जगभरातील बुद्ध धम्म

स्तूप आणि लेण्यांमधील श्रावणबाळ कथा; श्रावण बाळाची गोष्ट मूळ बौद्ध संस्कृतीची

इ. स.१ल्या शतकात आसपास बुद्ध तत्वज्ञानाचा प्रसार चीनमध्ये झाला तेंव्हा चीनमध्ये लढाया, बंडाळ्या माजल्या होत्या. एकमेकांप्रति समाज मनात प्रबळ प्रेम भावना नव्हती. वयोवृद्धांना सन्मानाने वागविले जात नव्हते. मात्र धम्मातील गंभीर तत्वज्ञान, मेत्त आणि करुणा भावनेने तेथील समाजास बुध्दांचे आकर्षण वाटू लागले. सर्वाप्रति आपुलकी निर्माण होऊ लागली. घरोघरी वयोवृद्ध माता-पिता, सगेसोयरे यांना मान सन्मान दिला जाऊ लागला. ही किमया सुत्तांच्या चिनी भाषांतरामुळे तेथील समाजात झाली.

बुद्धांच्या जातक कथांच्या भाषांतरामुळे तेथील संस्कृतीला निती नियम, दया-करुणा यांचे भान येवून कायापालट होवू लागला. याचबरोबर भारतीय जातक कथेतील श्रावण बाळाच्या गोष्टीचा पगडा तेथील समाजमनावर इतका बसला की वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखणे हा भाव कन्फुशिआनिझम पंथाचा पाया झाला. वरिष्ठांना मान देणे, त्यांचा सांभाळ करणे, त्यांच्या आज्ञा पाळणे हे त्यांचे मुख्य तत्व होऊन बसले.

चिनी भाषेत रूपांतरीत झालेल्या शाक्यमुनी बुद्धांच्या सूत्रांचा व ट्यांग राजवटीत कोरलेल्या लेण्यांचा पगडा चिनी समाज मनावर खूप आहे. चिनी लेखिका लि लींग यांचा श्रावणबाळा संबंधीचा लेख जेव्हा मी वाचला तेव्हा मला देखील आश्चर्य वाटले. त्यांनी सांगितले आहे की चीन मधील दाझू लेण्यांमधील लेणी क्रमांक १७ मध्ये श्रावण कुमारचे शिल्प आहे. त्या अनुषंगाने शोध घेतला तेव्हा खरोखर दाझू लेणी समूहात मला श्रावण कुमारचे खांद्यावर कावड घेतलेले शिल्प मिळाले. भारतातील चित्रात कावडमध्ये श्रावणाचे आईबाप जसे बसलेले दिसतात तसेच चीन मधील लेण्यातील श्रावणाच्या कावडमध्ये बसलेले आढळतात. फरक एवढाच की त्यांची रूपरेखा चिनी व्यक्तींसारखी आहे.

चीन मधील दाझू लेण्यामधील श्रावण कुमारचे शिल्प. जातक कथांचा पगडा चायनीज संस्कृतीवर दिसून येतो.

मध्य प्रदेशातील सांची स्तूप क्र .१ मधील पश्चिमेकडील तोरणावर देखील स्यामा जातक म्हणजेच श्रावण बाळाच्या कथेचे शिल्प कोरलेले आढळते. यात दशरथ राजाने बाण मारलेला दिसत असून श्रावण जखमी होऊन पाण्यात पडलेला दिसत आहे. याच शिल्पात उजवीकडे वर त्याचे वृद्ध माता-पिता दिसत असून खाली घडा घेवून त्यांच्यासाठी पाणी आणण्यास चाललेला श्रावण बाळ दिसत आहे. डावीकडे वरील बाजूला बोधिसत्व यांचे शिल्प दिसून येते. माता-पित्याच्या सेवेची पारमिता त्या जन्मी पूर्ण केली हेच त्यातून सांगितलेले आहे. तसेच अजिंठा लेण्यात लेणी क्रमांक १७ मध्ये कावड घेतलेल्या श्रावण बाळाचे भित्तीचित्र आहे.

मध्यप्रदेश येथील सांची स्तूप क्रमांक १ च्या पश्चिमेकडील तोरणावरील श्रावण कुमारचे हे शिल्प. यामध्ये खालील बाजूस दशरथ राजाने श्रावणास बाण मारलेला दिसत असून वरती उजव्या बाजूस श्रावणाचे वृद्ध आईबाप दिसत आहेत. त्याखाली पाण्यासाठी घडा घेऊन जाताना श्रावण बाळ दिसत आहे. वरती डाव्या बाजूस बोधिसत्वाची प्रतिमा आहे.

या सर्व बाबींवरून हे स्पष्ट झाले की लहानपणापासून आपण ऐकत असलेली श्रावण बाळाची गोष्ट ही मूळ बौद्ध संस्कृतीची आहे. खरोखर बौद्ध संस्कृतीचे साहित्य म्हणजे ज्ञानाचे अफाट भंडार आहे. इतर धर्मातील अनेक गोष्टींचे मूळ बौद्ध संस्कृतीत व त्रिपिटकात आढळते हे सत्य आहे.

म्हणूनच श्रावण महिना हा श्रमण संस्कृतीचा महिना आहे, हे ठामपणे म्हणावेसे वाटते. तसेच बाराव्या शतकात रचलेल्या रामायण काव्याचे मूळ हे दशरथ जातक कथा आणि स्यामा जातक कथेत आहे हे लक्षात येते. बौद्ध संस्कृतीने जगाला दिलेली ही मोठी देण आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)