इतिहास

हा बौद्ध स्तूप आज अस्तित्वात असता तर केवळ ताजमहाल या वास्तूशी तुलना करणे शक्य

अमरावती हे छोटेखानी गाव, नुकतेच विभाजन झालेल्या आंध्र प्रदेश राज्यामधील गुंटुर या शहरापासून सुमारे 35 किमी अंतरावर, कृष्णा नदीच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेले आहे. स्थानिक किंवा तेलगू भाषेमध्ये या गावाला “दिपल्दिन्ने” किंवा मराठीमध्ये भाषांतर करायचे तर “दीपगिरी” या नावाने ओळखले जाते. अमरावती गाव आणि परिसर हे इ.स. पहिले शतक किंवा त्याच्याही आधीच्या कालापासून बौद्ध धर्मियांसाठी असलेले एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आणि प्रशिक्षण केंद्र होते. सातव्या शतकात भारत भेटीवर आलेला प्रख्यात चिनी भिख्खू ह्वेन त्सांग हा आपल्या प्रवासवर्णनात अमरावतीबद्दल लिहितो:

”अमरावती मध्ये असलेले बरेचसे बौद्ध मठ जरी आता उजाड अवस्थेत असले तरी सुमारे एक हजार बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य असलेले कमीत कमी 20 तरी बौद्ध मठ येथे आजमितीला कार्यरत आहेत.”

प्रख्यात चिनी भिख्खू ह्वेन त्सांग

वाचकांना हे वाचून कदाचित मोठे आश्चर्य वाटेल की देशाच्या दुर्लक्षित अंतर्भागात असलेल्या या अमरावती सारख्या ठिकाणी व ह्वेन त्सांगच्या प्रवासवर्णनात जिचा साधा उल्लेख सुद्धा सापडत नाही अशी एक भव्य वास्तू येथे सातवाहन कालात अस्तित्वात होती. केवळ ताज महाल या वास्तूशी तुलना करता येणे शक्य असलेल्या या वास्तूला प्रत्येक दिवशी हजारोंनी बौद्ध धर्मीय आणि भिख्खू भेट देत असत. एक भव्य बौद्ध स्तूप या स्वरूपात असलेली ही वास्तू पुढे कालौघात काही अनाकलनीय कारणांमुळे लोकांच्या विस्मरणात गेली आणि येथे एक मातीचे टेकाड तेवढे उरले. या टेकाडाला पुढे पुढे स्थानिक लोक “दिपल्दिन्ने” किंवा मराठीमध्ये “दीपगिरी” या नावाने ओळखू लागले आणि अमरावती गावाचेही हेच रूढ नाव बनले.

1796 या वर्षी एका स्थानिक जमीनदाराने अमरावती गावामध्ये आपला वाडा बांधण्याचे ठरवले व त्यासाठी लागणारा दगड, तो जवळपास असलेल्या टेकड्यांवर मिळेल का हे पहाण्यासाठी या टेकड्यांवर खोदकाम करून घेऊ लागला. या प्रयत्नात त्याच्या लोकांनी दीपगिरी टेकडीवरही खोदकाम केले आणि या खोदकामात जेंव्हा अप्रतिम शिल्पकाम केलेल्या संगमरवरी किंवा लाइमस्टोन प्रकारातील पाषाण शिळा खोदणार्‍यांना सापडल्या तेंव्हा सर्वानाच मोठे आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही.

स्तूपांचे अवशेष

त्या भागातील निवासी ब्रिटिश अधिकारी कर्नल कॉलिन मॅकेंझी याच्या कानावर हे वृत्त थोड्याच दिवसात गेले. हा अधिकारी पुरातन वस्तूंचा संग्राहक व पुरातत्त्व विषयाचा अभ्यासू असल्याने त्याने लगेचच या टेकाडाला भेट दिली व त्याच्या हे लक्षात आले की समोरचे टेकाड म्हणजे सुमारे 90 फूट व्यास आणि 20 फूट उंची असलेला एक स्तूप असला पाहिजे. पुढे 18 वर्षे काहीच घडले नाही. पण 1816 या वर्षी मॅकेंझी आपल्या बरोबर ड्राफ्ट्समेन आणि सर्व्हेयर्स यांचा एक गट घेऊन या स्थानावर अवतीर्ण झाला. हा मधला काळ बहुधा उत्खनन करण्यासाठी आवश्यक त्या सरकारी परवानग्या मिळवण्याच्या प्रयत्नात त्याने घालवला असावा. पुढची 2 वर्षे या गटाने अमरावती स्तूपाचे अत्यंत बारकाईने केलेले आराखडे आणि चित्रे तयार करण्यात व्यतीत केली.

अमरावती स्तूपाच्या शोधाची बातमी जसजशी ब्रिटिश अधिकार्‍यांमध्ये प्रसृत झाली तसतशी या स्तूपाच्या शिल्पे कोरलेल्या शिळा आपल्या ताब्यात घेण्याची एक स्पर्धाच या अधिकार्‍यांमध्ये सुरू झाली. यापैकी बर्‍याचशा शिळा या अधिकार्‍यांनी भारतात असलेल्या निरनिराळ्या ठिकाणच्या संग्रहालयांनाही भेट म्हणून दिल्या. यानंतर 1845 मध्ये आणखी एका ब्रिटिश अधिकार्‍याने स्तूपाच्या नैऋत्य भागात उत्खनन केले व तेथेही त्याला शिल्पकाम केलेल्या शिळांचे असंख्य तुकडे सापडले. या शिळा व तुकडे त्याने चेन्नई यथे पाठवून दिले व तेथे या शिळा व तुकडे बाहेरच्या हवामानाला तोंड देत दुर्लक्षित अवस्थेत पडून राहिले.

1856 मध्ये चेन्नई संग्रहालयाची स्थापना झाली. या संग्रहालयाचा प्रमुख एडवर्ड बेल्फोर याने हे तुकडे एकत्रित करून त्यांचा कॅटॅलॉग बनवण्यास प्रारंभ केला. यापैकी 121 शिळा, 1859 मध्ये इंग्लंडला पाठवून देण्यात आल्या. इंग्लंडमध्ये या शिळा कोणी वाली नसल्यासारख्या एका संग्रहालयाकडून दुसरीकडे जात राहिल्या व अखेरीस 1880 मध्ये ब्रिटिश म्युझियम येथे पोचल्या. या शिळा या संग्रहालयात अखेरीस प्रदर्शनासाठी ठेवल्या गेल्या व आजमितीस त्या तेथेच आहेत. याच वर्षी मद्रासचा गव्हर्नर असलेल्या ड्यूक ऑफ बकिंगहॅम याने या स्तूपाच्या जागेचे संपूर्ण उत्खनन करण्याची ऑर्डर काढली.

या उत्खनानंतर स्तूपाच्या जागेवर फक्त एक मोठा खड्डा तेवढा उरला. मात्र या उत्खननात स्तूपाच्या बाहेरील बाजूस उभारण्यात आलेल्या रेलिंगच्या शिळा प्रामुख्याने सापडल्या आणि अशा 400 शिळा चेन्नई यथे पाठवून देण्यात आल्या. या शिळा चेन्नई संग्रहालयात आजमितीसही बघता येतात. उरलेल्या थोड्या शिळा आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने नंतर केलेल्या उत्खननात सापडलेल्या आणखी काही शिळा या स्तूपाच्या जागेजवळ उभारलेल्या एका संग्रहालयात आजही प्रदर्शित केलेल्या आहेत.

हे पण वाचा : अमरावती स्तूप भारतीय वास्तुकलेचा अप्रतिम नमुना

सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात निर्माण झालेल्या व सातवाहन राजांनी जिच्या निर्मितीस हातभार लावला होता त्या इ.स. पहिले किंवा दुसरे शतक या सुमारास निर्माण झालेल्या वास्तूची अखेरीस कशी वाताहात झाली याची ही कहाणी दुर्दैवीच म्हटली पाहिजे. शोध लागल्यानंतर या वास्तूची पुनर्बांधणी न करता तिचे तुकडे इतस्ततः पाठवले गेल्याने, पुढच्या पिढ्यांनी, भारताच्या इतिहासातील एका गौरवशाली कालखंडामधे बांधलेली व ताज महालाशीच जिची तुलना करणे शक्य आहे अशी एक भव्य वास्तू बघण्याची सुवर्णसंधी कायमची गमावली असेच म्हणावे लागते.

अधिक माहितीसाठी : chandrashekhara.wordpress.com