ब्लॉग

थायलंड मधील ‘या’ घटनेने ध्यानसाधनेचे महत्व जगभर अधोरेखित झाले

थायलंडमध्ये २०१८ मध्ये २३ जून ते १० जुलै दरम्यान बारा मुले आणि प्रशिक्षक एका लांबलचक गुहेत १५ दिवस अडकून पडली होती. सर्व जगाचे लक्ष तेथे लागले होते. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनी आपली सुरक्षा पथके तात्काळ तेथे पाठविली. जमिनीखालील गुहेतील पाण्यात राहून संशोधन करणारे डायव्हर्स आले. थाई देशाचे नेव्ही सीलचे पथक देखील मदतीला धावले. गुहेच्या प्रवेशद्वारावर मुलांच्या सायकली आणि दप्तरे पाहून मुलांच्या मातांचा आक्रोश सुरू झाला. गुहेतील पाण्यात अडकून मुलांचे काही बरेवाईट होऊ नये आणि ती सुखरूपपणे बाहेर पडावीत यासाठी प्रार्थना सुरू झाल्या. म्यानमारच्या सीमेवरील मोठे नावाजलेले वयोवृद्ध बौद्ध भिक्खू यांनी तेथे येऊन प्रार्थना केली व मुले सुखरूप असल्याचे सांगून पालकांना आश्वस्थ केले.

मिडियाद्वारे ही सर्व माहिती जगभरात झाल्याने सर्वांचे डोळे तेथे लागले. तेरा डायव्हर्स तेथे शोध घेत होते. बाहेर मुसळधार पाऊस चालू होता. गुहेतील पाणी बाहेर काढण्यासाठी भारतातून आणलेले किर्लोस्कर पंप रात्रंदिवस चालू होते. ९ व्या दिवशी समजले की मुले अद्याप सुखरूप असून गुहेतील उंच भागावर अडकून पडली आहेत. थाई सरकारने तज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ आणि पाणबुडे यांच्याशी विचारविनिमय करून त्यांना कसे बाहेर काढता येईल याचा विचार केला. कारण तीनचार तास अरुंद गुहेतील पाण्यातून ऑक्सिजन मास्क घालून मुलांना बाहेर काढणे सोपे नव्हते. शेवटी त्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन मास्क घालून १६-१७ व्या दिवशी बाहेर काढण्यात आले व रुग्णालयात हेलिकॉप्टरने नेण्यात आले. अशा तर्हेने मोठे थरारक ऑपरेशन पार पडले. ज्या ब्रिटिश डायव्हर्सने यात मोठी भूमिका बजावली त्या जॉन वोलनदेन याचा थायी सरकारने तसेच इंग्लंडच्या राणीने सत्कार केला.

प्रशिक्षक एकोपोल हा पूर्वायुष्यात भिक्खू होता. ध्यानाचा अभ्यास गुहेतील कठीण प्रसंगात उपयोगी आला.

आता प्रश्न आला की ही मुले पंधरा दिवस अंधाऱ्या गुहेत अन्नपाण्यावाचून कशी राहू शकली ? बाराजणांच्या या फुटबॉल टीम सोबत एकोपोल च्यान्थवोन्ग हा २५ वर्षाचा प्रशिक्षक देखील होता. तो स्वभावाने शांत आणि अबोल होता. तेथील चँग माई विहारात तो तीन वर्षे भिक्खूची उपसंपदा घेऊन तेथे सेवा देत होता. वृद्ध आणि आजारी असलेल्या मावशीची देखभाल करण्यासाठी त्याने चिवर उतरविले आणि तेथील शाळेत फुटबॉल प्रशिक्षक म्हणून नोकरी धरली.

तीन-चार तास ऑक्सिजन मास्क घालून अरुंद गुहेतील पाण्यातून प्रवास करणे सोपे नव्हते. वाटेत उंचवट्यावर थांबत थांबत ११- १६ वयोगटातील मुलांना थाई सरकारने परवानगी दिल्यावर भूल देऊन बाहेर काढले गेले.

जूनमध्ये टीममधील एकाचा वाढदिवस असल्याने गुहेतील भिंतीवर नावे लिहिण्यासाठी ते सर्व गुहेत शिरले. पण मुसळधार पाऊस चालू झाल्याने अडकून पडले. गांभीर्य ओळखून प्रशिक्षक एकोपोल याने प्रथम सर्वांना उंच जागी नेले. सर्वांना धीर दिला. आणि मुख्य म्हणजे विपरीत परिस्थितीत श्वासावर लक्ष ठेवून शांत कसे रहावे हे शिकविले. शिल्लक बिस्किटे पुरवून त्यांची भूक भागविली. गुहेतील गढूळ पाणी पिण्यास मज्जाव केला. त्या ऐवजी भिंत आणि छतावरून ओघळणारे पाणी पिण्यास सांगितले. ब्रिटिश डायव्हरने त्यांना ९व्या दिवशी प्रथम शोधले तेंव्हा ती मुले गुहेतील खडकावर अंधारात शांत बसलेली पाहून तो चकित झाला होता.

सुटका होईपर्यंत अंधाऱ्या गुहेत मुलांनी १४-१५ दिवस ध्यानात वेळ व्यतित केला. भीती, भूख नाहीशी होऊन नवीन अनुभूती प्राप्त झाली.

या घटनेने ध्यानसाधनेचे महत्व जगभर अधोरेखित झाले. काहीही संकट आले किंवा विपरीत परिस्थिती आली तर अनेकांचा मनावरील ताबा सुटतो. मना विरुद्ध काही घडल्यास अनेकजण व्यथित, क्रोधीत, व्याकूळ होतात. कारण असंख्य विकारांनी मनाला पोखरलेले असते. त्याचा परिणाम शरीरावर देखील होत असतो. यास्तव मनाला ताब्यात ठेवणे, त्याच्यावर योग्य संस्कार करणे, विकारांना दूर सारणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि या गोष्टी ध्यानसाधनेनेच प्राप्त होत असतात. बुद्धांची विपश्यना ध्यानसाधना ही मनाची चांगली मशागत करून विकारमुक्त आणि भयमुक्त जीवन जगण्याचा मार्ग दाखविते.

निर्मळ, आनंदी जीवन जगणे हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे. नियमित साधना करणारा साधक कुठल्याही परिस्थितीत न खचता धीरगंभीर राहतो. जीवनातील अनेक परीक्षेत यशस्वी होतो. शील,समाधी आणि प्रज्ञा यांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीस निसर्गशक्ती नेहमी सहाय्य करतात. जगातील सर्वच वृत्तपत्रांनी एकोपोलच्या धीराचे आणि ध्यानसाधनेचे कौतुक केले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तपत्रात देखील मेघा पै यांनी लेख लिहून मुलांना ध्यान शिकविणे किती आवश्यक आहे हे पोटतिडकीने सांगितले आहे. ‘मित्र उपक्रम’ काय आहे हे ही या निमित्ताने जाणून घ्यावे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)