बुद्ध तत्वज्ञान

एक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा)

एकदा तथागत श्रावस्तीच्या जेतवणात असताना तथागताचा अनुयायी आनंद हा भिक्षाटनासाठी नगरीत गेला. अन्न ग्रहण करून आनंद शेजारच्या विहिरीवर गेला असता त्या ठिकाणी एक कन्या पाणी भरतांना दिसली व आनंदाने तिच्याकडे पिण्यास पाणी मागीतले. ती कन्या मात्र पाणी देण्यास नकार देत म्हणाली की, “मी अस्पृश्य आहे. तुम्हांला पाणी देऊ शकत नाही. परंतु आनंद म्हणाला, “मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी काहीही घेणे-देणे नाही.”

त्यानंतर त्या कन्येने आनंदाला पिण्यास पाणी वाढले. प्रकृतीने आनंदाला पाहिल्यानंतर तिला आनंद विषयी विशेष आकर्षण जाणवले व ती आनंदाच्या पाठोपाठ जेतवणात गेली. त्याचे नाव आनंद आहे हे पण तिला कळाले व तो तथागत बुद्धाचा अनुयायी आहे हे पण तिने जाणले. त्यानंतर ती घरी परतली व आई मातंगीला तिने जे घडले ते सर्व सांगितले. आनंदच्या प्रेमात पडलेली प्रकृती आईला म्हणाली की, “तू जर माझा विवाह करणार असशील तर मी फक्त आनंदशीच करणार. अन्यथा कोणाशीही विवाहबद्ध होणार नाही.”

मातंगी ने सर्व विचारपूस केली व परत येऊन ती आपल्या कन्येला म्हणाली की हा विवाह अशक्य आहे. कारण आनंद ने ब्रह्मचर्यव्रत स्वीकारले आहे. हे ऐकून प्रकृती अत्यंत दुःखी झाली. तिने अन्न त्याग केला. मातंगीला काय करावे सुचत नव्हते. शेवटी मातंगीने आनंदाला भोजनाचे निमंत्रण दिले. व मातंगीने आनंदाला कथन केले की, जर तुम्ही माझ्या कन्येशी विवाहबद्ध झाले नाहीत तर ती आत्मघात करेल. ती तुमच्यावर एवढी अनुरुक्त आहे.

आनंद उत्तरला मी असहाय आहे. मी ब्रह्मचर्य व्रत ग्रहण केले आहे. मी कोणत्याही स्त्री शी विवाहबद्ध होऊ शकत नाही. असे म्हणून आनंद जेतवणात गेला. जेतवणात तथागताजवळ जे घडले ते सर्व कथन केले. प्रकृती मात्र आनंदावर एवढी अनुरुक्त झाली होती की ती आनंदाचा पाठलाग करू लागली. पण आनंद तिला टाळू पाहत होता.

आनंद जिथे जाईल ती त्याच्या पाठीशी होती. शेवटी आनंदाने तथागतांजवळ कथन केले व तथागतांनी त्या कन्येला बोलावले व विचारले की तू आनंदाचे अनुगमन का करत आहे? प्रकृती उत्तरली की आनंदशीच विवाहबद्ध होण्याचा तिचा मानस आहे. तो ही अविवाहित आहे व मी ही अविवाहित आहे.

तथागतांनी सांगितले की आनंद हा एक भिक्खू आहे. त्याने या सर्व गोष्टींचा त्याग केला आहे. लोकहितासाठी तो भिक्खू बनला असून विवाहासारख्या गोष्टींत आता तो अडकणार नाही. प्रकृती उत्तरली की माझ्याकडे दोनच पर्याय आहेत. मृत्यू किंवा आनंदशी विवाह. माझ्याकरिता तिसरा पर्यायच नाही. आनंद शिवाय जगणे मला कठीण आहे.

तथगतांनी तिला जवळ बसवले. व विचारले की, “आनंदमधे तुला काय पसंत आहे?” तीने सांगितले की,”मी त्याच्या नासिकेवर अनुरुक्त आहे, मला त्याचे डोळा, कान, चेहरा आवडतो, त्याच्या दैहिक गतीविधीवर मी अनुरुक्त आहे.”

तथागतांनी अगदी शांत मुद्रेने त्या कन्येकडे पाहिले व वदले, “नयन हे अश्रुंचे आलय आहे, हे तुला माहीत आहे काय? नासिका घाणीचे आलय आहे, हे तुला माहीत आहे काय? मुख हे थुंकीचे आलय आहे, हे तुला माहिती आहे काय? कान हे मळाचे घर आहे, बाहेरून सुंदर दिसणारे शरीर हे मलमूत्राचे आगार आहे हे तुला माहीत आहे काय?

जेव्हा स्त्री-पुरुषांचा सहवास घडतो तेव्हा संतांनोपत्ती होते. परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यू आहे तेथे मृत्यू आहे तेथे दुःख आहेच, माझ्या प्रिये कन्ये, तू आनंदाशी विवाह करून तुला काय प्राप्त होणार आहे.”

प्रकृतीने तथागतांना विचारले की मला काय करावे लागेल? बुद्ध म्हणाले की तू त्याच्याशी मैत्री करू शकते. मैत्री सारखे प्रिय नाते या जगात इतर कोणतेही नाही. तू भिक्खु संघात प्रवेश करून आनंद सारखेच लोककल्याणाचा मार्ग अवलंबू शकते. याहून चांगले दुसरे सुख नाही. यासाठी तुला तुझ्या आईची आज्ञा घ्यावी लागेल. प्रकृतीला अतिशय आनंद झाला. व तिला तिची चूक लक्षात आली.

प्रकृती गंभीर झाली व तथागतांना वंदन करून ती म्हणाली, “अज्ञानवश मी आनंदाचे अनुगमन करीत होती. माझी चित्ती, प्रज्ञा विद्यमान आहे. मी अंध होते, दृष्टी हीन होते, मला नवीन दृष्टी लाभ झाला आहे. तथागतांनी मला ज्ञानोपदेश दिला. मी अज्ञाननिद्रेतून जागी झाली आहे.

विवाहाचा विचार निरर्थक ठरल्याने आईची आज्ञा घेऊन भिक्खू संघात प्रवेश हाच एकमेव मार्ग तिच्यासाठी उपलब्ध होता. तिला भिक्खू संघात प्रवेश मिळाला. तथागतांनी दिलेल्या धम्माची व विनयाची शिकवण घेऊन तिने सर्व आयुष्य भिक्खू संघाला समर्पित केले.

तिथेच गौतम बुद्धांनी सर्वांना मोलाचा संदेश दिला की “ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्या व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही तर, त्या व्यक्तीला नष्ट करणे म्हणजे विकृती! त्या व्यक्तीसोबत मंगलमैत्री करणे म्हणजे प्रकृती!!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *