थायलंड देशात १९५७ साली योगायोगाने बुद्ध प्रतिमा मातीची नसून शुद्ध सोन्याची आहे हे जगासमोर आले. बुद्ध आपल्या मूळ स्वरूपात प्रगट झाल्याचा आनंद सर्वांना झाला… आपातकाळी बुद्धालाही मातीच्या आवरणाखाली झाकून रहावे लागले… प्रकटीकरणासाठी योग्य वेळेची वाट बघावी लागली. वाट पाहणे, चिंतन करणे अन् धीरगंभीर पाऊलवाटेने धम्मपथावर चालणे हा अनमोल संदेश ही कथा देत आहे. संयम आणि श्रद्धा या बौद्ध उपासनेच्या दोन बाजू आहेत.
थायलंड देशात थेरवादाचे बौद्ध उपासक आहेत. असे म्हटले जाते की, पूर्वी येथील जनता महायानाला मानणारी होती. अशोकाच्या काळात या ठिकाणी बौद्ध प्रचारक पाठविण्यात आले होते. परंतु भारतात बौद्ध धम्माच्या पतनानंतर सिंहली बौद्धांनी येथे प्रचार-प्रसाराला वाहून घेतले आणि येथे थेरवाद प्रमुख बौद्ध धम्म बनला.
थायलंडची राजधानी बँकाक शहरात अनेक स्तूप आणि बुद्ध प्रतिमा आहेत. हे स्तूप, विहारे सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची आहेत. येथील विहारांना वट असे म्हणतात. थायलंडमधील बुद्ध विहारे अतिशय सुंदर, स्वच्छ आणि दर्शनीय आहेत. या बुद्धविहारातून एका वेगळ्याच प्रकारची सुखद शांती आणि प्रसन्नता जाणवते. प्राचीन परंपरा असलेल्या चिन्नारथ येथील विहारात ध्यानस्थ बुद्धाचे मुखमंडल पाहण्याजोगे आहे. वट महाथत शहरात आयुतथया विहारात चौदाव्या शतकातील महाकाय बुद्धरुप अतिशय देखणे आहे. त्याशिवाय वट अरुण, वट चलांग, वट साकेत, वट फरा काओ, वट बेंजामाबोकीट, वट फरा थाई दोईतुंग प्रसिद्ध आहेत. साकेत वट बुद्धाच्या सुवर्ण प्रतिमेकरिता ओळखला जातो.

१७६७ दरम्यान राजा आयुथायाने तो उभारला. साकेत वट छोटा असला तरी सुवर्णजडित आहे त्यामुळे त्याची कीर्ती जगभर पसरली. विहारातील बुद्ध प्रेम, दया करुणा आणि शांतीचा संदेश देत आहे. त्याचे वजन ५.५ टन (५ हजार ५०० किलो) असून उंची ९.८ फूट आहे. शुद्ध सोन्याचा असल्यामुळे कुठूनही प्रकाश पडला तरी तो एखाद्या हिन्याप्रमाणे चकाकतो. सहा फूट काळ्या पाषाणाच्या चौथऱ्यावर स्थिरावला आहे. पूर्वी या बुद्ध प्रतिमेवर जाड चुन्याचा मुलामा असायचा त्यावर रंगरंगोटी होती. अशा प्रकारच्या मोठ्या बुद्ध प्रतिमा तयार करण्याची पद्धत थायलंडमध्ये आहे. त्याच्या संरक्षणासाठी खास अशी कोणतीही व्यवस्था नाही. २४ तास साकेत वटाची दारे खुली असतात जणू तो साकेत वटाचा राजा.
थायलंडला भेट देणारा प्रत्येक उपासक या स्वर्णजडित बुद्धासमोर मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतो. कारुणिक हृदयाने दीप प्रज्वलित केल्याशिवाय पुढचे पाऊल टाकत नाही. थायलंडच्या या वैभवशाली, ऐतिहासिक सुवर्ण बुद्ध प्रतिमेसंबंधी एक आख्यायिका आवर्जून सांगितली जाते. ती १९५७ वर्षापूर्वीची आहे. बँकाक शहरात मध्यभागात बुद्धाची एक मातीची प्रतिमा होती. तीही आकाराने मोठी होती. रस्ता रुंदीचे काम सुरू होते. वाटेत येणारी बांधकामे हटविण्यात सुरुवात झाली तशीच बुद्धाची प्रतिमा हटविण्याची वेळ आली.
प्रतिमा त्या जागेवरून हस्तांतरित करण्यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला. दुसरी जागा निश्चित करण्यात आली आणि त्या ठिकाणी प्रतिमा नेण्यासाठी क्रेन मागविण्यात आली क्रेन आली, ऑपरेटर कामगार व अधिकारी लगबगीने धावून आले प्रतिमा हलवण्यास सुरुवात झाली. क्रेन लावून प्रतिमा उचलण्यास सुरुवात करताच एका जणाच्या लक्षात आले, बुद्ध प्रतिमेला तडे जात आहेत. भेगा पडत असल्याचे प्रतिमा हलविण्याचे काम स्थगित करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी अचानक आकाशात ढगांनी गर्दी केली पावसाला सुरुवात झाली. परत धावपळ सुरू झाली. प्रतिमा ओली होऊ नये म्हणून तिला झाकून ठेवण्यात आले. एक दोन पहारेकरी वगळता सारे आपआपल्या घरी निघून गेले काही बौद्ध भिक्खूंना राहवले नाही. ते हळहळले. सायंकाळी उशिरा ते बुद्धप्रतिमेजवळ आले. एका प्रमुख बौद्ध भिक्खूने तिला झाकण्यासाठी टाकलेली ताडपत्री थोडीशी बाजूला केली आणि भेगाचे बारकाईने निरीक्षण केले. ज्या जागेवर प्रतिमेला भेग पडली होती तिथे आतल्या बाजूस काहीतरी चकाकत आहे असे त्याला दिसून आले आश्चर्यचकित झाला.
प्रतिमेचे मूळ स्वरुप जाणून घेण्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने आणखी एक दोन भेगांवर टॉर्चचा प्रकाश टाकला तेथेही त्याला काहीतरी चमकताना नजरी पडले. त्याची उत्सुकता वाढली. त्याने एक भेग मोठी करण्याचा प्रयत्न केला. हाताने जमले नाही तेव्हा त्याने छन्नी हातोडी आणली आणि भेग मोठी केली. मोठ्या भेगेतून पाहताच त्याच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. आतील भाग सोन्यासारखा दिप्तीमान होता. रात्री त्याने आणखी काही भिक्खूंना मदतीला बोलावले. सर्वांनी मिळून रात्रभर जागून त्या प्रतिमेवरचा मातीचा संपूर्ण थर काढून टाकला. त्यांच्यासमोर आता शुद्ध सोन्याचा बुद्ध होता.
मुळात सोन्याचाच होती. शेकडो वर्षांपूर्वी परकीय आक्रमकांनी थायलंडवर हल्ला केला होता. तत्कालीन भिक्खूंनी सुवर्ण चोरीला जाऊ नये म्हणून मातीचे थरच्या थर चढवून तिचे मातीच्या प्रतिमेत रूपांतर केले. शुद्ध सोने मातीच्या आवरणाखाली झाकले गेले. ही संरक्षणात्मक कारवाई करणारे बौद्ध भिक्खू युद्धात मारले गेले आणि सोन्याच्या प्रतिमेची वास्तविकता त्यांच्या मृत्यूबरोबरच नामशेष झाली.
१९५६ साली बुद्धाची २५०० वी जयंतीपर्व मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरी करण्यात आली. या महोत्सवात थायलंड देशात १९५७ साली योगायोगाने बुद्ध प्रतिमा मातीची नसून शुद्ध सोन्याची आहे हे जगासमोर आले. बुद्ध आपल्या मूळ स्वरुपात प्रगट झाल्याचा आनंद सर्वांना झाला… आपातकाळी बुद्धालाही मातीच्या आवरणाखाली झाकून राहावे लागले… प्रकटीकरणासाठी योग्य वेळेची वाट बघावी लागली . वाट पाहणे, चिंतन करणे अन् धीरगंभीर पाऊलवाटेने धम्मपथावर चालणे हा अनमोल संदेश ही कथा आहे . संयम आणि श्रद्धा या बौद्ध उपासनेच्या दोन बाजू आहेत हेच खरे.
मिलिंद मानकर, नागपूर