जगभरातील बुद्ध धम्म

बिमारन स्तूपातील सुवर्ण रक्षापात्र

ब्रिटिशांच्या काळात भारतामध्ये अनेक ठिकाणी उत्खनन कार्य करण्यात आले आणि विस्मरणात गेलेल्या बौद्ध संस्कृतीचे अवशेष शोधून बाहेर काढण्यात आले. जिथेजिथे पुरातन स्थळी टेकडी किंवा मातीचा व विटांचा ढिगारा दिसला तेथेतेथे उत्खनन केले गेले आणि तेथील स्तूपामधून दगडी मंजुषा व त्यामधील रक्षापात्रे बाहेर काढण्यात आली. बहुतेक स्तुपाचे ठिकाणी ब्रॉन्झ धातूंची रक्षापात्रे प्राप्त झालेली आहेत. काही ठिकाणी नारळाच्या आकाराची गोलाकार दगडी रक्षापात्रे सापडली आहेत. तर काही थोड्या ठिकाणी नक्षीकाम केलेली सुबक तांब्याची रक्षापात्रे सापडली आहेत.

पेशावर येथील कनिष्क स्तूपात ब्रॉन्झ धातूचे रक्षापात्र मिळाले. गुजरातमध्ये देवनी-मोरी येथे गोल दगडी रक्षापात्र सापडले. धर्मराजिका स्तुपात तांब्याचे रक्षापात्र प्राप्त झाले. पिप्रहवा स्तूपात गोल सफेद दगडी रक्षापात्र मिळाले. अशी अनेक दगडी व धातूंची रक्षापात्रे अनेक स्तूपात सापडली. पण अफगाणिस्तानमध्ये सन १८३३-३८ दरम्यान चार स्तूपांचे उत्खनन केले असता एका स्तूपात चक्क सोन्याचे रत्नजडित रक्षापात्र मिळाले. १९ व्या शतकात आशिया खंडातील बौद्ध संस्कृतीचा शोध घेणे चालू असतानाच सुरवातीला हे सुवर्ण रक्षापात्र स्तूपात सापडल्याने ब्रिटिशांचे कुतूहल जागे झाले. व त्यांनी सर्व पुरातन स्थळी जोमाने उत्खनन केले. अफगाणिस्तान मधील या स्तुपांची हकीकत खालील प्रमाणे आहे.

मेशन यांनी केलेले स्तुपाचे रेखाटन

बिमारन हे गाव अफगाणिस्तान मधील जलालाबाद शहराजवळ आहे. सन १८३३-३८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा शिपाई व संशोधक चार्ल्स मेशन येथे चार स्तूपांचे उत्खनन करण्यासाठी आला होता. पहिल्या स्तूपात त्यांना काहीच मिळाले नाही. मात्र दोन नंबरच्या स्तूपात उत्खनन करताना एक गोल दगडी मंजूषा मिळाली. ती हळुवार बाहेर काढून उघडताच सर्वांचे डोळे विस्फारले. कारण त्यात सोन्याचे व मौल्यवान रत्नांनी सुशोभित केलेले छोटे रक्षापात्र होते. मात्र या रक्षापात्रात अस्थीधातु नव्हते,तर काही जळालेले मणी आणि फक्त चार नाणी होती. उरलेल्या दोन स्तूपात काय सापडले याचा तपशील उपलब्ध नाही.

रक्षापात्रातील मणी आणि नाणी

दोन नंबरच्या स्तूपात सापडलेले रक्षापात्र हे इ. स. १ ते १५ या कालावधी मधील असावे. तसेच झालेल्या संशोधनावरून मिळालेली नाणी त्यावेळेचा राजा खरौष्टी किंवा त्याचा मुलगा भुजात्रिया यांच्या कारकिर्दीतील असावीत असे म्हटले गेले आहे. तसेच रक्षापात्रावर गांधारकला युक्त बुद्धप्रतिमा अंकित केलेली आढळली. तसेच त्याच्या तळाशी कमलपुष्प चिन्ह कोरलेले आहे. या रक्षापात्रास झाकण नव्हते व ते रक्षापात्र सात से.मी. उंच होते. रक्षापात्रावर ब्रह्मा आणि इंद्र देवता बुद्धांना वंदन करीत आहेत असे दर्शविले आहे. तसेच या रक्षापात्रास मौल्यवान रत्ने लावलेली असून ती ताजिकिस्तान जवळील बडाकशान पर्वतराजीमधील खाणीतील आहेत. तसेच दोन बोधिसत्वांच्या प्रतिमा देखील त्यावर अंकित केल्या आहेत.

बुद्ध अस्थीधातु प्राप्त ठिकाणांचा नकाशा

या रक्षापात्रावरील बुद्धप्रतिमा अभय मुद्रेतील असून संघाटी परिधान केलेल्या वस्त्राची कडा स्पष्ट दिसत आहे. तसेच बुद्ध प्रतिमेत शिरावर केश उश्नी ( गोलाकार केश गाठ/चुंबळ ) दाखविली असून त्याच्या पाठीमागे गोल आभा ( प्रभा वलय ) दाखविण्यात आले आहे. असे हे अद्वितीय सुवर्ण रत्नजडित रक्षापात्र दगडी गोलाकार मंजुषेमध्ये ठेवले होते.

रक्षापात्रातील कमलपुष्प नक्षीकाम, रंगीत मणी. रक्क्षापात्राचे रेखाटन, सुवर्ण रत्नजडित रक्षापात्र, अभयमुद्रा बुद्ध प्रतिमा.

इ.स.१८४० मध्ये चार्ल्स मेशन हा ईस्ट इंडिया कंपनीचा बिमारन येथे आलेला शिपाई संशोधन वृत्तीचा होता. या अगोदर त्याने पाकिस्तान मधील पंजाब प्रांतातील सहिवाल येथील हडप्पा संस्कृतीचा शोध लावला होता. त्यामुळे त्याला बिमारन येथे धाडले गेले असावे. या बिमारान दगडी मंजुषेवर खालील वाक्य खरोष्टी लिपीत लिहिले आहे.’मंजूवमदा यांचा पुत्र शिवरक्षीता याने हे पवित्र बुद्धधातू पूर्व बुद्धांना वंदन करून दिले’. असे स्पष्ट लिहिले असूनही रक्षापात्रात अस्थीधातु नव्हते. याचा अर्थ सुवर्णाच्या पात्रापेक्षा बुद्धधातु अधिक मौल्यवान व पूजनीय असल्याने ते घेऊन गेलेला अनामिक धम्माचा जाणकार असावा. असो, आज इतक्या वर्षानंतरही त्या सुवर्ण रक्षापात्राची झळाळी बिलकुल कमी झालेली नाही. सद्यस्थितीत हे बिमारनचे मौल्यवान रक्षापात्र ब्रिटिश म्युझिअम, लंडन येथे सुरक्षित आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

One Reply to “बिमारन स्तूपातील सुवर्ण रक्षापात्र

  1. सर आपण खरच बौद्ध धम्म विषयी खूप छान माहिती उपलब्ध करून दिली रात्र भर वाचली तरी पण उत्सुकता वाढतच आहे.
    आपला खूप आभारी आहे.

Comments are closed.