बुद्ध तत्वज्ञान

‘प्रतित्यसमुत्पाद’ सिद्धांत हा तथागत बुद्धांनी लावलेला एक महान शोध

“जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि
जो धम्माला जाणतो तो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो.”
– तथागत बुद्ध

दु:ख, अनित्यता, अनात्मता आणि निर्वाण हे बुद्ध धम्माचे मूलभूत सिद्धांत आहेत. हे चारही सिद्धांत प्रतित्यसमुत्पादावर आधारित आहेत. त्यांचा उगम प्रतित्यसमुत्पादापासून झाला आहे. हा सिद्धांत इतका महत्वाचा आहे की, “जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो” असे तथागत बुद्ध म्हणतात. या सिद्धातांच्या आधारे तथागत बुद्धाने पुन्हा पुन्हा जन्म घेणे व पुन्हा पुन्हा मरणावस्था प्राप्त करणे अशा या संपुर्ण भवचक्राचा उलगडा केला आहे. जन्म आणि मरणाचा हा क्रम अनादिकाळापासून एखाद्या चक्राप्रमाणे अखंड गतीने चालत आलेला आहे. अशा या जन्म आणि मरणाच्या रहस्यावर तथागत बुद्धाने प्रतित्यसमुत्पाद या सिध्दांताच्या आधारे प्रकाश टाकून भवचक्राच्या प्रवृती व निवृतीच्या मुळाशी असलेल्या कारणाचे दिग्दर्शन केले आहे.

तथागत बुद्धांनी प्रतित्यसमुत्पाद म्हणजे काय ते ‘मझिमनिकायातील चूलसकुलदायिसुत्तात’ असे सांगितले –
ह्याच्या होण्यामुळे हे होत असते.
ह्याच्या न होण्यामुळे हे होत नसते.
ह्याचा उत्पन्न होण्यामुळे हे उत्पन्न होत असते.
ह्याचा निरोध केल्याने, ह्याचा निरोध होत असतो.’

पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थविर अश्वजित यांनी सारीपुत्तांना तथागत बुद्धांचा धम्म संक्षेपाने असा सांगितले –

‘जी दु:खे, ज्या गोष्टी (धम्म) कारणांपासून उत्पन्न होतात, त्यांची कारणे तथागतांनी सांगितली आहेत आणि त्यांचा निरोध कसा करावा हे ही त्यांनी सांगितले आहे. हेच महाश्रमणांचे मत आहे.’

यावरुन हे स्पष्ट होते की, अगदी सुरुवातीपासूनच तथागत बुद्धांच्या धम्माचा पाया प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतावर आधारलेला होता.

संयुक्‍त निकायात नमुद केल्याप्रमाणे तथागत बुद्ध भिक्खु आनंदाशी संवाद करीत असतांना ते म्हणाले की, ‘प्रतित्यसमुत्पाद हा सिध्दांत फार गंभीर आहे, गूढ आहे. या धम्माला योग्य प्रकारे न जाणल्यामुळे आणि न समजल्यामुळे प्रजा गुंता झालेल्य धाग्याच्या गुंडीसारखी, गाठी पडलेल्य दोरीसारखी आणि गोळा झालेल्या मुंजाच्या गवतासारखी होऊन, अपायात पडून दुर्गतीला प्राप्‍त होत आहे.’

महापधान सुत्तात तथागत बुद्ध म्हणतात की, ‘आसक्‍तीत पडलेल्या, आसक्‍तीत रममाण असलेल्या आणि आसक्‍तीत आनंद मानणार्‍या सामान्य लोकांसाठी हे कठीण आहे की कार्यकारणासंबंधी प्रतित्यसमुत्पादाला ते समजून घेतील.’

सर्वसामान्य लोक ईश्वर, देवदेवता, दैववाद, कर्मकांड, आत्मा इत्यादी संबंधीत मिथ्यादृष्टीत गूंतले होते. त्या प्रवाहाच्या विरोधात जाणारा प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत त्यांना समजेल की नाही याबाबत तथागत बुद्धांना शंका वाटत होती. परंतु महाकारुणिकांच्या असिम मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा या ब्रम्हविहाराच्या भावनेने त्यांना प्रवृत केले की जगातील काहीतरी लोकं हा धम्म समजू शकतील. त्यानंतरच त्यांनी आपल्या सिध्दांताची शिकवण जगाला देण्याचा निश्चय केला.

प्रतित्य म्हणजे प्रत्यय किंवा कारण आणि समुत्पाद म्हणजे उत्पत्ती. अर्थात प्रतित्यसमुत्पाद म्हणजे हेतूमुळे किंवा कारणामुळे कार्याची उत्पत्ती होणे. ह्याच्या उत्पन होण्यामुळे हे उत्पन होत असते. यालाच कार्यकारणभाव (Cause and effect) असेही म्हटले जाते. प्रतित्यसमुत्पादाला प्रत्ययाकार किंवा पच्चयाकार निदान असेही म्हणतात. त्याचा संबंध अनित्यता आणि अनात्मता यांचेशी आहे. कोणताही पदार्थ शाश्वत नाही. सर्व संस्कारीत पदार्थ अनित्य आहेत, क्षणैक आहेत आणि हेतुप्रत्ययजनित आहेत.

प्रतित्यसमुत्पादाला ‘मध्यमावर्ग’ असेही म्हणतात. बुद्ध धम्मात शाश्वत दृष्टी व उच्छेद दृष्टी यांना टोकाचे दोन मार्ग असे म्हटले आहे. महास्थविर बुद्धघोषांनी ‘प्रतीत्य’ शब्दात शाश्वत दृष्टी आणि ‘समुत्पाद’ शब्दात उच्छेदवादी दृष्टीचे खंडण केले आहे असे सांगून प्रतित्यसमुत्पाद मध्यममार्गाचे तत्वज्ञान सांगतो असे म्हटले आहे.

आचार्य नागार्जुन यांनी प्रतित्यसमुत्पादाला आणि शून्यता यांना एकच मानले आहे. “विग्रहव्यावर्तनी” मध्ये नागार्जुन म्हणतात की, ज्यांनी शून्यतेला जाणले आहे त्यांनी सर्व लौकिक आणि लोकोत्तर अर्थाला सुध्दा जाणले आहे. कारण ज्यांनी शून्यतेला जाणले आहे, त्याने प्रतित्यसमुत्पादाला जाणले आहे. त्याने चार आर्यसत्यालाही जाणले आहे.

तथागत बुद्धांनी प्रतित्यसमुत्पाद ह्या सिद्धांताचा शोध लाऊन मानवाच्या दु:खाच्या निर्मितीची प्रक्रिया अतिशय सोप्या शब्दात आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मांडली आहे. म्हणून त्यांचा प्रतित्यसमुत्पादाचा सिद्धांत हा एक अलौकीक शोध आहे. त्यावेळी जी समाजरचना होती, जी विचारधारा प्रचलित होती, त्या प्रवाहाच्या विरोधात प्रतित्यसमुत्पादा द्वारे त्यांनी आपल्या एका नवीन धम्माची आणी तत्वज्ञानाची प्रतिष्ठापना केली.

प्रतित्यसमुत्पाद हा सिद्धांत केवळ दु:खापुरताच मर्यादित नाही, तर तो विश्वातील सर्व गोष्टींना लागू पडतो.

याच सिध्दांताच्या आधारे तथागत बुद्धाने सृष्टीचा निर्माता म्हणून ईश्वराला नाकारले. तसेच ईश्वराच्या अस्तित्वाला व आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला सुध्दा नाकारले. कोणीही जग शून्यातून निर्माण करु शकत नाही व कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होत नाही तर ती कारणाने निर्माण होत असते. त्यामुळे सृष्टीचा निर्माता ईश्वर, देव आहे वगैरे सर्व कल्पना खोट्या आहेत. सर्व विश्व प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारणभावाच्या सिध्दांतावर आधारलेले आहे.

भारतीय संस्कृतीत ईश्वराचा व आत्म्याचा संबंध धर्माशी जोडला आहे. तथागत बुध्दाने मानवाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी ईश्वर आणि आत्मा यांचा धर्माशी जोडलेला संबंध नाकारला. वासेठ्ठ आणि भारद्वाज या ब्राम्हणाशी झालेल्या चर्चेत बुद्धाने ईश्वराविषयी त्यांचे मत स्पष्ट केले आहे. बुद्धांच्या मते या जगात खूनी, चोर, डाकू, लुटारु, व्यभिचारी, व्यसनी, फसवे, असे अनेक तर्‍हेचे लोक असतात. जर ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्‍तीमान आणि सर्वव्यापी आहे तर तो एकतर या सर्वामध्ये तोच विद्यमान आहे अथवा अशा अनिष्ट लोकांचा तो पुरस्कर्ता तरी आहे. असेही नसेल तर अशाप्रकारचा ईश्वर आंधळा तरी आहे. सृष्टी ही ईश्वरनिर्मित नसून ती उत्क्रांत झाली आहे असे त्यांचे ठाम मत होते. तथागत बुद्धांनी ईश्वराचे स्थान “सदाचार व नितीला” दिले आहे.

तथागत बुद्धाने पुनर्जन्माला अवतार म्हणून नाही तर पुनर्निमिर्ती म्हणून मानले. त्यांनी शरीराचे चार घटक म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू यांचे पुनर्जन्म मानले, आत्म्याचे नाही.

प्रतित्यसमुत्पाद सिद्धांतात तथागत बुद्धाने दु:खाचे उगम कसे होते व त्याचा निरोध कसा करता येईल याचा शोध घेतला. प्रतित्यसमुत्पादाचा शोध लावल्यामूळे सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्‍त झाले. ज्ञानप्राप्‍तीच्या रात्री पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रहरी भगवान बुद्धांनी प्रतित्यसमुत्पादाचाच विचार केला.

प्रतित्यसमुत्पाद हा बारा कड्‍याचा सिध्दांत आहे. ज्या प्रकारे एखाद्या चक्राला अनेक आरे असतात आणि ते चक्र आर्‍यासहित गोलाकार फिरत राहते. त्याचप्रमाणे हे भवचक्र बारा आर्‍यांचे बणले असून ते अखंडपणे फिरत राहते.

सिध्दांतानुसार अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरुप (मन आणि शरीर), नामरुपामुळे षडायतन (सहा ईंद्रीये), षडायतनामुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनेमुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान (चिकटून राहणे), उपादानामुळे भव (होणे), भवमुळे जाती (जन्म), जातीमुळे जरा (वार्धक्य), मरण, शोक उत्पन्न होतात. अशा तर्‍हेने अविद्येपासून ते जरा, मरण पर्यंत दु:खाचा उगम होणार्‍या बारा कड्यांना अनुलोम प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात. दुःखाचा उगम कसा होतो हे अनुलोम प्रतित्यसमुत्पादमध्ये सांगितले आहे.

तसेच अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो. संस्काराच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो. विज्ञानाच्या निरोधाने नामरुपाचा निरोध होतो. नामरुपाच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध होतो. स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा निरोध होतो. वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा निरोध होतो. तृष्णेच्या निरोधाने उपादानाचा निरोध होतो. उपादानाच्या निरोधाने भवाचा निरोध होतो. भवाच्या निरोधाने जातीचा निरोध होतो. जातीच्या निरोधाने जरा, मरण, शोक याचा निरोध होतो. याप्रमाणे दु:खाचा निरोध होतो. अशा तर्‍हेने अविद्येपासून ते जरा, मरण पर्यंत दुःखाचा निरोध करणार्‍या बारा कड्यांना प्रतिलोम प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात. दु:खाचा निरोध कसा होतो हे प्रतिलोम प्रतित्यसमुत्पादमध्ये सांगितले आहे.

दु:खाचे उगम कसे होते व त्याचा निरोध कसा होतो याची कारणमिमांसा प्रतित्यसमुत्पादाच्या सिद्धांतानुसार तथागत बुद्धाने याप्रमाणे समजावून सांगितला आहे.

प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत सांगतांना त्यांनी अविद्येपासून सुरुवात केली आहे. परंतु अविद्या हे दु:ख निर्मितीचे मूळ कारण आहे असे म्हणता येणार नाही. जगातील प्रत्येक गोष्टीचा उगम दुसर्‍या कोणत्या तरी समुत्पादाच्या गोष्टीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार जगात कोणतेच मूळ कारण असु शकत नाही, अविद्या म्हणजे जग जसे तसे न पाहणे, म्हणजेच दु:ख आर्यसत्याविषयी संपुर्ण ज्ञान नसणे. ज्याला आर्यसत्याविषयी संपुर्ण ज्ञान आहे. त्याच्याकडून संस्कार उत्पन्न होणार नाही, त्याच्यात तृष्णा उत्पन्न होणार नाही. म्हणजेच तो दु:खातून मुक्त होईल.

कोणत्याही गोष्टी प्रत्ययाशिवाय म्हणजे कारणाशिवाय होत नसतात. कारणामुळे जे कार्य होते ते आपल्या परीने दुस‍र्‍या कार्याचे कारण होत. आणि ते दुसरे कार्य आपल्या परीने तीस‍र्‍या कार्याचे कारण होते. अशा तर्‍हेने कार्यकारन भावाचे चक्र अव्याहतपणे चालू असते. वस्तुमात्रांतील परस्परसंबंध हे प्रतित्यसमुत्पादाचे मुळ स्वरुप आहे. कोणतीही वस्तु स्वयंसिद्ध नसते. तिचे अस्तित्व संबंधजन्य असते. यावरुन असे लक्षात येईल की, जगात कोणत्याही गोष्टीला पहिले कारण नसते. कारण प्रतित्यसमुत्पादाच्या सिद्धांतानुसार कोणतेही अस्तित्व हे त्याच्या कारणामुळे अस्तित्वात आलेले असते. शिवाय कार्याला एकच कारण असते असेही नाही, तर बहुतांश वेळेला अनेक कारणांच्यामुळे कार्य घडत असते. म्हणून प्रतित्यसमुत्पादाचे हे सिध्दांत नीट समजल्यावर असे लक्षात येईल की, जगात शून्यातून काहीच निर्माण होत नाही. त्यामुळे ईश्वराला शून्यातून जग निर्माण करणे शक्य नाही. प्रत्येक कार्य हे कारणावरच अवलंबून असल्यामुळे जगावर अधिकार चालविणार्‍या ईश्वराचे काहीच काम नाही. जर ईश्वर असेलच तर तोही कोणत्यातरी कारणामुळे उत्पन्न झाला असला पाहिजे. कारण तो स्वयंभू असणे शक्य नाही. कार्यकारण भावामुळे जगात चमत्काराला वाव नाही. म्हणून बुद्ध धम्मात ईश्वराला, त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला काहीच स्थान नाही. बुद्ध धम्मात ईश्वराला, त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला मानले जात नाही. ब्रम्ह हे विश्वनिर्मितीचे कारण असू शकत नाही. बी पासून झाड उत्पन्न होते. त्याचप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणांमुळे अस्तित्वात येत असतात. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रम्ह, आत्मा, देव असे कोणीही अस्तित्वात असू शकत नाही. आपण केलेल्या कृत्याचे बरे वाईट परिणाम घडत असतात. थोडक्यात म्हणजे सर्व विश्वच प्रतित्यसमुत्पादाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे.

बुद्ध धम्मात भवचक्र किंवा संसारचक्र, कर्म आणि पुनर्जन्म यांचा संबंध दु:ख या आर्यसत्याशी जोडला गेलेला आहे.