बुद्ध तत्वज्ञान

श्रेष्ठतम गुरू भगवान बुद्ध

भगवान बुद्धांच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमो युगाचा काळ होता. प्रज्ञेच्या दृष्टिने ते एक मागासलेले युग होते. श्रद्धाळू लोक धर्मग्रंथावर विश्वास ठेवून आचार विधींचे आचरण करत होते. नैतिक विचारांना स्थान नव्हते. भगवान बुद्धांनी हे सर्व बदलले. त्यांच्या शिकवणुकीमुळे समाज जीवनावर अदभुत बदल घडून आला. सत्यमार्गाचे आणि विज्ञानमार्गाचे आकलन लोकांना झाले. सदाचार प्रवृत्ती होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्व लोकांना उमगले.

आजही त्यांच्या शिकवणुकीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होत आहे. त्यांचा अनित्यतेचा सिद्धांत आज खरा ठरला आहे. आजचे आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्ध धम्मातील अनित्य आणि अनात्मवाद यांचा प्रतिध्वनी होय.यामुळे समस्त प्रगल्भ मानवजातीला आपले गुरू म्हणून, मार्गदाता म्हणुन भगवान बुद्ध स्वीकारेवेसे का वाटणार नाही ?. व तसे करणे स्वाभाविकच आहे, हितकारी आहे, निश्चितच लाभदायी सुद्धा आहे. “अंगुत्तर निकाय” या पाली ग्रंथातील ‘कारणपाली सुत्तात’ भगवान बुद्धांविषयी सुंदर भाष्य नुकतेच वाचनात आले. ते खालील प्रमाणे आहे.

वैशालीच्या महावनात कुटागार विहारात भगवान बुद्ध यांचा एकदा विहार होता. त्या समयी तेथे ‘कारणपाली’ नावाचा एक श्रेष्टी लिच्छवींचे कामकाज पहात असे. त्याने पाहीले की पिंगियानी श्रेष्टी दुरून चालत येत आहे. तो जवळ येतात त्याला विचारले “पिंगियानी तुम्ही मध्यान्हीच्या समयी कुठून येत आहात?”

“मी श्रमण गौतम बुद्ध यांच्याकडून येत आहे”
“पिंगियानी ! तुम्ही श्रमण गौतमाच्या प्रज्ञा-सामर्थ्य विषयी काय जाणता? काय तुम्ही त्याला विद्वान मानता?”

“कोठे मी आणि कोठे श्रमण गौतम बुद्ध. मी कोण आहे त्यांच्या प्रज्ञा-सामर्थ्याला जाणणारा ? श्रमण गौतम बुद्धांच्या प्रज्ञा-सामर्थ्याला जाणारा सुद्धा तसाच प्रज्ञा-सामर्थ्यवान असला पाहिजे”

“पिंगियानी ! तुम्ही श्रमण गौतमाची फारच मुक्त प्रशंसा करीत आहात !”
“श्रमण गौतम बुद्ध हे आधीपासूनच अत्यंत प्रशंसनीय आहेत. ते देवांच्यापेक्षा तसेच मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहेत.

“पिंगियानी ! कोणत्या गोष्टींच्यामुळे तुम्ही श्रमण गौतमाप्रति इतके श्रद्धावान आहात ?”

१) “हे पुरुष ! ज्याप्रमाणे श्रेष्ठ रसांनी तृप्त झालेला मनुष्य दुसऱ्या हीनप्रतीच्या रसांची इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे सर्व सूत्त, व्याकरण, अदभुत धम्म याविषयी श्रमण गौतमांची धम्मदेसना ऐकायला मिळते. त्यानंतर त्या विषयासंबंधी इतर श्रमण ब्राह्मणांची मते ऐकण्याची इच्छा होत नाही.

२) ज्याप्रमाणे भुकेने व्याकूळ झालेल्या एखाद्या मनुष्याला गोड भोजन प्राप्त व्हावे, तो ते आनंदाने ग्रहण करील. त्याप्रमाणे श्रमण गौतम बुद्धांची धम्मदेसना ऐकायला मिळते व ती परम संतोष प्राप्त करून देते.

३) ज्याप्रमाणे एखाद्याला चंदनाचे लाकूड मिळावे मग ते हिरवे चंदनाचे असो किंवा लाल चंदनाचे असो. त्याला कुठूनही घासले तरी संतोषात्मक सुगंध दरवळतो. त्याचप्रमाणे श्रमण गौतम बुद्धांची धम्मदेसना असते व ती परम संतोष प्राप्त करून देते.

४) ज्याप्रमाणे एखादा मनुष्य अत्यंत आजारी असावा, दुःखी असावा, पीडित असावा व एखाद्या कुशल चिकित्सकाने त्याला पूर्ण बरा करावे. त्याप्रमाणे श्रमण गौतमाची धम्मदेसना ऐकायला मिळते. त्यामुळे शोक, रडणे-आक्रोश करणे, दुःख, दौर्मनस्य, पश्चाताप समूळ नाहीसे होतात.

५) ज्याप्रमाणे एखादी स्वच्छ पाण्याची, शितल असलेली, रमणीय असलेली, सुप्रसिद्ध असलेली पुष्करिणी असावी व एखादा मनुष्य उष्णतेने तापलेला, होरपळणारा, थकलेला, व्याकूळ झालेला, तहानलेला तेथे यावा व पुष्करिणीत उतरून, स्नान करून, पाणी पिऊन वेदना-क्लेश, होरपळ शांत करावी. या प्रकारे सर्व सू्त्त, गेय्य व अदभूत धम्मासंबंधी श्रमण गौतम बुद्ध यांची धम्मदेसना ऐकायला मिळते. त्यामुळे शोक, रडणे-आक्रोश, होरफळ, पश्चाताप शांत होऊन जातात”.

असे ऐकल्यावर कारणपाली श्रेष्ठी आसनावरून उठला व उत्तरीय उजव्या खांद्यावर ठेवून भगवंतांच्या दिशेने गुडघे टेकून जमिनीवर बसला. व हात जोडून “नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स” असे तीन वेळा उदगारला. व म्हणाला “पिंगियानी ! हे फारच सुंदर आहे. उलटयाला सरळ करावे, झाकलेल्याला उघडे करावे, डोळस माणसाला अंधारात पाहण्यासाठी दीप दाखवावा, तसे तुम्ही अनेक प्रकारांनी धम्माला प्रकाशित केले आहे. हे पिंगियानी ! मी त्या गौतम बुद्धांना शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो. व आजपासून प्राण असेपर्यंत मी त्यांचा उपासक बनून राहीन”.

भगवान बुद्ध आणि त्यांच्या उपदेशांविषयी अशाप्रकारे पालि ग्रंथात सुंदर उदाहरणे दिली आहेत. सर्व सामान्यांना आकलन होईल अशी संभाषण शैली अनेक ठिकाणी दिसते. दुःखमुक्तीचा मार्ग आढळतो. म्हणून आजही अडीज हजार वर्षे झाली तरीही त्रिपिटकाचा दीपस्तंभ अखिल मानवजातीस प्रकाश देत आहे व पुढेही देत राहील.

( संदर्भ:- ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ लेखक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर / अंगुत्तर निकाय-भाग दोन, अनुवादक :- मा श मोरे, कौशल्य प्रकाशन, औरंगाबाद )

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)