बुद्ध तत्वज्ञान

अनेक बौद्ध देशात चिवराचा रंग थोडा वेगळा का दिसतो? भगव्या रंगाचे चिवर आणि त्याचे महत्व

मी नेपाळमध्ये गेलो तेव्हा तेथील भिक्खुंच्या चिवराचा रंग केशरी-भगवा होता. मी सिरीलंकेत गेलो तेव्हा तेथील भिक्खुंच्या चिवराचा रंग पिवळसर, भगवा दिसला. म्यानमारमध्ये गेलो तेव्हा तेथील भिक्खुंचे चिवर भगव्या रंगाचे होते. मात्र भिक्खुंणींच्या चिवराचा रंग गुलाबी होता. जपानी भन्तेजी बरोबर फिरलो तेव्हा त्यांचे चिवर थोडे पिवळसर होते व ते जाडेभरडे नव्हते. तसेच जपान मधील काही भिक्खुं घरी आले होते तेंव्हा त्यांच्या चिवराचा रंग राखाडी होता. मी कंबोडियात गेलो तेव्हा तेथील भिक्खुंचे चिवर भगव्या रंगाचे होते. व्हिएतनाममध्ये गेलो तेव्हा तेथील भिक्खुंचे चिवर पिवळ्या-भगव्यारंगाचे होते.

म्यानमारमध्ये भिक्खुंणींच्या चिवराचा रंग गुलाबी असतो.

लडाखचे धीरगंभीर भिक्खू जेंव्हा घरी आले होते तेव्हा त्यांच्या चिवराचा रंग केशरी-भगवा होता. चीन आणि कोरियातील भिक्खुंचे फोटो बघितले तर ते अनुक्रमे गडद खाकी आणि राखाडी दिसले. यावरून काही बौद्ध देशातील भिक्खुंच्या चिवराचा रंग वेगवेगळा असल्याचे ध्यानी आले. तसेच चिवर परिधानाची पद्धत चीन, कोरिया, जपान वगळता सगळीकडे समान आढळली. त्यामुळे चिवरा संबधी अधिक माहिती घेण्यासाठी मी विनयपिटकातील चिवरगाथा प्रथम वाचून काढली. त्याचे सार खालील प्रमाणे होते.

लडाखमधील भिक्खुंच्या चिवराचा रंग केशरी असल्याचे दिसून येते. हा रंग केसर सारखा दिसत असल्यामुळे केशरी रंगाचे चिवर म्हटले जाते. लाल आणि पिवळा रंग एकत्र केल्यास हा रंग तयार होतो.

जेव्हा पंचवर्गिय भिक्खुंपासून संघ निर्माण झाला तेव्हा बुद्धांनी चिवरा संबंधी नियम सांगितला की टाकून दिलेली वस्त्रे गोळा करून ती स्वच्छ करावीत. धुतल्यानंतर शिवुन परत भगव्या रंगात ती भिजवून ठेवावीत. नंतर दोन दिवसांनी सुकल्यावर ती पिवळसर-भगवी झालेली वस्त्रे परिधान करावीत. तसेच जुनी वस्त्रे किंवा भाताच्या तुसापासून चिवर तयार झाल्यावर त्यास रंगविण्यासाठी थाळ्या, कुंडा, घडा अशी भांडी व रंगासाठी पुष्प, फळे वापरण्यास विहारांना अनुमती दिली. परंतु पुढे जसजसा संघ वाढत गेला तसे अनेक राजे, महाराजे चिवरांचे दान करू लागले. त्याचवेळी वर्षावासाच्या समाप्तीनंतर भिक्खुंना चिवरदान देण्याची प्रथा सुरू झाली.

जपानमध्ये काळ्यारंगाचा अंगरखा जरी परिधान केला तरी त्यावर भगव्यारंगाचे चिवर शालीसारखे घेतले जाते.

हीच प्रथा पुढे कठीण चिवरदान सण, समारंभ म्हणून प्रसिद्ध पावली. या समारंभात सामान्य जनता देखील विणलेल्या कापडांचे चिवरदान करू लागली. भगवान बुद्धांनी देखील शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी असे चिवर स्वीकारण्यास भिक्खुंना परवानगी दिली. प्रत्येक भिक्खुंकडे संघाटी, उत्तरसंग व अंतरवासक धरून केवळ तीन चिवर असावेत असेही त्यांनी सांगितले. आजही चिवराला पिवळा, भगवा रंग येण्यासाठी फणसाच्या झाडाच्या सालीचा, हळदीचा वापर म्यानमारमध्ये केला जातो. या रंगामुळे चिवर भडक न दिसता त्यात साधेपणा येतो.

गडद तपकिरी रंगाचे चिवर परिधान केलेले जपानमधील भिक्खूगण.

फार पूर्वी गरम पाण्यात वृक्षपर्ण, पुष्प, फणसाचे खोड, फळे टाकून रंग तयार केला जात असे. नंतर त्यात चिवर वस्त्र भिजवून ते दोन दिवस सुकवीत असत. अशा पध्दतीने चिवराला भगवा रंग येत असे. भगवा रंग हा अनासक्ती, अनित्यता, क्षणभंगुरता दर्शवितो. या रंगामुळे मनात विकारांचा क्षोभ होत नाही. चीन देशात पिवळा-भगवा रंग हा प्रामुख्याने पृथ्वीचा मानला जातो. तसेच तो एकात्मता, समानता दर्शवितो असे समजतात. वेगवेगळ्या पंथामुळे अनेक बौद्ध देशात चिवराचा रंग थोडा वेगळा दिसतो.

कोरियातील राखाडी रंगाचे चिवर व त्यावर उपरण्यासारखे घेतलेले भगवे वस्त्र.

विशेषकरून चीन आणि जपानमध्ये काळा, गडद खाकी(चॉकलेटी), आणि राखाडी रंगाचे चिवर घातलेले भिक्खू दिसतात. मात्र कोरियामध्ये या चिवरावर भगव्या वस्त्रांचे उपरणे हे घेतले जाते. तिबेटचे भिक्खू थोड्या गडद केशरी रंगाच्या चिवरमध्ये दिसतात. भिक्खुंणीसाठी सफेद किंवा गुलाबी चिवर थेरवादी परंपरेमध्ये आढळते.

तपकिरी, गडद खाकी रंगाचे चिवर परिधान केलेले चीनमधील भिक्खू.

जी व्यक्ती चिवर परिधान करते तिचा योग्य आदर बौद्ध परंपरेमध्ये राखला जातो. विकारांना भग्न केलेल्या भिक्खुंचा भगव्या चिवरांवर प्रथम अधिकार आहे. संसार त्यागून भिक्खुंची उपसंपदा घेऊन सत्यमार्गावर चालण्यासाठी मन खंबीर असावे लागते. त्रिपिटकाचे पूर्णपणे अध्ययन करावे लागते. मुख्य म्हणजे चिंतन-मनन, ध्यानसाधना करून स्वतःला धम्मप्रवाहात झोकून द्यावे लागते. म्हणूनच चिवर परिधान केलेली व्यक्ती ही सामान्यजनांपेक्षा श्रेष्ठ असते. धम्माची प्रगती आणि प्रसार करण्यास त्यांचेच मोलाचे योगदान असते. म्हणूनच भगवान बुद्धांच्या काळापासून ज्या भिक्खुंनीं संघाच्या परंपरेनुसार धम्माचा अभ्यास करून, प्रसार करून सर्व देशांतील जनमानसात बौद्ध तत्वज्ञानाचा प्रवाह अखंड चालू ठेवला त्यांना मी नमन करतो. त्यांचे कुठेही दर्शन झाल्यास त्यांना हात जोडून प्रणाम करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहासाचे अभ्यासक)