. पण ती एक मंगल घटना आहे. अमंगल असे काही नाही. नवीन जीवनाची सुरुवात आहे. परंतु त्याबाबत जनमानसामध्ये अनामिक भीती दिसते. त्याबाबत कोणीही बोलायला तयार नसते. अनेकांना असे बोलणे म्हणजे अशुभ वाटते. लहानपणापासून झालेल्या संस्कारामुळे मनात मरणाविषयी अनामिक भीती असते. या जगात वृद्धत्व प्राप्त न व्हावे, व्याधीग्रस्त न व्हावे किंवा मृत्यू न यावा याची आजपर्यंत कोणीही हमी दिलेली नाही व देणार ही नाही. तरीही हे जग सोडून जाण्याच्या भीतीने मनुष्यप्राणी चिंतीत होत असतो, संत्रस्त होत असतो.

परंतु जे ज्ञानी आहेत ते जाणतात की या पृथ्वीतलावर सर्व प्राणी मरणधर्मी आहेत. जन्म जसा झाला तसे मरण सुद्धा निश्चित आहे. या संसाराचे हेच सत्य आहे की ज्याचा उदय झाला त्याचा एकदिवस अस्त होणार आहे. व्यय होणार आहे. जे प्रज्ञावान आहे ते जाणतात की मृत्यु पासून बचाव करण्याचा कोणताही उपाय नाही. अगदी अवकाशात, समुद्राच्या तळाशी किंवा पर्वतातील गुहेत जरी लपून बसले तरीही मृत्यूपासून बचाव नाही. मग असे काय करावे की संध्याछायाचे, व्याधींचे, मरणाचे भय वाटणार नाही ? उलट मृत्यूला आनंदाने सामोरे जाता येईल. यासाठी नियमित ध्यानधारणा करून मन विकारमुक्त करणे हाच एक महत्वाचा उपाय बुद्धांनी उपदेशीला आहे.

बाहेर कोणतीही घटना घडो, निर्मळ मन विकार जागवत नाही. दुःखी होत नाही. ध्यानधारणेने मन भयमुक्त होते. निर्मळ होते. शुद्ध होते. यामुळे आम्ही निर्विकार होतो. स्वस्थ राहतो. सुखी राहतो. म्हणून जीवन आनंदी, उत्साही, भयमुक्त आणि रोगमुक्त जगण्यासाठी नियमीत ध्यानसाधना करणे आवश्यक आहे. जे ध्यानधारणेचा नियमित अभ्यास करतात त्यांच्यासाठी मृत्यू हा मंगल असतो, भयावह नसतो. आनंदी असतो, तिरस्कारयुक्त नसतो. जेव्हा वेळ परिपक्व होते तेव्हा निसर्गाच्या या नियमाला कोणी टाळू शकत नाही. अभ्यासू साधक आनंदाने मृत्यूला सामोरे जातो. शारीरिक पीडा असली तरी विचलित होत नाही, घाबरत नाही. अविचल राहतो. जागृत राहतो. अशा प्रज्ञावंत व्यक्तीची नवीन जीवनाची चित्तधारा ही सद्गती क्षेत्रातच होते, दुर्गति क्षेत्रात होत नाही.

यासाठी मनुष्याने स्वतः ओळखले पाहिजे, जाणले पाहिजे की बहिर्मुखी किती दिवस राहणार ? आयुष्यभर पैसा-अडका, कपडेलत्ता, जमीन-जुमला, अधिकार, संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी धावपळ केली. परंतु कधी अंतर्मुख होऊन शरीराकडे लक्ष दिले नाही. शरीरप्रपंच, चित्तप्रपंच जाणला नाही. आयुष्यभर मनोविकार जागवील्यामुळे व्याकुळता वाढली आहे. क्रोध वाढला आहे. हाव वाढली आहे. सहनशीलता नष्ट झाली आहे. या सर्व बाबींचा परिणाम शरीरावर होत आहे. अंतर्मनावर होत आहे. हे जेवढे लवकरात लवकर संसारात मग्न झालेल्यांना उमजेल तेवढे चांगले. प्रकृतीचा स्वभाव जेव्हा लक्षात येईल तेव्हा सर्व दुःखातून बाहेर पडणे सोपे होईल. हाच खरा धम्म जो सत्याचे दर्शन देतो. भय आणि चिंता यांना दूर सारतो.

अंगुत्तर निकायमध्ये अभय सुत्तात भगवान बुद्ध म्हणतात “मनुष्य अधर्मी असल्याने मृत्युला भीत असतो. मृत्यूमुळे संत्रस्त होत असतो.जो कामभोगात रमलेला असतो, शरीराविषयी आसक्त असतो, ज्याने आयुष्यात कधी कल्याण कर्म केलेले नसते, धम्माप्रती शंकेखोर असतो, धम्माविषयी संदेहयुक्त असतो अशा मनुष्यास रोग, व्याधी जडल्यावर तो मृत्यूच्या भीतीने भयभीत होत असतो, चिंता करीत असतो, छाती बडवत असतो, आक्रोश करत असतो.”

“परंतु जो कामभोगा विषयी, शरीराप्रती आसक्त नसतो, ज्याने कल्याण कर्म केलेले असते, जो धम्माप्रती चिकित्सा युक्त नसतो, संदेहयुक्त नसतो त्यास व्याधी जरी जडल्यास, रोग झाल्यास भयानक आजारांच्या अवस्थेत देखील तो चिंता करीत नसतो, क्लेशयुक्त होत नसतो, रडत-आक्रोशत नसतो, छाती बडवीत नसतो, बेहोश होत नसतो. असा मनुष्य मरणधर्मी असूनसुद्धा मृत्युला भीत नसतो. मृत्यूमुळे संत्रस्त होत नसतो”. म्हणून शील-समाधी-प्रज्ञा यांचा योग्य अर्थ जाणून घेतला पाहिजे. अष्टांगिक मार्गाची चर्चा न करता तो अनुभूतीने जाणला पाहिजे. तरच आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण धम्माप्रती प्रामाणिक राहू शकू. कर्मकांड, अंधश्रद्धा यांना थारा न दिल्याने मनाची शुद्धता, निर्मलता पदोपदी अनुभवू.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)