ब्लॉग

एका बौद्ध शेफच्या मोलाच्या गोष्टी

जीन फिलिप सायर (Jean-Philippe Cyr) हा एक व्हेज शेफ असून तो फ्रेंच कॅनडियन वंशाचा आहे.त्याच्या व्हेज पाककृतीबद्दल तो प्रसिद्ध असून नुकतीच त्याची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. तो म्हणतो ‘करियरच्या सुरुवातीला मी नॉन व्हेज डिश तयार करीत असे. परंतु त्या करताना माझ्या मनात विचार येई की ज्या प्राण्यांना मारून आणण्यात आले आहे ते वेदनेने तडफडून मरणाला कसे सामोरे जात असतील. या विचाराने मी व्याकुळ होऊन रेस्टॉरंटमधील जॉब सोडला व आता पूर्णवेळ बुद्धिस्ट शेफ म्हणून कार्यरत आहे’.

जीन-फिलीप शेफ आता सोप्या आणि चवदार व्हेज डिश कशा बनवायच्या याचे लोकांना धडे देतो. त्याच्या चॉकलेट चिप पॅन केक्स आणि थाई रेड करी तसेच गिंगर लेमोनेड अशा बऱ्याच डिशेस विशेष प्रसिद्ध झाल्या आहेत. तो म्हणतो तुम्हाला जर बुद्धिझम स्वीकारायचा असेल तर मांसाहार खाणे शक्यतो टाळा. कारण ज्या प्राण्यांना मारून त्यांचे मांस शिजवून तुमच्या पुढे आणले आहे, त्याच्यात त्यांच्या वेदनांची तरंगे भरलेली असतात. व अशा मांसाहाराचे सेवन करणे शरीरास घातक आहे. खूप लोकांना वाटते आपण ‘Prevention of cruelty to animals’ चे नियम पाळतो पण प्रत्यक्षात त्यांना मांसाहार खाताना ते कळतच नाही. शिवाय हॉटेलमध्ये मांसाहार म्हणून काय खायला घालतील याचा नेम नाही.

जीन-फिलीप स्वतःविषयी पुढे म्हणतो की गेल्या पाच वर्षापासून मी पहाटे उठून विपश्यना ध्यान साधना करीत आहे. त्यामुळे दिवसभर मला ऊर्जा प्राप्त होत राहते व यामुळे मांसाहार करणे व त्याची डिश बनविणे ही सवय आपोआपच सुटत गेलीे. ही एक किमयाच घडली आहे. तसेच अन्न शिजले आहे की नाही किंवा तयार झाले आहे की नाही हे त्याच्या सुहासा वरूनच कळू लागले आहे. माझ्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी नॉनव्हेज खाणे सोडले आहे, मला त्याचा अभिमान वाटतो. सुरुवातीला मांसाहार सोडताना त्रास होईल, पण खंबीर मनाने निश्चय केला तर मग काहीच कठीण नाही.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *