बातम्या

३४ वर्षांनी मिटला भारतीय बौद्ध महासभेचा वाद

नागपूर : अध्यक्षपदासारख्या क्षुल्लक कारणासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या दोन्ही गटांनी तब्बल ३४ वर्षे न्यायालयात संघर्ष केला. परंतु, यात कुणाचेच हित नसून उलट समाजाचेच मोठे नुकसान होत असल्याची बाब दोन्ही गटांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला. तसेच यापुढे बौद्ध महासभा ही एकच संस्था राहणार असून, आम्ही दोघेही मिळून काम करू, अशी ग्वाही दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा ही आंबेडकरी चळवळीतील मातृसंस्था आहे. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर महासभा प्रथम अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर होते. त्यांच्या निधनानंतर वादाला सुरुवात झाली मागील दोन वर्षांपासून एकत्रिकरणाबाबत चर्चा सुरू होती ऑक्टोबर २०२१ ला एकत्रिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. भीमराव आंबेडकर यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून तर ट्रस्टी अध्यक्ष डॉ. हरिश रावलिया, चंद्रबोधी पाटील राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्य करतील, असे ठरले.

आता मिळून काम करू जागतिक स्तरावर बौद्ध राष्ट्रांशी समन्वय साधून देशात पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल, तसेच राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनांना एका छत्राखाली आणून बाबासाहेबांच्या मातृ संघटनांना बळ देण्याचा प्रयत्न यापुढे करण्यात येईल.
-भीमराव आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा

युवावस्थेत असताना बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराचे कार्य हाती घेतले. आता ३४ वर्षांचा काळ कोर्ट-कचेरीत गेला. आता आम्ही वार्धक्याकडे झुकलो आहोत. यासाठी संस्थेच्या ट्रस्टी संख्येत वाढ करण्याचा प्रयत्न आहे. त्यात युवकांच्या हातात सूत्रे देऊन ट्रस्टी संख्या २५ वर नेण्याचा प्रयत्न राहील.
-चंद्रबोधी पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा आंबेडकर

साभार : लोकमत