इतिहास

बोधगया येथील महाबोधी विहारातील बुद्धमूर्तीचा इतिहास

बोधगयेच्या महाबोधी विहारातील भव्य आणि देखणी बुद्धमूर्ती अनेकांनी पाहिली असेल. जगातील अनेक देशातून बौद्धजन, यात्रेकरू व पर्यटक येथे येवून या बुद्धमूर्तीचे दर्शन घेऊन धन्य होतात. फुले वाहतात. बुद्धवंदना म्हणतात आणि जमल्यास तिथे फोटो सुद्धा काढून घेतात. अशी ही धीरगंभीर उठावदार बुद्धमूर्ती बोधगयेतील अन्य विहारातून आणून स्थापित केली आहे, हे अनेकांना ज्ञात नाही.

चक्रवर्ती सम्राट अशोक राजाने इ.स.पूर्व ३ ऱ्या शतकात बोधगयेला कोरीव लाकडांचा व विटांचा बांधकाम असलेला विहार उभारला. परंतु विहारात त्यावेळी बुद्ध पदकमल चिन्हे, धम्मचक्र व बोधिवृक्ष यांच्या प्रतिमा होत्या.बहरलेला बोधिवृक्ष तेथील विहाराच्या आवारात होता. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली तेथे वृक्षाखाली वज्रासन शिला उभारली होती. त्यानंतर पाचशे वर्षांनी विहार जीर्ण झाला असताना गुप्त राजाच्या राजवटीत ११ मीटर उंचीचे विटांचे कोरीव काम असलेले व पूर्व आणि उत्तर दिशेस द्वार असलेले सध्याचे मोठे विहार बांधले.

तेथे भेट दिलेल्या यात्रेकरूंनी लिहून ठेवलेल्या वर्णनानुसार तसेच सापडलेल्या शिलालेखानुसार सदर ठिकाणी सातशे वर्षे एक मोठी बुद्धमूर्ती होती असे निदर्शनास आले. परंतु ११ व्या शतकातील मुस्लिम आक्रमणा नंतर ती मूर्ती कुठे गेली याचा काहीही इतिहास ज्ञात होत नाही.

इ.स. १४१३ मध्ये आचार्य सारिपुत्त यांनी येथे बुद्धमूर्ती बसवण्यासाठी घेतलेली मोजमापे तिबेट येथे दिल्याचा उल्लेख आहे. परंतु त्यानंतर ती नवीन मूर्ती प्राप्त झाली किंवा नाही याचीही माहिती मिळत नाही. त्यानंतर जवळजवळ १९ व्या शतकापर्यंत महाबोधी विहाराची डागडुजी अधूनमधून म्यानमारमधील राजवटी तर्फे करण्यात आली.

१८११ मध्ये एक इंग्रज सर्वेअर फ्रान्सिस बुचनन येथे आला होता. तेव्हा त्याने जीर्ण अवस्थेतील हे विहार बघितले. तसेच मूर्तीच्या जागी विटांचे ओबड-धोबड बांधकाम केलेले त्यास आढळले होते.सन १८८० मध्ये ब्रिटिश सरकारने अत्यंत वाईट अवस्था असलेल्या या महाबोधी विहाराची दुरुस्ती करण्याचे ठरविले आणि त्या कामासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांचे सहाय्यक व इंजिनियर असलेले जोसेफ बेगलर यांची नियुक्ती करण्यात आली. सदर कामासाठी रु.२०,०००/- निधी सुद्धा देण्यात आला.

जोसेफ बेगलरने महाबोधी विहाराची दुरुस्ती तात्काळ सुरू केली. आतून बाहेरून जमिनीपासून घुमटापर्यंत उगवलेली झुडपे काढून, पडलेल्या चिरा बुजवून व साफसफाई करून बांधकाम मजबूत केले. तसेच बाहेरील आवार साफसफाई करून तेथील स्तुपांची डागडुजी केली. रंगरंगोटी केली. सर्व दुरुस्ती झाली तरी बेगलरला विहारात अपूर्णता जाणवत असल्याने त्याने बुद्धमूर्ती तेथे स्थापन करण्याचे ठरविले. पण मनाजोगी मूर्तीच मिळेना.

बोधगयेत पडझड झालेल्या अनेक ठिकाणी भेटी देऊन त्याने बुद्धमूर्त्या बघितल्या. पण काही छोट्या होत्या तर काही क्षतिग्रस्त झालेल्या होत्या. शेवटी त्याला एक काळ्या पाषाणातील मूर्ती मिळाली पण तिच्यावर चुन्याचा लेप दिला होता. त्याच्या कुशल कारागिरांनी काळजीपूर्वक तो खरवडून काढला. बेगलर याला ती मूर्ती पसंत पडली. आणि मग ही एक टनाची बुद्धमूर्ती स्वच्छ करून हळुवारपणे महाबोधी विहारात आणण्यात आली व स्वतःच्या देखरेखीखाली स्थानापन्न केली.

पाल राजवटीतील ही मूर्ती ९-१० शतकातील असून बोधगया येथे छिंदा नावाच्या कुटुंबाने त्यावेळी बांधलेल्या जुन्या बुद्ध विहारात मिळाली. ही काळ्या पाषाणातील भूमीस्पर्श मुद्रेतील मूर्ती दगडी चौथऱ्यावर एकसंघ स्थानापन्न असून चौथऱ्याच्या खालच्या भागावर सिंह आणि हत्ती यांच्या प्रतिमा आहेत. त्याच्या खालच्या पट्टीमध्ये भू-माता दाखविली असून तिच्या हातामध्ये पाचू- माणके – सुवर्णमुद्रा यांचे भरलेले पात्र दाखविलेले आहे. त्याखालील पट्टीमध्ये क्षती पोहोचलेल्या काही ओळी आहेत. त्यावरून स्पष्ट झाले की ही मूर्ती सामंत यांचा मुलगा व धर्मा यांचा नातू पूर्णभद्र याने दान दिलेली आहे. हे छिंदा कुटुंब बोधगया येथे १०-११ व्या शतकामध्ये तेथील मोठे जहागीरदार असावेत. परंतु पूर्णभद्राचे हे विहार कुठे होते हे आज पर्यंत कळलेले नाही.

बेगलरने सुद्धा हे विहार कुठे होते व मूर्ती कशी आणली याचा उल्लेख केलेला नाही. बुद्धमूर्ती स्थानापन्न करण्यात आल्यावर त्यावेळी हजर असलेल्या तिबेटी भिक्खूंनी व सिलोन मधील भिक्खूंनी बुद्ध वंदना घेऊन यथावत पूजा केली. पुर्ण मूर्तीला सोनेरी रंगाने सुशोभित करण्यात आले. तसेच मूर्तीचे मुखकमल तिबेटियन पद्धतीने सुशोभित केले गेले. जगातून चोहोबाजूंनी येणारे बौद्धजन, पर्यटक आणि यात्रेकरू ही बुद्ध मूर्ती पाहून धन्य होतात. आजही तिची प्रभावशाली प्रतिमा सर्वांच्या मनात कायमची कोरली आहे.

इंग्रजांच्या पुरातत्व आणि सर्वेक्षण विभागाने भारतातील बौद्ध धर्माबाबत केलेल्या संशोधनाचे कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे. इंजिनिअर आणि फोटोग्राफर असलेला जोसेफ बेगलर याचे तर सर्व बौद्ध बांधवांनी आभार मानले पाहिजेत. कारण त्याने भारतातील अनेक प्राचीन स्थळांचे डब्बा कॅमेऱ्याने फोटो काढून ती स्थळे जगापुढे आणली. सांची आणि महाबोधी या पवित्र बौद्ध स्थळांवरील स्तुपांची आणि विहारांची दुरुस्ती केली. ते जर केले नसते तर आज बौद्ध स्थळांचा भारतात मागमूसही राहिला नसता.

(संदर्भ : भन्ते एस धम्मीका, ऑस्ट्रेलिया यांचे पोष्ट वरून.)

-संजय सावंत,नवी मुंबई (लेखक -ज्येष्ट बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *