इतिहास

बुद्ध म्हणजेच अखिल जगताचे महामुनी; बौद्ध देशातील विहारांची आणि पॅगोड्यांची नावे ‘महामुनी’

भारतीय संस्कृतीमध्ये ‘महामुनी’ या शब्दाला खूप महत्त्व आहे, आदर आहे. ‘महा’ म्हणजे सर्वात श्रेष्ठ आणि ‘मुनी’ म्हणजे मौनव्रत धारण करून वनात तप करणारे, ध्यान करणारे तपस्वी. बुद्ध हे सर्वार्थाने भारतीय संस्कृतीत सर्वश्रेष्ठ तपस्वी होते, मुनीवर्य होते. आणि म्हणूनच त्यांना ‘महामुनी’ म्हटले गेले आहे. त्यांच्या मातेचे नाव ‘महामाया’ होते. भारत खंडातील एक श्रेष्ठ तपस्वी, मुनी यांची माता म्हणून त्यांचा सन्मान केला जात होता. ‘माया’ म्हणजेच ‘लक्ष्मी’ असे पुढे त्याचे नामनिधान होऊन ‘महालक्ष्मी’ म्हणून भारतीय संस्कृतीत रुजले.

महापुरुष, महाबली, महाराज, महंत, महादेव, महामृत्युंजय ( मृत्यूची भीती न वाटणारा ), महादेव, महावीर ही सर्व नामे महामुनी बुद्ध यांची महती सांगणारी होती. तसेच बुद्ध माता कोलिय वंशाची असल्याने महाकाली, कालीमाता, काळूबाई, एकविरा देवी, अशी विविध प्रांताप्रमाणे अनेक नामे त्यांचे गुणगान करणारी होती. पुढे अनेक काल्पनिक गोष्टी या नावांशी जोडल्याने मूळ नावाचा असलेला संबंध-अर्थ लोप पावला. तरीही अनेक पुरातन साहित्यात मूळ नावांचा बौद्ध संस्कृतीशी असलेला सबंध दिसून येत आहे.

पूर्व- आग्नेयकडील अनेक बौद्ध राष्ट्रात ‘महामुनी’ म्हणून भगवान बुद्धांचा आदराने उल्लेख केला जातो. म्यानमारमध्ये मंडाले शहरात तर ‘महामुनी’ नावाचा मोठा प्रसिद्ध बौद्ध विहार आहे. दररोज असंख्य भाविक येथे येत असल्याने हे विहार सदोदित गजबजलेले असते. आशिया खंडातील अनेक बौद्ध देशातील विहारांची आणि पॅगोड्यांची नावे ‘महामुनी’ आहेत. तसेच अनेक कुटुंबाची नावे ‘महामुनी’ आहेत.

महामुनी पॅगोडा

एवढेंच नाही तर अमेरिकेत देखील अशियातून येऊन तेथे स्थायिक झालेल्या तीन हजाराच्यावर लोकांची नावे ‘महामुनी’ आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही आडनावे असलेल्या व्यक्ती बहुतकरून बौद्ध आहेत. ‘महामुनी’ नावाशी मिळतीजुळती ‘महामुद्रा’ नावाची ध्यानसाधना देखील तिबेटमध्ये असून तिचा उगम बौद्ध संस्कृतीतून झालेला आहे. तसेच ‘महामुनी’ आणि सातव्या शतकात उदय झालेला इस्लाम यांचे प्रेषित ‘महम्मद’ यांच्या नावात देखील साम्य आढळते.

“देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार” असे सांगणारे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील प्राख्यात संत नरहरी सोनार यांचा जन्म इ.स. १३१३ मध्ये पंढरपूर येथे झाला. याच दरम्यान बौद्ध धम्माची ज्योत विझत चालली होती. कट्टर शिवभक्त असून देखील सर्व देव विठ्ठलातच म्हणजे बुद्ध रुपात सामावलेले आहेत, असा त्यांना साक्षात्कार झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संत नरहरी सोनार यांच्या घराण्याचे मूळ आडनाव देखील ‘महामुनी’ होते. यावरून त्यांचे पूर्वज बुद्धांच्या नाम-रूप सिद्धांताचे भक्त होते, असे दिसून येते.

संत नरहरी सोनार

थोडक्यात बुद्ध अनेक देशांत विविध प्रकारच्या संस्कृतीत सामावून गेल्याचे दिसतात. तेथील भूमीतील वृक्षांप्रमाणे तेथे बहरलेले दिसून येतात. तरी ‘महामुनी’ हे केवळ साधे नाव नसून जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तीचा आदराने केलेला नामनिर्देश आहे, हे लक्षात ठेवावे. त्यांचा दुःखमुक्तीचा मार्ग सर्व मानवजातीस कायम प्रकाशित करीत राहो अशी मी प्रार्थना करतो. भारताच्या या महामुनींना माझे त्रिवार वंदन.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)