इतिहास

भीमा-कोरेगावचा विजय आणि सांचीचा शोध एक विलक्षण योगायोग

बुद्धधम्माचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले पुनरुत्थान आणि त्यांच्या पूर्वास्पृश्य महारांचा मागील ६० वर्षांतील धम्मप्रचारासाठी संघर्ष या गोष्टी आज भारतीय बौद्ध चळवळीच्या इतिहासाची सुवर्णाक्षरांनी लिहिलेली पाने आहेत. याच चळवळीचे बीजांकुर अस्पृश्यांच्याच २०० वर्षे पूर्वी झालेल्या भीमा कोरेगावच्या – पेशवाई विरुद्ध इंग्रजाच्या लढाईत तर आहेच परंतु या लढाईतील सैनिकांमार्फतच मध्यभारतातील सांची येथील बौद्ध संस्कृतीस्थळाच्या आणि महान बौद्धधर्म इतिहासाच्या संशोधनातही आहे. केवळ योगायोगाने इस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज सैनिकांना लागलेल्या या शोधामुळे सम्राट अशोकाच्या धर्मराज्याच्या आणि बुद्धधम्माच्या सुवर्णयुगाच्या इतिहासाची पाने आपणाला अभ्यासता येतात. सांचीचा हा शोधही विलक्षण योगायोगाचा भाग आहे.

१ जानेवारी १८१८ रोजी इस्ट- इंडिया कंपनीच्या ५०० महार आणि इतर सैनिकांनी तसेच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आत्मबलिदान करून पेशवाईच्या धर्मांध , वर्णवर्चस्ववादी अमानवी विषमतामूलक राज्यसत्तेचा नि:पात केला.

सांचीचा शोध असा लागला :

पेशव्यांच्या विरोधात लढ्यासाठी लागणारी कुमक म्हणून आलेल्या ग्वाल्हेर छावणीतील मेजर हेनरी टेलर यांच्या आधिपत्याखालील सैनिकांची परत ग्वाल्हेरकडे जाणारी पलटन भोपाळपासून थोड्या अंतरावर भिलसा या गावाजवळ थांबली. हेच भिलसा आता विदिशा या त्याच्या प्राचीन नावावरून ओळखले जाते. वेळ घालवण्यासाठी म्हणून त्यातील अधिकारी मंडळी दुपारनंतरच्या शिकारीसाठी पक्षी टिपण्याच्या छोट्या बंदुका आणि डुकरांची शिकार करण्यासाठी भाले घेऊन मुख्य मार्गाशेजारील झाडा झुडुपांनी वेढलेल्या टेकडीवर चढून गेली आणि पाहतात तर काय; ते त्यांच्या भोवतीच्या छोट्या छोट्या कृत्रिम टेकडांनी वेढले गेलेले होते. त्यापैकी एका टेकाडाचा घुमटाकार तर इतका प्रभावशाली होता की त्या अधिकाऱ्यांपैकी कॅप्टन एडवर्ड फेल, लेफ्टनंट जॉन बागनोल्ड आणि निशाणजी जॉर्ज रोबुक हे पुन्हा उत्खनन करण्यासाठी परत येण्याचा निश्चय करूनच टेकडीवरून खाली उतरले.

1861 मध्ये सांची स्तूपाचे काढण्यात आलेले छायाचित्र

दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांनी या अवशेषांची रेखाचित्रे तयार केली आणि एडवर्ड फेल यांनी एक अहवाल तयार केला. तो अहवाल दुसऱ्यावर्षी कलकत्ता जर्नलच्या जुलै १८१९ च्या अंकांत प्रकाशित झाला. या अहवालात त्याने लिहिले होते की एका अलग पडलेल्या टेकडीच्या सपाट माथ्यावर अर्धगोल घुमटाकार आकारात, घडवलेल्या दगडात टप्प्या टप्प्याने बांधलेले सिमेंटचा मुळीच वापर न करता पूर्णत: ठोस असे स्मारक १२ फूट उंच आणि ७ फूट रुंद, असे वर्तुळाकार ५५४ फूट परिघ असलेले बांधलेले आहे. या स्तूपांच्या भोवती असलेली भग्नावस्थेतील तोरणे आणि कठड्यांवरील नक्षीचेही वर्णन त्यांनी केले होते. त्यावरील शिल्पांमधील अर्थ न लागलेल्या कथा पुढील काळांमध्ये; एका दीर्घकालीन प्राचीन इतिहासाचा उलगडा करणाऱ्या असल्या तरी हे स्थळ त्या काळी १८१९-१८२० साली बौद्धांचे आहे की जैनांचे आहे याबद्दल निश्चिती नव्हती. कलकत्त्यातील रॉयल आशियाटीक सोसायटीच्या एच.एच. विलसन आदि पदाधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्षच केले.

जेम्स प्रिंसेप, अलेक्झांडर कनिंघहम आणि जॉन मार्शल

नंतरच्या काळात जेम्स प्रिंसेप, अलेक्झांडर कनिंघहम आणि जॉन मार्शल यांनी लक्ष घालून सांचीचा शोध घेतला. सांचीचे संरक्षण व पुनर्बाधणी करण्यासाठी साधनसामुग्री नेण्यासाठी एक छोटी रेल्वे लाईन ही खालच्या मोठ्या लोहमार्गापासून टाकण्यात आली. सांचीच्या स्तूपावरील जातक कथा, बुद्धजीवन कथा, दान दात्यांचे लेख आणि इतर सामग्री यामधून सम्राट अशोकाच्या काळापासून – इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून – ते गुप्तोतर काळापर्यंत म्हणजे इ.स.च्या ५ व्या शतकापर्यंत असा ८०० वर्षांचा भारताचा आणि बौद्ध धर्माचा इतिहास यावर प्रकाश पडतो.

1875 मध्ये सांची स्तूपाचे काढण्यात आलेले छायाचित्र

पेशवाई बुडविणाऱ्या भीमा-कोरेगावच्या लढाईतले एक यश हे विषमतेची राजवट नष्ट करणे हे होते. तर दुसरे यश हे योगायोगाने सांचीच्या शोधामधून उलगडत जाणारा समतेच्या बौद्ध परंपरेचा शोध हे होते.

संदर्भ : बौद्ध इतिहासाचे लेखक, विचारवंत मा.शं.मोरे सर यांच्या ”भारतातील बुद्ध धम्माचा इतिहास” या पुस्तकातील ”कोरेगावचा विजय आणि सांचीचा शोध” हा जशास तसा भाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *