ब्लॉग

आघाडी सरकार अर्थसंकल्पात मंदिरांबाबत ‘मुक्त हस्त’ मात्र एकाही बौद्ध लेणीचा समावेश नाही

एकीकडे, जगात फिरतांना बुद्धाचा ‘ उदोउदो ‘ मात्र करायचा, आणि प्रत्यक्षात मात्र बौद्ध संस्कृतीच नष्ट करायचा घाट बांधायचा, हे ‘ केंद्र सरकार ‘ राबवत असलेले ‘ पुष्यमित्र शृंग ‘ धोरण , स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्राचे आघाडी सरकार देखील राबवत आहे, हेच या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते.

‘हिंदू’ मंदिरांबाबत मात्र सरकारचा हात ‘मुक्त हस्त’ दिसून येत आहे. या अर्थसंकल्पात एकाही बौद्ध लेणीचा समावेश केलेला नाही, ही खरोखरच बौद्धांच्या दृष्टीने लाजिरवाणी व चिंतेची बाब आहे. भारतातील एकूण १२०० च्या वर असलेल्या लेणींपैकी ८५ % लेणी या ‘ बौद्ध लेणी ‘ आहेत. १०% लेणी या ‘ शैव लेणी ‘( ‘ हिंदू ‘ नव्हे ,) तर ५% लेणी ‘ जैन लेणी ‘ आहेत.एकट्या महाराष्ट्रातच सुमारे ९०० हूनही अधिक लेणी आहेत. या लेणींच्या निर्मितीचा काळ हा साधारणतः इ.स.पूर्व २ रे शतक, ते इ. स. चे ७ वे शतक असा आहे. सातव्या शतकानंतर देखील ही लेणीनिर्मिती दहाव्या-बाराव्या शतकापर्यंत तुरळकपणे का होईना, सुरुच होती. तब्बल १४०० वर्षे हे लेणी निर्मितीचे काम या देशात अखंडपणे सुरू होते.

तथागत बुद्धाप्रति आपल्या असीम श्रद्धा असलेल्या शिल्पकारांची कठीण -काळा पाषाण भेदणारी अपार मेहनत व वंदनीय भिक्खूगण, व्यापारी व कारागिरांच्या विविध श्रेणी, उपासक-उपासिका यांनी दिलेल्या दानासोबतच सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट इ. राजवंशासोबतच त्यांचे सामंत, मंत्री, अमात्य, सेनानायक यांनी ही या कामी सढळ हस्ते आपला राजकोश रिता करुन दाखवलेली ‘ दानपारमिता ‘ यांचा जेव्हा सुरेख संगम घडून आला, तेव्हा कुठे सह्याद्री व तिच्या उपपर्वतरांगामधील गिरिकुहरांमध्ये ही शैलगृहे आकारास आली.

कान्हेरी,नाशिक, जुन्नर, कार्ले, भाजे, बेडसे , कोंढाणे, पितळखोरे येथील अप्रतिम चैत्यगृहे, तसेच वेरुळ, अजिंठा येथील अद्वितीय शैलशिल्पे व चित्रकारी तर जगद्विख्यात ठरली. आजही भारतात भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांचा मंदिरापेक्षाही जास्त ओढा हा या बौद्ध लेणींकडेच जास्त असतो. सरकारला होणारे सर्वात जास्त विदेशी चलन या लेणींना भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांकडूनच प्राप्त होते. असे असूनसुद्धा सरकार मात्र बौद्ध लेण्यांविषयी , त्यांची दुरुस्ती, संवर्धन, जतन व करण्याविषयी सततच उदासीन दिसून येत आहे. अनेक लेणींमध्ये जाण्यासाठी नीट धड रस्ताही नाही.

भारतातील सर्वात जास्त लेणी असलेल्या जुन्नर परिसरातील शिवनेरी, अंबा-अंबालिका, भूतलिंग, भिमाशंकर, सुलेमान गटलेणी तर मुद्दामहून दुर्लक्षित ठेवलीत की काय, असाच प्रश्न तेथे भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांनाही पडल्यावाचून राहणार नाही. शिवाय, कार्ले, कोंडिवते, पन्हाळेकाजी, भाजे, बेडसे,शेलारवाडी, लेण्याद्री, नाशिक, कान्हेरी इ. ठिकाणी ‘ शेंदूर ‘ फासून झालेले धार्मिक अतिक्रमण- ते वेगळेच. दोन हजार वर्षांपासूनचा राबता असलेला, देशी-विदेशी व्यापाऱ्यांच्या ‘ सार्थवाहा’नी गजबजलेला एके काळचा नाणेघाट आज अखेरच्या घटका मोजत सुन्न पडला आहे. जागतिक दर्जाचे प्राचीन वारसास्थळ असलेल्या व देशी -परदेशी पर्यटकांची सतत वर्दळ असलेल्या वेरुळ -अजिंठा येथे जाण्यासाठी रस्त्यांची दैन्यावस्था तर ‘रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते…?’ यावर एखादा शोधनिबंध लिहिण्यासारखी आहे. औरंगाबाद, भाजे, जुन्नर जवळची तुळजा लेणी इथल्या एकांतात तर अनेकदा जोडप्यांची अनैतिक कृत्ये सर्रास चालतात .

अनेकदा, काही पैशांच्या मोबदल्यात तिथले रक्षकच लेणींमधील एकांताची ठिकाणे या जोडप्यांना दाखवतात, असे निदर्शनास आले आहे. कार्ल्यासारख्या ठिकाणी बौद्ध लेणींशेजारीच कोणा काल्पनिक एकवीरा देवीस बोकड व कोंबड्यांचे असंख्य बळी दिले जातात. जिथे कधीकाळी अहिंसेच्या शिकवणीचा धीरगंभीर स्वर निनादत होता, तिथेच आता बळी जाणाऱ्या निष्पाप प्राण्यांचा जीवाच्या आकांताने ओरडण्याचा आवाज घुमतोय…… ‘ तरी आम्ही बोलू नये…..! ‘

स्वतःला ‘ बौद्ध ‘ म्हणवून घेणारे नेते -अभिनेते, मंत्री, आमदार-खासदार, नगरसेवक -समाजसेवक, अधिकारी -कर्मचारी, तथाकथित विद्वान, संशोधक, अभ्यासक, स्वयंघोषित लेणी संवर्धक, तुम्ही -आम्ही, सर्वांनी….. तथागत बुद्ध व बाबासाहेब फक्त आणि फक्त ‘ बुद्ध जयंती ‘ व ‘ आंबेडकर जयंती ‘च्या दिवशी गळ्याच्या शिरा ताणून दिल्या जाणाऱ्या भाषणापुरतेच मर्यादित ठेवलेले आहेत, त्याचाच हा ‘ परिणाम ‘ आहे. खरेतर, बुद्ध ‘ त्यांनी ‘ नाही, तर ‘ आम्ही ‘च संपवला आहे…..”

अशोक नगरे
(लेखक – ज्येष्ठ मोडी लिपी तज्ञ, बौद्ध इतिहास अभ्यासक)