इतिहास

अद्यापही उत्खनन न झालेला रामग्रामचा मूळ स्तूप

भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींचे आठ भाग द्रोण ब्राह्मणाने केले व त्याचे वाटप त्यावेळच्या आठ गणराज्यांच्या राजांना केले. ती राज्ये खालील प्रमाणे होती. मगधचा राजा अजातशत्रू, वैशालीचे लिच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, अहकप्पाचे वल्लीय, रामग्रामचे कोलिय, पावाचे मल्ल, कुशिनगरचे मल्ल आणि वेठद्विपाचे ब्राह्मण. नंतर त्या राजांनी त्यावर मोठे स्तूप उभारले. पुढे ३०० वर्षांनी म्हणजेच इ.स. पूर्व २६० मध्ये मौर्य सम्राट अशोक यांनी आठ पैकी सात स्तूप उघडले व त्यातील बुद्धधातू काढून त्यांचे परत लहान भाग करून भारतभर चौर्‍याऐंशी हजार स्तूप बांधण्याकरीता भिक्खुं सोबत पाठविले.

आता प्रश्न असा पडतो की सम्राट अशोक यांनी आठ पैकी सातच स्तूप का उघडले ? जो स्तूप उघडला नाही त्याचे नाव काय ? त्या स्तुपाचे नाव ‘रामग्रामचा स्तूप’. त्या बाबत इतिहासात असे लिहिले आहे की सम्राट अशोक जेव्हा स्तूप ताब्यात घेण्यासाठी तेथे आले तेव्हा रामग्रामच्या सर्व नागरिकांनी त्यास कडाडून विरोध केला. “बुद्धांच्या या पवित्र अस्थी येथेच राहू द्या” अशी विनंती त्यांनी सम्राट अशोक यांना केली. त्यांची भगवान बुद्धांच्याप्रती असलेली श्रद्धा बघून सम्राट अशोक स्तूप न उघडताच परत फिरले.

द्रोण ब्राम्हणाने बुद्ध अस्थींचे आठ भाग केले- त्याचे शिल्प

तसेच त्याबद्दल दुसरी कथा सांगितली जाते की रामग्रामच्या नाग लोकांनी युद्धसदृश्य कडवा विरोध केल्याने सम्राट अशोक यांनी माघार घेतली. त्याबाबतचे शिल्प सांची स्तूपाच्या तोरण स्तंभावर देखील बघावयास मिळते. त्यानंतर या स्तुपांनी जवळजवळ दोन हजार पावसाळे पाहिले. अखेर इंग्रजांच्या राजवटीत भारत खंडातील अनेक स्तुपांचे पुन्हा उत्खनन झाले. बुद्धांचे अस्थीकलश बाहेर काढण्यात आले व त्यातील बुद्ध धातू जगभर अनेक नामांकित मॉनेस्ट्रीमध्ये, पॅगोडामध्ये, म्युझियम मध्ये दर्शनार्थ ठेवण्यात आले. आता पुन्हा प्रश्न पडतो की इंग्रजांनी रामग्रामच्या स्तुपाचे उत्खनन केले काय ? केले नसल्यास का केले नाही ?

नोव्हेंबर २०१९ मध्ये डरहॅमच्या पुरातत्त्ववेत्त्यांनी केले इथे सर्वेक्षण.

चिनी भिक्खू प्रवासी फाहियान आणि हुएनत्संग यांनी देखील अनुक्रमे ५ व्या व ७ व्या शतकातील त्यांच्या प्रवासवर्णनात रामग्रामच्या स्तुपाचा उल्लेख केला असून तो उजाड स्थितीत असल्याचे म्हटले आहे. इंग्रजांच्या काळात पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम तसेच पुरातत्ववेत्ते कार्लेले यांना रामग्रामच्या स्तुपाचे स्थान निश्चित न करता आल्याने त्याचे उत्खनन केले गेले नाही. ( त्याचप्रमाणे अहकप्पा स्तुपाचे स्थान अद्यापही निश्चित झाले नाही. ) सन १८९६ मध्ये लुम्बीनीचे स्थान निश्चित झाल्यावर आजूबाजूच्या जंगलातील पुरातन अवशेषांचा शोध घेणे सुरू झाले.

उत्तर भारतात काही गावात अद्यापही दगडाचे, विटांचे बांधकाम असलेले मोठे उंचवटे आढळतात. त्यावर काहीठिकाणी वृक्षांची वाढ झाली आहे. अशा जागी उत्खनन झाले पाहिजे.

टी व्हॅटर्स, डॉ. होये, पी.सी. मुखर्जी यांनी याबाबत संशोधन केले. डेक्कन कॉलेजचे देव सर यांनी १९६४ मध्ये परासी, नेपाळ येथे उंच टेकडी बाबतची नोंद केली. अखेर नेपाळ पुरातत्व विभागाचे बाबूकृष्णा रीजल यांनी १९७४ रोजी ही टेकडी म्हणजे रामग्रामचा स्तूप असल्याचे जाहीर केले. फाहियान आणि हुएनत्संग यांनी त्यांच्या प्रवास वर्णनात लुम्बिनी पासून सांगितलेल्या अंतरावर हा स्तूप बरोबर आढळला. १९९७-९९ मध्ये आजूबाजूला झालेल्या उत्खननात येथे विहाराचे अवशेष, प्रदक्षिणा पथ, कुशाण राजवटीतील नाणी, विटा मिळाल्या. अशी सुद्धा वंदता आहे की नदीकिनारी असलेला हा स्तूप वारंवार येणाऱ्या पुरामुळे खचला. त्यामुळे त्यातील वाहून निघालेले अवशेष सिरिलंकेत अनूराधापुर येथील ‘रुवानवेलीसया’ या महास्तुपात राजा दुतुगामिनी यांनी ( इ.स.पूर्व १६१-१३७) ठेवले आहेत.

असो. सध्या नेपाळमधील परासी जिल्ह्यातील रामग्रामच्या या स्तुपाचे भु-भौतिकीशास्त्र सर्वेक्षण ( Geophysics Survey ) इंग्लंडच्या डरहॅम विद्यापीठातील पुरातत्ववेत्त्यांनी नुकतेच मागील वर्षी केले. अद्यापही सुस्थितीत असलेला व उत्खनन न झालेला हा स्तूप व त्याचा परिसर नेपाळमध्ये आता मोठे बौद्धक्षेत्र झालेले आहे. या स्तुपात गेल्या २४०० वर्षांपासून बुद्ध धातू असल्यामुळे नेपाळमध्ये कधी गेल्यास या स्तुपाचे आवश्य दर्शन करावे. तेथील निर्मळ, शांत तरंगे आपणास नक्कीच पुलकित करतील.

-संजय सावंत, नवी मुंबई, (लेखक- ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *