बुद्धाच्या धम्मप्रचार योजनेत धम्मदीक्षेचे दोन आयाम आहेत. अन पहिली दीक्षा म्हणजे भिक्खूची दीक्षा. भिक्खूना सामूहिकरित्या संघ म्हणून संबोधिले जाते. दुसरी दीक्षा म्हणजे गृहस्थांची ‘उपासक’ म्हणून दीक्षा. हे उपासक सामान्य धम्मानुगामी होत.
भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनपद्धतीत प्रमुख चार भेद आहेत. अन्य सर्व बाबतीत मात्र दोहोंचीही जीवनपद्धती समान आहे. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू गृहत्याग करून परिव्राजक होतो. भिक्खू आणि उपासक दोहोंनाही आपल्या दैनंदिन जीवनात काही नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
भिक्खूकरिता नियम म्हणजे व्रत. त्यांचे पालन न करणे दण्डनीय आहे. उपासकाकरिता हे नियम म्हणजे शील. त्याच्या सर्व क्षमतानिशी त्याने त्यांचे पालन करावे ही अपेक्षा.उपासक धनसंपदा धारण करू शकतो. भिक्खू धनसंपदा धारण करू शका नाही.
उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार आवश्यक नाही. भिक्खू होण्यासाठी “ उपसंपदा ” हा संस्कार आवश्यक आहे. त्याच्याकडे दीक्षेकरिता जे आले त्यांना त्यांच्या इच्छेनुसार बुद्धाने भिक्खू अथवा उपासक म्हणून दीक्षा दिली. जेव्हा इच्छा असेल तेव्हा उपासकाला भिक्खू म्हणून दीक्षित होता येते.
भिक्खूने महत्त्वांच्या व्रतांचे पालन केले नाही तर तो भिक्खू राहणार नाही. त्याने भिक्खूसंघाचे सदस्यत्व त्यागले तरीही तो भिक्खू राहणार नाही. ज्यांचा नामोल्लेख आगामी पृष्ठात आहे त्यांनाच बुद्धाने दीक्षा दिली असे मानण्याचे काही कारण नाही. निवडक दाखले दिले गेले आहेत ते हे दर्शविण्यासाठी की, बुद्धाने धम्माची दीक्षा देताना किंवा संघात प्रवेश देताना जाती किंवा लिंगाच्या आधारावर कोणताही भेद केला नाही.
संदर्भ: बुद्ध आणि त्याचा धम्म
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर