इतिहास

तथागत बुद्धांचे अंतिम शब्द…

तथागत बुद्धांनी आयुष्यमान आनंद यांना संबोधून म्हटले ‘कदाचित आनंद! तुमच्यापैकी काहींना विचार येऊ शकतो, येथे (आमच्याकडे) निघून गेलेल्या शास्त्याचा उपदेश (धम्म) आहे, आता आमच्यासोबत आमचा शास्ता (गुरू) नाही’ परंतु आनंद! याला आशाप्रकारे पाहू (जाणू) नका, मी जो धम्म आणि विनय सांगितला आहे, उपदेश केला आहे, आनंद! माझ्यानंतर तोच तुमचा शास्ता (गुरू) आहे.

‘जसे आनंद! आजकाल भिक्खू एकदुसर्‍याला ‘आवुस’ म्हणून संबोधतात. मी गेल्यानंतर अशाप्रकारे एक दुसर्‍याला संबोधू नका. आनंद! (उपसंपदा किंवा प्रव्रज्येने मोठ्या) भिक्खूने नवोदित (उपसंपदा किंवा प्रव्ररज्जेने लहान भिक्खूला) त्याचे नाव, गोत्र घेऊन किंवा ‘आवुस’ म्हणून संबोधावे, नवोदित भिक्खूने स्थविर भिक्खूला ‘भन्ते किंवा आयुष्यमान’ म्हणून संबोधावे.’

नंतर भगवंताने भिक्खूंना संबोधून म्हटले, कदाचित भिक्खूंनो! तुमच्यातील एकाही भिक्खूच्या मनात बुद्ध किंवा धम्म किंवा संघ किंवा मार्ग किंवा प्रतिपदा या विषयी काही संदेह असल्यास, काही गोंधळ असल्यास थेट विचारून घ्या. नंतर भिक्खूनो! असा विचार करून पश्चाताप करू नका, ‘ शास्ता आमच्यासमोर होते परंतु आम्ही भगवंताला काहीच विचारू शकलो नाही. जेव्हा शास्ता आमच्यासमोर होते.’असे विचारले गेल्यावर भिक्खू मौन राहिले, दुसर्‍यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा भगवंतांनी भिक्खूंना वरीलप्रमाणे संबोधून विचारले. भिक्खू तिसऱ्यांदासुध्दा मौन राहिले.

नंतर भगवंत त्यांना संबोधून म्हणाले, ‘कदाचित भिक्खूंनो! तुमच्या शास्त्याच्या परम आदरामुळे तुम्ही प्रश्न विचारीत नसाल, तर भिक्षूंनो! तुम्ही एक दुसर्‍यांना विचारा’. यानंतर सुध्दा ते भिक्खू मौन राहिले.

नंतर आयुष्यमान आनंद यांनी भगवंतास म्हटले, ‘ आश्चर्य अहे, भंते! अद्भुत आहे भंते! मलाही प्रसन्नता आहे, भंते! या संपूर्ण भिक्खूसंघात एकसुद्धा भिक्खु नाही ज्यांच्या मनात बुद्ध आणि धम्म किंवा संघ किंवा मार्ग किंवा प्रतिपदा यांविषयी काही संदेह आहे. काही गोंधळ आहे’.

‘आनंद! तू श्रध्देतून बोलत आहेत परंतु, याविषयी आनंद, तथागत जाणतात, आणि खात्रीने जाणतात की यासंपूर्ण भिक्खूसंघात एक सुद्धा भिक्खू नाही ज्याच्या मनात बुद्ध किंवा धम्म किंवा संघ किंवा मार्ग किंवा प्रतिपदा याविषयी काही संदेह आहे, काही गोंधळ आहे. खरोखर आनंद! जरी या पाचशे भिक्खूंमध्ये एखाद्याची आध्यात्मिक प्राप्ती फारच कमी असेल तरी तो श्रोतापन्न आहे. तो अपाय गतीस जाणार नाही याची खात्री आहे आणि अर्हतपदाचा लाभ करून घेण्यासाठी बांधील आहे.’

नंतर भगवंतानी भिक्खूंना संबोधून म्हटले, तर भिक्खूंनो! मी आता तुम्हाला संबोधत आहे की, ‘सर्व संस्कार व्यय- धर्मा (नाशवान) आहेत. अप्रमादी राहून तुम्ही तुमचे ध्येय (निर्वाण) संपादन करा’, हेच तथागताचे अंतिम वचन होय.’

संदर्भ:  महापरिनिब्बाण सुत्त, दीघनिकाय सुत्त क्र. १६