ब्लॉग

गजराज आणि बुद्धिझम; लेण्यांमध्ये, स्तूपाच्या ठिकाणी आणि विहारात गजराजाचे शिल्प

या पृथ्वीतलावावर गजराज प्राण्याचा निर्देश इतर कोणत्याही धर्मापेक्षा बुद्धांच्या धम्मात प्रखरतेने झालेला दिसतो. गजराजांचा उल्लेख हा प्रामुख्याने बुद्धांशी निगडित असल्याने गजराज आणि बुद्ध यांचा संबंध बौद्ध साहित्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. सिद्धार्थ यांच्या जन्मा अगोदरपासून शुभ्रधवल गजराज याची बुद्ध व्यक्तिरेखेशी नाळ जोडली गेलेली आहे. सुळे असलेला शुभ्रधवल गजराज सोंडेत कमलपुष्प धरून तीन वेळा प्रदक्षिणा घालून उदरात प्रवेश करतो, असे स्वप्न कपिलवस्तू नगराची राणी महामाया देवी यांना पडले होते आणि ते निश्चितच अलौकिक होते. या स्वप्नाचा अर्थ सांगितला गेला की एका महान व्यक्तिमत्त्वाचा पृथ्वीवर जन्म होणार आहे. याचमुळे धम्मामध्ये गजराजाचा संबंध बुद्धांशी जोडला असावा. गजराज म्हणजे सामर्थ्य, शौर्यता, प्रामाणिकता आणि अलौकिक बुद्धी यांचा संगम होय. याचाच अर्थ अमर्यादीत अलौकीक बुद्धिमत्तेचे सामर्थ्य बुद्ध व्यक्तिमत्वाशी जोडले गेले आहे.

मध्यप्रदेश राज्यात सांची स्तूपाच्या तोरणात असंख्य गजराजाची शिल्पे दिसतात. सांचीच्या स्तुपातील महामाया शिल्पामधील गजराज.

लेण्यांमध्ये, स्तूपाच्या ठिकाणी आणि विहारात गजराजाचे शिल्प आढळते. गजराज प्रतिमा हे बुद्धांचे अतुलनिय मानसिक सामर्थ्य दर्शविते. स्वतःच्या ताब्यात नसलेले, उधळलेले मन अपरिमित हानी करते. त्यास करड्या रंगाचा हत्ती म्हणून दर्शविण्यात येते. तर शांत, निर्मळ आणि ताब्यात असलेले मन हे शुभ्रधवल गजराज म्हणून संबोधले गेले. भरकटलेले मन भयंकर विध्वंस घडवून आणते. त्याला चुचकारत, ध्यानधारणा करत ताब्यात घेऊन शांत करणे, माणसाळावणे म्हणजेच मानवी मनाचे शुभ्रधवल शक्तिशाली गजराजात रुपांतर करणे होय. उधळलेल्या मनाला ताब्यात ठेवल्याने त्याचे सामर्थ्य कैक पटीने वाढते. म्हणूनच ९-१० व्या शतकात धम्माचा लय होत असताना दुःख मुक्तीचा मार्ग सांगणाऱ्या मूळ पुरुषाचे म्हणजेच बुद्धांचे रूपांतर इतर धर्मात अनेक प्रतिकांमध्ये झाल्याचे दिसून येते. अनेक दंतकथा मग त्याच्या पुष्ट्यर्थ रचल्या गेल्या. त्याची शहनिशा न करता आज त्यांनाच कवटाळून बहूजन समाज विश्वास ठेवून बसलेला दिसतो.

सुळे असलेला शुभ्रधवल गजराज राणी महामाया देवीच्या स्वप्नात आल्याची कथा सर्वश्रुत आहे. सिद्धार्थ यांच्या जन्माशी ही कथा निगडित असल्याने बौद्ध साहित्यात गजराजाचे महत्व अधोरेखित झाले आहे.

चीन,भारत आणि आफ्रिका मध्ये गजराज हे सौंदर्य, सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि शांततेचे प्रतीक मानले गेले आहे. तसेच गजराजाचे चिन्ह हे शुभ आणि उज्वल भविष्याचे प्रतीक म्हणूनही मानले जाते. भारतात प्राचीनकाळी अनेक राजांच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर हत्ती सुरक्षिततेसाठी आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून झुलवत ठेवले जात असत. तसेच वाईट शक्ती पासून बचाव होण्यासाठी आणि चांगल्या गोष्टींचा भविष्यात उदय होण्यासाठी हत्तीचे शिल्प राजवाड्याच्या दारात उभारले जात असे. हत्ती जसा माणसाळल्यावर मानव प्राण्याची अनेक छोटीमोठी कामे करतो त्याचप्रमाणे उधळलेल्या मनाला शांत, निर्मळ केल्यावर त्याच्या सामर्थ्याने दुखमुक्तीचा भवसागर पार करत येतो. गजराजाचे नयन हे नेहमी अलौकिक आणि गूढरम्य भासतात. त्याची मुद्रा शक्तिशाली सामर्थ्य आणि प्रचंड बुद्धिमत्ता म्हणूनच शिल्पांमध्ये घडवीली गेली. प्राचीनकाळी स्तंभावरती गजराजाची मुद्रा अंकित करणे म्हणजेच प्रखर बुद्धिमत्तेचे तेज म्हणून बुद्धांना दर्शविले जात होते.

प्राचीन स्तुपात, कुडा-अजिंठा-वेरूळ-एलिफंटा-कान्हेरी अशा सारख्या असंख्य लेण्यात आणि प्राचीन भुजपत्रावर गजराजांची शिल्पे आणि प्रतिमा दिसून येतात. गजराज हा धीम्या गतीने चालतो आणि त्याच्या चालण्याने पायाखालची धरणी कंपित होत असते. तथागतांचे, ज्ञानी पुरुषांचे देखील असेच असते. ते जिथेजिथे जातात तेव्हा अंतरंगातील तरंगाने आजूबाजूस प्रसन्नता आणि शांतता पसरवितात. अज्ञजनांची दोलानामय कंपने शांत करतात. चित्त एकाग्रतेने, करुणेने भरून जाते. देवदत्ताने मारण्यासाठी सोडलेला नालागिरी गजराज हा देखील बुद्धांच्या सानिध्यात येताच तात्काळ शांत झाला हे त्याचे मोठे उदाहरण होय. म्हणूनच गजराज यांच्या प्रतिमांना आज भारत वर्षात सगळीकडे पुजले जात असले तरी मूळ इतिहास विसरता कामा नये. पिढ्यानपिढ्या भाषा जरी बदलली तरी इतिहासाचे धागेदोरे मजबूत ठेवल्यास तो बदलला जाण्याची शक्यता कमी होते, याचे भान नेहमी ठेवावे.

-संजय सावंत, नवी मुंबई ( लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *