डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली असंख्य अनुयायांसह धर्मांतर करून समस्त भारतवर्षाला याच भूमीत लयास गेलेल्या बुद्धांच्या धम्माची माहिती दिली. या गोष्टीस ६४-६५ वर्ष झाली. त्यावेळी तरुण असणारी पिढी आता लयास गेली आहे. धर्मांतरानंतर सत्तर-ऐशीच्या दशकात जन्मलेले आज पन्नाशी-साठी पार करीत आहेत. त्यांनी आपआपल्या परीने धम्म समजून घेतला. भरपूर वाचन केले. अभ्यास केला. संशोधन केले. समाजापुढे मांडले. आता पुढची नवीन तरुण पिढी धम्माची धुरा खांद्यावर घेऊन पुढे निघाली आहे.
एकेकाळी विस्मरणात गेलेला बुद्ध भारतखंडात आता जोमाने पसरत आहे. पण तरीही आचार्य गोयंका गुरुजी सोडल्यास धम्मात परिपक्व झालेले इतर भारतीय धीरगंभीर व्यक्तिमत्त्व आढळत नाही. स्त्रोतापन्न, सकदागामि, अनागामि अशी उच्च अवस्था प्राप्त केलेले कुणी तपस्वी दिसत नाहीत. तसेच धम्मामध्ये अंतिम अवस्था गाठलेले अर्हत सुद्धा आढळत नाहीत. लोकांनी बुद्ध स्विकारला, त्याच्या इतिहासाचा अभ्यास केला, त्यांच्या तत्त्वज्ञानावर प्रबंध लिहिले. पण ते तत्वज्ञान अंगिकारले काय ? त्यांनी सांगितलेल्या ध्यानसाधनेचा अभ्यास किती जणांनी केला? किती जणांनी अध्यात्मिक उंची गाठली ? वैयक्तिकरीत्या कितीजनांनी आनापान साधनेवर प्रभुत्व मिळविले ? उलट काहींनी ध्यानसाधना करणे हे आपले लक्ष असू नये असे प्रतिपादले. गेल्या पन्नास-साठ वर्षात बुद्धांच्या चरित्राची नुसतीच पारायणे झाली असे लक्षात येते. नष्ट झालेल्या बौद्ध संस्कृतीचा अभ्यास झाला. परंतु त्यांनी उपदेशिलेल्या धम्माच्या अर्थाला प्रज्ञेने कोणीच पारखले नाही. वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांना जाणले नाही. खरेतर जे धम्म उपदेशांना धारण करतात तेच अंतिम लक्षापर्यंत जातात. चर्चा- वादविवाद करून जुन्याच गोष्टी उगाळत बसत नाहीत.
बुद्धांनी सांगितले आहे की ” भिक्खुंनो ! मी तराफ्याच्या साहाय्याने पैलतीरावर जाण्यासाठी धम्माचा उपदेश करतो, तराफ्यालाच पकडून ठेवण्यासाठी नाही. त्याला ऐका आणि चांगल्या तर्हेने लक्षात ठेवा.”
“ज्याप्रमाणे भिक्खुंनो ! कोणी मनुष्य प्रवास करीत असताना एखाद्या मोठ्या नदीजवळ यावा. याचा अलीकडचा तीर धोक्याचा आणि भीतीदायक असावा आणि पलीकडचा तीर क्षेमयुक्त आणि भयरहित असावा. पण तिथे पलीकडे जाण्यासाठी नाव नाही आणि पूलही नसावा. तेव्हा त्याच्या मनात यावे. “अरेरे ! ही मोठी नदी आहे. त्याचा अलीकडचा तीर धोक्याचा आणि भीतीदायक आहे. आणि पलीकडचा तीर क्षेमयुक्त आणि भयरहित आहे. पण तेथे जाण्यासाठी नाव नाही की सेतू नाही. तरी मी तृण-काष्ठ-पात्र जमवून एक तराफा का बांधू नये आणि तराफ्याच्या साहाय्याने पलीकडच्या तीरावर उतरून का जाऊ नये. तेव्हा तो मनुष्य तृण- काष्ट- पात्र जमवून तराफा बांधून तराफ्याच्या साह्याने व हाताने आणि पायाने मेहनत करून स्वस्थ चित्ताने पलीकडच्या तीरावर उतरून जावा.
पलीकडच्या तीरावर उतरून गेल्यावर त्याच्या मनात असे यावे “हा तराफा मला फार उपकारी झाला आहे. त्याच्या सहाय्याने मी पलीकडील तीरावर उतरलो आहे. तर या तराफ्याला मी डोक्यावर घेऊन किंवा खांद्यावर घेऊन जिथे जायचे आहे तिथे का जाऊ नये ? तर तुम्हाला काय वाटते भिक्खुंनो, असे करणारा तो मनुष्य योग्य करीत आहे ? तेव्हा सर्वजण म्हणाले “नाही भन्ते”. त्या माणसाने काय केले पाहिजे की त्या तराफ्याच्या बाबतीत केले ते योग्य केले असे म्हणता येईल. जर पैलतीरावर गेलेल्या माणसाला असे वाटले हा तराफा मला फार उपकारी झाला आहे. याच्या साह्याने मी पलीकडील तीरावर आलो आहे. तरीही मी याला आता इथेच जागेवर ठेवून किंवा पाण्यावर सोडून मला पुढे जिथे जायचं आहे तिथे का जाऊ नये ? असे करणारा तो मनुष्य धम्माच्या उपदेशांचे योग्य पालन करणारा होईल. त्याच प्रमाणे भिक्खुंनो मी पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी तुम्हाला धम्माचा उपदेश केला आहे. त्याला पकडून ठेवण्यासाठी नाही. आता पलीकडच्या तीरावर उतरल्यावर लक्ष दिसत आहे. स्वप्रयत्न करा. विकारांवर विजय मिळवा. याची देही याची डोळा निर्वाण प्राप्त करा.
पण आपण काय केले ? धम्माला धारण न करता त्याचा काथ्याकूट करीत बसलो. बुद्धांनी हे सांगितले, ते सांगितले असे पुराव्यानिशी सादर करून स्वतःचे पांडित्य सिद्ध केले. अष्टांगिक मार्गाचे भरपूर विश्लेषण केले. पण स्वतःहून त्या मार्गावर चाललोच नाही. पाली भाषेतील गाथांचे अनुवाद केले. पण त्यातील अर्थाप्रमाणे अनुकरण केलेच नाही. धर्मांतर, स्वातंत्र्य, राजकारण, इतिहास, लेण्या, संस्कृती अशा अनेक विषयात गुरफटून गेलो. एवढा महान धम्म या जन्मात प्राप्त झाला, पण त्याचे औषध प्राशन केलेच नाही. नुसती औषधाची आणि ते बनविणाऱ्याची स्तुती करीत बसलो. तेव्हा आता तराफ्याप्रमाणेच जुन्या गोष्टी सोडून देणे क्रमप्राप्त राहील.
पदवी परीक्षेची तयारी करण्याची वेळ आली तरी पहिली-दुसरीच्या पुस्तकांना कवटाळणे योग्य राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हा धम्म आपल्याला मिळाला. त्यांच्याप्रती कृतज्ञ राहून धम्माची चिकित्सा न करता त्यात प्राविण्य मिळवून स्वतःचा उद्धार करणे हेच आता प्रत्येकाचे धेय्य असले पाहिजे. प्राप्त झालेल्या धम्मात नैपुण्यता कशी प्राप्त होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. धम्म चर्चेचा विषय नाही. तो धारण केला तरच दुःखमुक्तीच्या मार्गावरील अनेक टप्पे गाठत अंतिम लक्षापर्यंत जाता येईल.
( संदर्भ :- मज्जिम निकाय मधील अलगद्ददुपम सुत्त.)
संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)