जगभरातील बुद्ध धम्म

बामियानची बुद्ध प्रतिमा; तालिबान्यांनी बुद्धमुर्त्यां उध्वस्त केल्यानंतर इथली रयाच गेली

मार्च २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या भूमीवर उभी असलेली दोन बुद्ध शिल्पे तालिबानी या अतिरेकी संघटनेने नष्ट केली. एका शिल्पाची उंची ५५ मीटर तर दुसऱ्याची उंची ३७ मीटर होती. सारे जग हळहळले. अफगाणिस्तानचा मोठा सांस्कृतिक वारसा नष्ट झाला.तालिबान्यांचे हे कृत्य आठवडाभर चालले होते. तोफगोळे आणि स्फोटके वापरून उभ्या असलेल्या अवाढव्य बुद्धमुर्त्यां उध्वस्त करण्यात आल्या. तेथे खाली त्याचा ढीग साचला. स्वतःचीच प्राचीन संस्कृती आंधळ्या तालिबान्यांनी नष्ट केली. अमेरिकेचा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा देखील तिथे आरामात बसेल एवढे मोठे बुद्धशिल्प तेथे होते. मूर्तीच्या पाठीमागे वालुकामय खडकातून वर जाण्यासाठी तेथे भुयारी मार्ग आहे. पायऱ्या चढून तेथे मूर्तीच्या माथ्यापर्यंत जाता येते. तो मार्ग मात्र शाबूत राहिला आहे. अनेक कमानी, चौकटी यावरील बुद्धचित्रे आणि गोल घुमट असलेल्या विहारातील बुद्ध प्रतिमा विद्रूप करण्यात आल्या.

या गोष्टीस १९ वर्ष झाली. परंतू आजही बुद्धमूर्ती पुन्हा घडवून तेथे उभ्या कराव्यात कि नाही याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमत झालेले नाही. कारण या बुद्धमूर्ती पुन्हा उभ्या करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्याचे संकल्पन व अंदाजपत्रक तयार केले आहे. परंतु जगातील सर्व पुरातत्त्ववेत्त्यानी आणि अभियंत्यांनी बुद्धमूर्ती पुन्हा उभी करणे खूप कठीण आणि खर्चिक असल्याचे सांगितले आहे. यासाठी २०१७ मध्ये टोकियो येथे शास्त्रज्ञ, अभियंते, पुरातत्ववेत्ते, युनेस्को, अफगाणी अधिकारी व देणगीदार यांची मोठी परिषद भरली होती. परंतु त्या परिषदेमध्ये बुद्धमूर्ती पुन्हा उभारणे बाबत काहीच ठोस निर्णय झाला नाही. सर्वेक्षण व अभ्यास करण्यासाठी सगळयांनी वेळ मागून घेतला.

इ.स.५५० मध्ये बौद्ध संस्कृती बहरलेली असताना या बुद्धमूर्ती तेथे कोरल्या गेल्या होत्या. तेथील गुहेमध्ये, विहारात, गावात आणि संघारामात हजारो भिक्खूं यांची दररोज वर्दळ होत होती. प्रार्थना, सुत्त पठण यांचे ध्वनी दुमदुमत होते. इ.स.६२९ मध्ये चिनी भिक्खू हुएनत्संग सुद्धा इथे आले होते. दीड हजार वर्षानंतर आज फक्त येथे खंडहर आहे. युनेस्कोने हा सर्व प्रदेश जागतिक वारसा यादीत असल्याचे घोषित केले आहे. मागील वर्षी चीनमधील एका धनाढ्य दाम्पत्याने किंमती थ्रीडी लाईट प्रोजेक्टर अफगाणिस्तानच्या सांस्कृतिक विभागाला दान केला. तो ठराविक दिवशी लावून उध्वस्त शिल्पाच्या जागेवर सुंदर बुद्धप्रतिमा सध्या दाखविली जाते. पण कधीकधी तेथे इलेक्ट्रिसिटी नसल्याने जनरेटर लावावा लागतो.

युनोस्कोचे क्षेत्रीय अधिकारी गुलाम रजा मोहम्मद म्हणाले की, बामियान बुद्ध आता काही परत उभा रहात नाही. त्याचे तुटून खाली पडलेले अवशेष सांभाळणे एवढेच आता हाती राहिले आहे. २०१३ पासून येथे काहीच काम झाले नाही. छोट्या बुद्धमूर्तीच्या पायाचे बांधकाम करण्यासाठी तळाशी उभी केलेली परांची व सळ्या अजून तशाच पडून आहेत. गोळा केलेले बुद्ध शिल्पाचे अवशेष शेडमध्ये बंदिस्त पडलेले आहेत. देशाच्या अस्थीर राजकीय वातावरणामुळे बुद्धप्रतिमा उभी राहणार नाही असे अनेकांना वाटते. तिथल्या सरकारकडे सध्या सुरक्षा व्यवस्थेसाठी सुद्धा पैसे नाहीत. तालिबान परत कधीतरी डोके वर काढतील अशी काहींना भीती वाटते.

थोडक्यात बामियानचे बुद्धशिल्प हरविल्यावर इथली रयाच गेली आहे. मागच्या वर्षी जून महिन्यात जेव्हा सूर्यास्त झाल्यावर पहिल्यांदा 3D प्रोजेक्टर चालू केला तेव्हा अरिफ नावाचा २८ वर्षाचा आर्टिस्ट त्रिमितीय बुद्ध प्रतिमा पाहून ढसाढसा रडला. अनेकांच्या डोळ्यातून बुद्धांची थ्रीडी प्रतिमा पाहताना अश्रू ओघळले. सगळ्यांना जुन्या बुद्ध प्रतिमेची आठवण झाली. अलीकडे अधूनमधून हा प्रोजेक्टर लावून रंगीत सुंदर बुद्धप्रतिमा पाहिली जाते. पण जेव्हा प्रोजेक्टर बंद होतो तेव्हा मग तेथे फक्त भयाण काळोख आणि शांतता उरते.

(संदर्भ : दि न्यूयॉर्क टाइम्स, दि. १८/०६/२०१९ मधील रॉड नॉर्द यांचा लेख ) सोबत युट्यूबवरील बामियान बुद्धांचा हा नवीन माहितीपट आवश्य बघावा. (Nomadic Indian चैनल)

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहासाचे अभ्यासक)