इतिहास

‘माघ पूजा’ हा मूळ बौद्धसण आहे असे म्हटल्यावर तुम्ही चक्रावून जाल

माघपूजा सण म्हटल्यावर भारतातील बऱ्याच जणांना प्रयाग येथील गंगा-जमुना संगमावर माघ पौर्णिमेस होणारे स्नान आठवेल. कुंभमेळा आठवेल. गणेश पूजा आठवेल. पण हा मूळ बौद्धसण आहे असे म्हटल्यावर तुम्ही चक्रावून जाल. कपाळाला आठ्या पाडाल. पण सत्य हे आहे की या देशातील मूळ बौद्धसणांना पुरोहित वर्गाने काल्पनिक पुराणकथांचे लेबल लावले आहे.

(वाचा Reader’s digest Feb.2019 ) आणि हे ध्यानी घेतले की बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. यासाठी सांप्रदायिक परंपरेचे चष्मे फेकून निखालस दृष्टीने बघावे लागेल. सम्राट अशोकाच्या काळात हा सण संघदिन म्हणून साजरा होत असे. दोन हजार वर्षांपूर्वी धम्माचा प्रसार जेव्हा पूर्वेकडील देशात झाला तेव्हा या सणांच्या प्रथा सुद्धा तेथे गेल्या. तिथे सुद्धा हे बौद्धसण साजरे होऊ लागले. आणि ते शुद्ध स्वरूपात राहिले.भारतात मात्र त्याला पुरोहित वर्गाने वेगळे कथानक जोडून त्याचा हळूहळू कायापालट केला. याची सत्यता पडताळायची असेलतर माघ पौर्णिमेला पूर्व आणि अग्नेय देशात साजऱ्या होणाऱ्या या सणाचे निरीक्षण करा.

माघ पौर्णिमेला हा सण संघ दिवस म्हणून थायलंड, कंबोडिया, लाओस व म्यानमार येथे साजरा होतो. व तो शक्यतो फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चच्या सुरुवातीस येतो. यामागची मूळ कथा अशी आहे की भगवान बुद्धांना वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्त झाल्यावर दहा महिन्यांनी खालील चार गोष्टी घडल्या.

१) १२५० उपासक बुद्धांसमोर उपदेश ऐकण्यासाठी माघ पौर्णिमेला अचानक एकत्रित आले.
२) बुद्धांनी त्यांना ‘एही भिक्खवे’ म्हणून उपसंपदा दिली. संघात दाखल करून घेतले.
३) त्यांच्या शिकवणीमुळे एकाग्र होऊन ते सर्व अहर्त झाले.
४) बुद्धाने त्यांना पतिमोक्खाचा उपदेश दिला.

माघ पौर्णिमेला संघात वाढ झाल्याने त्यास ‘माघ पूजा दिवस’ किंवा ‘संघ दिवस’ असे म्हटले गेले. थायलंडमध्ये माघ पौर्णिमेचा हा दिवस तर मोठ्या प्रमाणात ‘संघ दिन’ म्हणून साजरा करतात. त्या दिवशी लवकर उठून भिक्खूंसाठी भोजन तयार करून त्यांना दिले जाते. आठ शीलांचे त्या दिवशी खास पालन केले जाते. सर्व एकत्रित येऊन ध्यान साधना करतात. संध्याकाळी विहारातून धम्मप्रवचन दिले जाते. रात्री दिवाबत्ती कंदील घेऊन धम्मयात्रा काढली जाते.(Magha Lantern Lighting Ceremony)

‘वात फ्रा धम्मकाया’ या विहारात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. युनेस्कोने गौरवीलेला शांतीचा हा सण बुद्धांप्रती आदर भावना व्यक्त करतो. लाओस आणि कंबोडिया या देशात तर या दिवशी सुट्टी असते. तेथे सुद्धा लोक विहारात जातात. अष्टशिल प्रतिज्ञा घेतात. तसेच इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्यादिवशी होतात. म्यानमारमध्ये माघ पूजेला ‘तबॉगं पौर्णिमा’ म्हणतात. पॅगोडा आणि विहारात बुद्ध पूजा केली जाते. दहा दिवस अभिधम्मपिटकाचे संपूर्ण वाचन होते. या दिवसात ‘कैक खूक पॅगोडा’ व ‘श्वेडेगॉन पॅगोडा’ महोत्सव साजरा होतो. असा हा माघ पोर्णिमा सण प्रमुख बौद्ध देशात तळागाळात रुजला आहे

तेव्हा आपणही पुढील महिन्यात रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी येणारी माघ महिन्याची पौर्णिमा भगवान बुद्धांनी स्थापिलेल्या संघाचा दिवस म्हणून साजरी करु. त्या दिवशी कुटुंबासहित विहारात जाऊ. भिक्खूंना भोजनदान आणि द्रव्यदान करु. जवळपास विहार व भिक्खूं नसले तरी एखाद्या चुणचुणीत मुलास एका दिवसासाठी भन्तेजींची भूमिका देऊन त्याच्यातर्फे व घरातील वरिष्ठांतर्फे संपुर्ण बुद्ध वंदनेचे पारायण करू. आजूबाजूस खीर दान वाटप करू. असे केले तरच लुप्त झालेल्या भारतातील प्राचीन बौद्ध परंपरेचे पुनरुज्जीवन केल्यासारखे होईल. आणि नवीन पिढीला यातून मार्गदर्शन मिळेल.

– संजय सावंत, नवी मुंबई (लेखक बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *