इतिहास

जनावरांचा गोठा बांधण्यासाठी पाया खणत असताना बौद्ध चैत्यगृहाचा लागला शोध

तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. तेर येथे नवीन बसस्थानकाच्या समोर जनावरांचा गोठा बांधण्यासाठी पाया खणत असताना चैत्यगृहाचा शोध लागला होता. तेर येथील असलेला चैत्य स्तुप हा येथे असणारा बौद्ध धर्माचा प्रभाव सिद्ध करतो. तेरला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते.

बौद्ध धर्मीयांचे प्रार्थनास्थळ म्हणजे चैत्यगृह होय. बौद्ध लेण्यांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार च्या वास्तु असत विहार व चैत्य. विहार हे बौद्ध भिक्खूना राहण्यासाठी असत, व चैत्य हे प्रार्थना, प्रवचन इत्यादीसाठी वापरत असत. चैत्यगृहात प्रवेश केल्यावर मोकळी जागा असते. तर समोरच्या टोकास स्तुप बांधलेला असे. या स्तुपामध्ये गौतम बुद्धांच्या किंवा त्यांच्या शिष्यांच्या अस्थी किंवा त्यांच्या वस्तु ठेवत असत व त्यांची पुजा केली जाई. पूर्ण चैत्यगृहात स्तुपाला प्रदक्षिणापथ असे. चैत्यगृहाचे विधान (ग्राउंडप्लॅन) हा चापाकृती असतो. तर वितान (सिलींग) गजपृष्ठाकार म्हणजेच हत्तीच्या पाठीप्रमाणे असते.

तेर येथील असलेला चैत्य स्तुप

हे चैत्यगृह माती व विटांपासून बनवलेला आहे. या चैत्यगृहाची लांबी 9 मीटर आणि रुंदी 5 मीटर आहे. चैत्यगृहाचे विधान हे चापाकृती आहे. चैत्याच्या वर्तुळाकृती भागापाशी विटांपासून बनविलेला स्तुप आहे. चैत्य गृहाच्या मुळ पायापासून विटांचा थर वरील बाजूस चढविलेला आहे. त्यामुळे चैत्य कसा होता याची कल्पना येते.

या चैत्यगृहाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

  • चैत्यगृहाच्या अर्धवर्तुळाकृती भागात सव्वा मीटर व्यासाचा स्तुप आहे.
  • दरवाज्यातुन आत शिरण्यासाठी तीन पाय-या होत्या परंतू जमीनीच्या पातळीत भर घालून उंची वाढविण्यात आली. याच वेळी पायऱ्या नाहीश्या झाल्या असाव्यात.
  • चैत्यगृहाच्या भिंती जाड होत्या आणि त्यातील विटांचे बांधकाम सांधेमोड रचनेत असल्याने हे बांधकाम मजबुत स्वरुपाचे केलेले आढळते.
  • विटांनी बांधलेले चैत्य स्तुप भारतात फारसे उपलब्ध नाहीत. सदरील चैत्याचे जतन व संवर्धन महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाने केले आहे. व सध्या ते पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.