इतिहास

अस्पृश्यातील पहिले पत्रकार गोपाळबाबा वलंगकर

गोपाळबाबा हे कोकणातील महाडजवळील रावढळ या गावचे रहिवासी. लष्करातून ते १८८६ साली निवृत्त झाले. धर्मग्रंथांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या मनात सतत अस्पृश्यांच्या जागृतीचे विचार येत. २३ आॅक्टोबर १८८८ साली त्यांनी ‘विटाळ विध्वंसन’ नावाची एक पुस्तिकाही लिहून पूर्ण केली होती. विटाळ विध्वंसन हे त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक चिंतनाचे अक्षयरुप होय.

अल्पशिक्षित असले तरी गोपाळबाबांचे वाचन चौफेर होते. इतिहास, धर्म, समाज, संस्कृती या क्षेत्रातील त्यांचे चिंतन अमोघ होते. समाजस्थितीने निर्माण केलेल्या दुष्टचक्रातून अस्पृश्यांना कसे मुक्त करता येईल हा ध्यास त्यांना सतत लागलेला असे. गोपाळबाबांनी आणखी एक महत्त्वाची बाब केली ती म्हणजे त्यांनी अस्पृश्यातील सर्व जातींना संघटित करून सामूहिक रीतीने गुलामीत जीवन कंठण्यास बाध्य करणाऱ्या धर्मशास्त्रांचा, रूढींचा आणि परंपराचा निषेध करण्यास त्यांना प्रवृत्त केले. युक्तीवाद हा तर त्यांच्या विचारमंडनाचा पायाच होता.

अनार्यदोष परिहारक मंडळीच्या कार्यासंबंधी त्या काळी अनेक विरोधी प्रतिक्रिया उमटत. २ डिसेंबर १८९४ च्या ‘दीनबंधु’ च्या अंकात ‘साळुताई’ ह्या टोपण नावाने अनार्यदोष परिहारक मंडळीस उपदेश करण्यासाठी जे अंभगात्मक पत्र लिहिले होते, त्याचे उत्तर गोपाळबाबांनी दीनबंधुच्याच ९ जानेवारी १८९५ च्या अंकात गद्य स्वरूपात उत्तर दिले. ते मिस्किलपणाचे द्योतक तर आहेच पण अस्पृश्यांविषयीच्या अन्याय अत्याचाराला धर्म कसा कारणीभूत आहे हे रोख ठोकपणे सांगणारे आहे. धर्मासंबंधीच्या चुकीच्या कल्पना व त्यांनाच धर्म मानून व्यवहारात तसे वर्तन करणाऱ्या रुढीग्रस्त विचारसरणीला गोपाळबाबा ‘धर्माचे सोंग’ म्हणतात. खोट्या धर्मकल्पना टाकून देऊन अस्पृश्यांना समजून घेण्याची व त्यांना साहाय्यीभूत होण्याची अपेक्षा गोपाळबाबा करतात ते एका व्यापक समाजाच्या कल्पनेतूनच!

सार्वजनिक जीवनातील अडीअडचणी संबधानेही गोपाळबाबा वृत्तपत्रात लिहित असत आणि वाचा फोडीत असत. त्यावेळच्या पोस्ट खात्यावर त्यांनी केलेली टीका लक्षणीय आहे. वलंगकरांच्या व्यंगोक्तीपूर्ण लेखनाचे दर्शन येथे घडते. “पूर्वी महाड पोस्टाकडून तीन तीन डिलिव्हरी होत असून पत्रे व वर्तमानपत्रे लवकर मिळत असत व नेत असत. यावरून दासगाव पोस्टापेक्षा महाड पोस्टच बरे असे म्हटले पाहिजे. कारण आम्ही एकदा मुंबईहून आपल्या घरी यावयास चार चार दिवस अगोदर पत्र पाठविले की, आम्ही सोमवारी पोहोचणार तेव्हा मंगळवारी दासगावला आगबोटीवर नेण्यास कोणी मनुष्य पाठवावा तर ते (काय) आम्ही घरी आल्यावर गुरूवारी पोस्टमन डिलिव्हरी आला तेव्हा त्याने ते पत्र आम्हांस दिले.” पोस्टखात्यातील बेबंद कारभारावरही त्यांनी या पत्रात कोरडे ओढले आहेत.

अस्पृश्यांना त्यांच्या स्थितीची जाणीव करुन देणारे लेखन जसे गोपाळबाबांनी त्याकाळी केले. तसेच तत्कालीन स्थितीला कारणीभूत असणाऱ्या विषयाचे विश्लेषण करून अस्पृश्य मनात आत्मजागृतीची प्रेरणाही बिंबवली. गोपाळबाबा जसे वैचारिक लेखन करीत तसेच काही पद्यलेखन ही त्यांनी केले आणि ते दीनबंधुसारख्या तत्कालीन प्रतिष्ठित पत्रात प्रकाशित झाले आहे. जोतिबा फुले यांच्या प्रेरणेतूनच त्यांनी ही अखंडरचना केली आहे. जोतिबा फुले यांच्या पश्चात कोणी सत्यसमाजीयन तशाप्रकारची रचना करीत नाही याची खंत त्यांच्या मनात होती, आणि म्हणूनच त्यांनी अखंडनिर्मिती केली. लोकमनातील अंधश्रध्दा, भ्रामकता, अज्ञान निपटून टाकून *मानवी प्रतिष्ठा* निर्मिणे हा फुलेंप्रमाणेच वलंगकरांच्या अखंडरचनेचा अंगभूत गुण आहे.

गोपाळबाबा हे अस्पृश्यातील पहिले समाजसुधारक आणि पहिले पत्रकार होत. त्यांचे सर्व वृत्तपत्रीय लेखन म्हणजे त्यांच्या जीवनध्येयाची साक्षच. समाजपरिवर्तनाच्या ध्यासाने त्यांची लेखणी झपाटलेली होती. अचूकतर्कवाद आणि अक्षय बुध्दिवाद यामुळे त्यांच्या प्रासंगिक लेखनालाही एक प्रकारचे शाश्वत मूल्य लाभलेले आहे. त्यांचे वृत्तपत्रीय लेखन म्हणजे अस्पृश्य मनाचा आरसाच होय. कधी प्रखरपणे, कधी सामंज्यसाने, कधी विनंतीअर्ज करून तर कधी अत्यंत उग्र रुप धारण करुन गोपाळबाबांनी आपले विचार मांडले आहेत. या त्यांच्या लेखनातून त्यांची निर्भयता, आपल्या विचारांवरील अढळ निष्ठा आणि त्याचबरोबर समाजपरिवर्तनासाठी अहर्निश तळमळणाऱ्या सक्रिय कार्यकत्याचे सजग अंतःकरणही प्रगट होते. त्यांचे चिंतन मौलिक, मूलभूत आणि जागरुक असे आहे. अस्पृश्य पत्रकारितेचा अारंभबिंदू म्हणून गोपाळबाबांचे नाव चिरंजीव आहे ह्यात शंका नाही. अस्पृश्यांच्या या आद्य पत्रकाराचे निधन १९०४ साली झाले.

संकलन – सुरज तळवटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *