इतिहास

बौद्ध धर्माची मराठीतील पहिली तीन पुस्तके कोणती?

महाराष्ट्र हे ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या भारतातील एक वैभवसंपन्न राज्य आहे. या महाराष्ट्र राज्यात प्राचीन भूषणास्पद असलेली मुख्य गोष्ट म्हणजे येथील दऱ्याखोऱ्यात पसरलेल्या कोरीव लेण्या. भारतातील जवळपास बाराशे लेण्या पैकी ८०० लहान-मोठ्या लेण्या महाराष्ट्रात आहेत. यातील काही लेण्यांनी जागतिक वारसा यादीत स्थान मिळविले असून काही आजही उपेक्षित आहेत. तसेच नवीन लेण्यांचे शोध ही लागत आहेत.

यावरून लक्षात येते की एकेकाळी महाराष्ट्रात बौद्ध धम्म किती रुजला होता. ज्या अर्थी मध्यप्रदेश या शेजारच्या राज्यात सम्राट अशोक राजांच्या पाऊलखुणा स्तुपांच्या व लेण्यांद्वारे सर्वत्र दिसतात त्याअर्थी महाराष्ट्र धम्मापासून दूर कसा राहील ? लेण्यांच्या अस्तित्वाने महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात बुद्धिझम रुजला होता हे स्पष्ट दिसते. परंतु त्याकाळी एकही बौद्ध साहित्य मराठी मातीतून निर्माण झाले नाही याचे आश्चर्य वाटते. कदाचित ज्ञानार्जनाचे कार्य नालंदा, वल्लभी विद्यापीठे दूर असल्याने येथे झाले नसावे, अशी शक्यता आहे.

तामिळनाडूत जसे ‘मणिमेक्खलाई’ सारखे बौद्ध साहित्य प्राचीनकाळी निर्माण झाले, बंगालमध्ये जसे ‘चर्यापाद’ महाकाव्य तयार झाले, तसेच केरळमध्ये आणि आंध्रप्रदेशमध्ये जसे प्राचीन बौद्ध साहित्य निर्माण झाले तसे हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्रात बौद्ध साहित्य निर्माण झालेले नाही, ही एक मोठी त्रुटी भासते. मात्र संतांच्या अभंगातून बुद्धविचारांचा उल्लेख जरूर आढळतो. पुढे एकोणिसाव्या शतकात छपाई करणे सुलभ झाले आणि मग पुरातन बौद्धस्थळे उजेडात येऊ लागल्यावर भगवान बुद्धांविषयी काही पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली. त्यानंतर मराठी माणसाला बुद्धांबद्दल माहिती झाली.

हे पण वाचा : केळुस्कर गुरुजी आणि बाबासाहेबांबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

एकोणिसाव्या शतकात भगवान बुद्धासंबंधी मराठीतून प्रथमच प्रसिद्ध झालेले पहिले तीन ग्रंथ खालीलप्रमाणे आहेत.

१) १८८३ साली वासुदेव लक्ष्मण आठवले यांचे ५२ पानांचे ‘बौद्ध धर्माचा संस्थापक शाक्यमुनी गौतम यांचे चरित्र’ हे लांबलचक नावाचे पाहिले पुस्तक प्रसिद्ध झाले.
२) १८९४ मध्ये ‘श्री जगद्गुरु गौतम बुद्ध चरित्र’ हे गोविंद नारायण काणे यांनी लिहिलेले शंभर पानांचे पुस्तक प्रसिद्ध झाले.
३) त्यानंतर १८९८ मध्ये ‘गौतम बुद्धाचे चरित्र’ हे कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे १५८ पानांचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

यातील पहिली दोन पुस्तके उपलब्ध नाहीत. तिसरे पुस्तक लेखक केळुसकर यांचे असून त्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे, ज्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लहानपणापासून प्रभाव पडला होता. १९ व्या शतकात भगवान बुद्धांवरील एवढीच तीन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यानंतर मात्र २० व्या शतकात मोठी क्रांतीच झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यानंतर बुद्ध तत्वज्ञानावरील अगणित पुस्तके मराठी व अन्य भाषेतून प्रसिद्ध झाली, अजूनही होत आहेत आणि पुढे ही होतील. खरा सुशिक्षित माणूस भारताचा हा दैदिप्यमान इतिहास पाहून चकित होत आहे. बुद्ध विचारांचा अश्वमेध आता सुटला आहे. पुढील भविष्य काळात सर्व भारत पादाक्रांत केल्याशिवाय तो आता थांबणार नाही.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *