इतिहास

जगापुढे या प्राचीन बौद्ध विहाराचे स्थान प्रथमच उजेडात आले

तामिळनाडू राज्यातील कल्लाकरूची जिल्ह्यात एकांतात वसलेले उलगीयानल्लूर नावाचे गाव आहे. तेथे एक बुद्धमूर्ती सापडली आहे, असे ऐकिवात आले होते. त्या अनुषंगाने मागील वर्षी जानेवारीत त्या गावी गेलो व भरपूर फिरलो. पण कुठेच मूर्ती दिसली नाही. तिथल्या गावातील अनेकांना बुद्धमूर्ती कुठे आहे विचारले पण कुणालाच त्यासंबंधी माहिती नव्हती. सुदैवाने शेतात कामास जात असलेल्या एका महिलेला त्याबाबत विचारले असता ती स्वतः शेतातून दूरवर चालत बुद्धमूर्ती दाखविण्यास आली. तिथे खूप झाडीझुडपे वाढली होती. ती बाजूला सारली तेव्हा मंदस्मित करत असलेली पाषाणाची अप्रतिम बुद्धमूर्ती नजरेस पडली. आणि आम्हाला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.

ध्यानस्थ अवस्थेतील हे बुद्धशिल्प उजव्याबाजूस थोडे क्षतिग्रस्त झाले आहे. परंतु त्यामुळे त्याच्या सौंदर्यास बाधा येत नाही. जगापुढे हे शिल्प प्रथमच उजेडात येत आहे

ही मूर्ती चार फूट उंचीची असावी कारण तिचा अर्धा भाग जमिनीत होता. अजून चौकशी केल्यावर समजले की काही गावकऱ्यांनी मूर्ती लपविण्यासाठी केलेली ती एक युक्ती होती. शेतात जेव्हा प्रथम मूर्ती सापडली तेव्हा ती कोणाची आहे याबाबत गावकरी अनभिज्ञ होते. पण जेव्हा समजले की ती बुद्धमुर्ती आहे तेव्हा गावकऱ्यांनी त्यासाठी मंदिर बांधण्याचे ठरवले व तोपर्यंत मूर्ती दडवून ठेवण्याचे ठरविले. ही बुद्धमूर्ती ९-१० व्या शतकातील असावी असे वाटते.

या पडझड झालेल्या प्राचीन विहाराची डागडुजी झाल्यावर बुद्धमूर्ती तेथे विराजमान करणे अपेक्षित आहे.

या गावाच्या आजूबाजूस तपास केला असता एका ओसाड जागी पुरातन वास्तू असल्याचे दिसले. तेथील घुमट व स्तंभावरील कमलपुष्पे पाहिल्यावर तर खात्रीच झाली की ही वास्तू म्हणजे प्राचीनकाळचे विहार असावे व सापडलेली बुद्धमूर्ती तिथलीच असावी. तसेच तेथील एका उंचवट्यावर स्तूप देखील आढळून आला.

स्तंभावरील कमलपुष्पे हेच दर्शवित आहेत की ते प्राचीन बुद्ध विहार आहे.

जगापुढे या प्राचीन बौद्ध विहाराचे स्थान आता प्रथमच उजेडात आले आहे. लवकरच गावकरी विहाराची डागडुजी करतील आणि बुद्धमूर्ती तेथे विराजमान करतील अशी आशा बाळगून व बुद्धमूर्तीला वंदन करून मी तेथून जड अंत:करणाने माघारी फिरलो.

विहाराची अंतर्गत रचना अद्याप सुस्थितीत दिसत असली तरी जमीन चांगली करणे आवश्यक आहे. रंगरंगोटी, स्तंभ आणि छताची डागडुजी देखील आवश्यक आहे. एखादे भन्तेजी तेथे राहिल्यास लोकांना धम्माचे मार्गदर्शन होईल तसेच विहाराची देखभाल-दुरुस्ती होत राहील.

( योगी प्रबुद्ध झाना यांचे स्वगत – मनोगत )

सविस्तर माहिती साठी खालील लिंक वर जावे. https://www.wayofbodhi.org/buddhism-in-kallakurichi…/

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)