ब्लॉग

महार समाजातील ‘पैकाबाई’ ह्या सव्वाशे वर्षांपूर्वी भारतातील एकमेव महिला उद्योजिका होत्या

पैकाबाई कोण हा प्रश्न आपणास पडेल.ते स्वाभाविकच आहे.ती श्रीमत कशी बनली ते आपणास सांगायचे आहे.ती वयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठीच असेल.पण ती आंबेडकरांच्या कुटुंबातील नाही बरं का..! ती खोब्रागडे कुटुंबातील. तिचा कर्तबगार मुलगा, देवाजीबापूंचा जन्म १८९९ सालचा.आता हे देवाजीबापू कोण…?

मी गोष्ट सांगतोय पैकाबाईची. एका कर्तबगार स्त्रीची.महाराष्ट्रात चंद्रपूर नावाचा एक जिल्हा आहे. जिथे गोंड राजांचा किल्ला आहे. आताचा चंद्रपूर जिल्हा होण्यापूर्वी तो चांदा जिल्हा होता. नंतर चांदा जिल्ह्याचं विभाजन होऊन चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे तयार झाले.घनदाट वनराईने वेढलेले.जंगल इथले वैभव.चंद्रपूर जिल्ह्यात पोंभूर्णा नावाचा एक तालुका आहे.तिथल्या खोब्रागडे कुटुंबातील भिवाजी खोब्रागडे यांच्याशी तिचा विवाह झाला.त्या काळात मुलींचे लग्न कमी वयातच होत असत.

पैकाबाई आपल्या सासरी आंब्याच्या आंबराया ठेक्याने घ्यायची आणि आंबराईची राखण स्वतः करायची.ती दुसऱ्यांच्या दृष्टीने इतकी खतरनाक स्त्री होती की तिच्या आंबराईत जायची कोणी हिंमत करत नसत.तो काळ आठवा जेव्हा पराकोटीची अस्पृश्यता पाळली जात होती.अस्पृश्य समाज दारिद्रयात जिवंत राहण्यासाठी झुंजत होता.अठराविश्व दारिद्रय म्हणतात तो प्रकार.पैकाबाईने आंब्यांच्या व्यवसायात खूप पैसा कमवला.तिला फळ व्यवसायाचे व्यसन लागले म्हणा.ती फारच कष्टाळू होतीच पण निडर आणि निर्भय होती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित जनतेला आवाहन केले की खेडी सोडा.बस…झालं.भिवाजी खोब्रागडे आणि पैकाबाईने खेडं सोडलं.चंद्रपूरसारख्या शहरात आले.तेव्हाचं चंद्रपूर सर्वत्र लाल धूळ उडणारं.ते चंद्रपूरला आल्यानंतर दादमहल वार्डात राहायला लागले.चंद्रपूरात भिवाजीने पैकाबाईसोबत फळांचा व्यवसाय सुरू केला.आंब्याच्या आंबराया ठेक्याने घ्यायचं अंगवळणी पडलं होतं.त्या नवराबायकोने चंद्रपूर परिसरातील खेड्यातील पेरूचे बगीचे,आंबराया,चिंचेची झाडं,खरबूजाच्या (डांगरं),टरबूजाच्या वाड्या ठेक्याने घेऊन,फळं चंद्रपूरच्या बाजारात विकू लागले.चंद्रपूरला फळ व्यावसायिक म्हणून जम बसला.

त्यांना दोन मुले होती.पत्रू आणि गोविंदराव.चंद्रपूरात तिसरे अपत्य देवाजींचा जन्म झाला.भिवाजी याच काळात मरण पावले.व्यवसाय पूर्णतः पैकाबाईच्या हातात आला आणि फार मोठी जबाबदारीही आली.मुलं लहानच होते.पैकाबाई किंचितही खचली नाही.तिने आपल्या मुलांना चंद्रपूरच्या ज्युबिली शाळेत घातले.आणि स्वतः व्यवसाय करायला लागली.घर,मुलं,बाजारपेठेत विक्री आणि पेरूच्या बागांचे,टरबूज,खरबूजांच्या वाड्यांचे ठेके सुरूच होते.

मुलं शिकून मोठे होताच,पत्रू,गोविंदराव आणि देवाजी यांनी लाकडाच्या धंद्यात प्रवेश केला.प्रेरणा पैकाबाईची.तिन्ही भावांनी बल्लारपूर येथे फार मोठी जागा घेऊन लाकडाच्या धंद्यात जम बसवला.धंद्याचा व्याप वाढवला.पैकाबाई व मुले जंगलाचे ठेके घ्यायला लागले.तेव्हा ब्रिटीश सरकारचं राज्य होतं.चंद्रपूर जिल्ह्यात आरामशीन आणून साँ मिल चालविण्याचा व्यवसाय या कुटुंबाने केला.चांदा जिल्ह्यात आरामशीन आणणारे पहिले कुटुंब. तेव्हा चांद्यापासून सिरोंचापर्यंत त्यांनी हजारो मजुरांना कामाला लावले. संपूर्ण देशभरातून लाकडाचे व्यापारी चंद्रपुरास येत असत. विदर्भात व दूरवरपर्यंत लाकडाचे व्यापारी म्हणून पैकाबाईची मुलं प्रसिद्धीस आली. पत्रूजी,गोविंदराव आणि देवाजींनी आपला व्यवसाय आंध्रप्रदेशापर्यंत वाढवला.

विशेष म्हणजे आंध्रप्रदेशच्या राजमहेंद्री येथील राजवाडा भाड्याने घेतला.तिथे व्यवसाय सुरू केला. या राजवाड्यातील डेपोचे उद्घाटन पैकाबाईच्या हस्ते झाले.आपल्या आईमुळेच आपण व्यवसायात उन्नती केली म्हणून या कर्तबगार आईच्या कर्तबगार मुलांनी आईच्या हस्ते डेपोचे उद्घाटन केले.राजमहेंद्री राजवाड्यासारखी हुबेहूब इमारत देवाजींनी चंद्रपूरात उभी केली. देवाजींनी कापसाच्या व्यवसायात प्रवेश केला.या व्यवसायात त्यांनी अमाप पैसा कमावला. सोनेचांदीचा व्यवसाय केला. जमीन खरेदीविक्रीचा व्यवसाय केला. या कुटुंबाने व्यवसायात एवढं धन कमावलं की १९३० साली फोर्ड कपंनीची मोटार फक्त खोब्रागडे कुटुंबाकडे होती.

पैकाबाईची प्रेरणा बघा.देवाजीबापू डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत शिरले.महाडच्या यशस्वी लढ्यानंतर ३ नोव्हेंबर १९२६ ला अमरावतीला अंबादेवी सत्याग्रहाचे नेतृत्व केले.१३ आँक्टोबर १९३५ ला नाशिक जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेबांच्या ऐतिहासिक भाषणाला उपस्थित होते.बाबासाहेबांनी औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय उभारले तेव्हा उच्च दर्जाचे सागवानी लाकूड देवाजीबापूंनी पाठवले.

१९३७ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना झाली.प्रांतीय निवडणुका झाल्या.देवाजीबापू चंद्रपूर-ब्रह्मपुरी द्वीमतदार संघातून प्रचंड बहुमताने निवडून आले.याच देवाजीबापूंनी पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेवरून आपला मुलगा इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवला.आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीसाठी मुलगा दान मागिताच तो देवाजीबापूंनी दिला.

तो त्यांचा महान मुलगा म्हणजे भारतीय आंबेडकरी चळवळीचे महान नेते बँरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे.त्यांचे ऐतिहासिक कार्य मी काय सांगावे.तो खूप मोठा विषय आहे. पण एक सांगितले पाहिजे.आपल्या नुकत्याच जन्मून काही दिवस झालेल्या नातवाची जंगी मिरवणूक चंद्रपूरच्या नगीनाबाग येथून वाजत गाजत दादमहल वार्डापर्यंत नेली. त्या नातवाचे नाव होते भाऊराव. म्हणजे बँरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे.

पैकाबाईने उभारलेल्या व्यवसायाच्या फळांनी अख्खा समाज गोड केला. व्यवसाय करावा तर असा करावा.श्रीमंत कसे व्हावे तर असे व्हावे. आपल्यासोबत समाजालाही श्रीमंत करत जावे. मला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा या महान व्यावसायिक पैकाबाईला विनम्र अभिवादन करतो. कारण महार स्त्रीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून व्यवसाय उभारला.मुलांना उच्चविद्याविभूषित केले.पैकाबाई ही एवढा मोठा व्यवसाय उभारणारी, त्या काळातील भारतातील एकमेव महिला असावी….

डॉ. विद्याधर बन्सोड,
मराठी विभाग प्रमुख, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर