इतिहास

भारतीय पुरातत्व विभाग सुद्धा म्हणतेय तेरचे ‘त्रिविक्रम मंदिर’ हे बौद्धधर्मीयांचा चैत्य!

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे गाव ऐतिहासिक गाव म्हणून सर्वांना परिचित आहे. तेर गाव संत गोरोबाकाका यांचे गाव आहे. त्यासोबतच प्राचीन बौद्ध केंद्र असल्याचे असंख्य पुरातन वास्तू आणि अवशेष सापडले आहेत. विशेष म्हणजे पाचव्या शतकातील बौद्धधर्मीयांचा चैत्य आजही सुस्थितीत असून आज त्रिविक्रम मंदिर म्हणून ओळखले जाते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून या मंदिराचे/चैत्याचे जतन केले जाते. त्रिविक्रम मंदिरासमोर लावलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या माहिती फलकावर स्पष्टपणे हे मंदिर पूर्वी बौद्ध चैत्य असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच त्रिविक्रम मंदिरावर डेक्कन कॉलेजचे शा.भ.देव यांनी लहिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पुरात्तव व वस्तुसंग्रहालय विभागाकडून प्रकाशित झालेल्या ‘तेर’ या पुस्तकात खालील माहिती आहे.

सध्या त्रिविक्रमाचे म्हणजेच विष्णूचे मंदिर म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बौद्धधर्मीयांचा चैत्य होता हे कदाचित अनेकांना माहित नसेल. कालांतराने या चैत्याचे रुपांतर हिंदूच्या त्रिविक्रमाच्या देवळात करण्यात आले तरी, मूलतःयाची रचना चैत्यासारखीच आहे हे निर्विवाद आहे. गावाच्या मध्यभागी असलेली ही वास्तु पूर्णपणे विटांनी बांधलेली आहे. कदाचित त्रिविक्रमाचे मंदिर म्हणून हिंदूंनी त्याचा वापर केल्यामुळे ही वस्तू उध्वस्त न होता बरीचशी सुस्थितीत राहिली असावी. या सबंध मंदिराभोवती प्राकार बांधलेला असल्यानेही या मंदिराचा विध्वंस झाला नसावा.

सध्या या मंदिराची पातळी बरीच वर आहे. मंदिराच्या पायाची पातळी मातीने झाकली गेल्याने ती दिसत नाही आणि पायाचा भाग कशा प्रकारचा होता याची कल्पना येत नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून याचा आलेख अगदी साधा आहे. गर्भगृह आणि (नंतरच्या कालात बांधलेला) मंडप ही दोन प्रमुख अंगे या वास्तूची आहेत. यातील गर्भगृह हे पूर्णपणे बौद्ध चैत्यासारखे आहे. सुमारे ८ मीटर लांब आणि ४ मीटर रुंदीच्या या गर्भगृहाचा पृष्ठभाग अर्धवर्तुळाकृती असून, त्यावरील छप्पर हत्तीच्या पाठीच्या आकाराचे (दोन्ही बाजू बहिर्वक,निमुळत्या होत जाणाऱ्या आणि माथ्यावर कड असणाऱ्या) आहे.

हे सर्व बांधकाम ४३ × २३ × ७ १/२ सें.मी. या आकाराच्या विटांने केलेले असून, या विटा चिखलात पक्क्या बसविलेल्या आहेत. गर्भगृहाच्या भितीची जाडी सुमारे सव्वा मीटर असून सर्व बांधकाम अप्रतिम कौशल्याने केलेले आहे. गर्भगहाच्या समोर मंडप आहे, परंतु तो कालदृष्ट्या नंतरचा आहे. गर्भगडाचा दार्शनी भाग बौद्ध लेण्याच्या दर्शनी भागासारखा म्हणजे चैत्यगवाक्षासारखा आहे, गवाक्ष करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणान्या लाकडी कमानीची प्रतिकृती अत्यंत कौशल्याने निर्माण केलेली आहे. सर्व काम विटांचे असले तरी त्यावर आता चुन्याचा थर दिलेला आहे.

गर्भगृहाच्या गजपुष्ठाकृती छपराची बांधणीही थरातील विटांची बैठक प्रत्येक थरात आत सरकणारी (corbelling) करून कमान निर्माण होईल अशी केलेली आहे. दर्शनी भागाचे स्वरूप असे आहे की, ते पाहताच वेरुळच्या विश्वकर्मा लेण्याची आठवण यावी. गर्भगृहाचे प्रवेशद्वार अगदी लहान आहे. त्यामधून सध्या गर्भगृहात ठेवलेली भव्य त्रिविक्रमाची मूर्ती आत नेली गेली असेल असे शक्य वाटत नाही. कदाचित असेही असेल की, मूळचे प्रवेशद्वार सध्यापेक्षा मोठे आणि प्रशस्त होते.

दर्शनी भागावरील चैत्यगवाक्ष सोडल्यास, गर्भगृहाच्या बाहेरील भागावर साधा गोलाईचा थर (roll moulding) आणि अर्धस्तम्भ (pilasters) याशिवाय कोणतेही अलंकरण नाहीत. या अर्धस्तम्भांचा बांधणीच्या दृष्टीने उपयोग नसला तरी ते जण काही वास्तुच्या इमल्याला आधार देतात असा आभास निर्माण करतात. छपराची खालची कड भितीच्या माध्याच्या वर अधांतरी पुढे आल्यामळे सबंध चैत्य झोपडीच्या बांधणीची आठवण करून देतो. चैत्याच्या सबंध वास्तूवर चून्याचा गिलावा दिलेला आहे.

कझिन्सच्या मते हे चुनखडीचे लिपण नंतरच्या काळातले नसून, मूळचेच असावे. त्याचप्रमाणे चैत्यगृहाच्या बाहेरील भिंतीवर असलेला गोलाइचा थर (moulding), भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण विभागाचे संस्थपाक अलेक्झांडर कनिंघम यांच्या मते ‘गुप्त शैली प्रमाणे आहे. सबंध वास्तूची उंची जमिनीपासून १० मीटर आहे. गर्भगृहात प्रवेश केल्यावर कालभैरवाची दगडी मूर्ती पहावयास मिळते. या मूर्तीच्या मागे विटांची भिंत बांधलेली असून तिच्या एका बाजूस आत जाण्यासाठी दरवाजा आहे.

कझिन्सच्या मते कालभैरवाची मूर्ती मुसलमानी अमदानीत मुळ मुर्ती विध्वंसकापासून वाचविण्यासाठी ठेवलेली असावी. या मूर्तीच्या मागे असलेल्या भिंतीच्या दरवाजातून आत गेल्यावर त्रिविक्रमाची मृती दिसते. या भव्य मूर्तीच्या पूढे विष्णची मूर्ती आहे. दोन्ही मुर्ती काळ्या दगडाच्या आहेत. या दोन्हीही भग्नावस्थेत आहेत. नारायण-विष्णूची मूर्ती भंगलेली असली तरी अलंकारांनी मढवलेली असून तिच्या हातातील गदेवर गरुडाची मूर्ती आहे. विष्णूच्या मूर्तीचा पाय तुटलेले आहेत. सिंहासनाच्या दर्शनी परीवर कानडी लेख असून आहे. हा लेख पाके सुमारे १००० या काळातील असून त्यात कळचुर्य घराण्यातील महामंडळेश्वर जोगमरस याचा उल्लेख आहे.

त्रिविक्रमाची मूर्ती काळया दगडाची असून, तिचा वरचा भाग शाबूत आहे. चेहरा, नाक, डोळे आणि ओठ अत्यंत प्रमाणबद्ध असून डोक्यावर मोत्यांच्या झपक्यांनी खचलेला मुकुट आहे. कानात मोठ कर्णालंकार, गळयात तीन वेगवेगळ्या प्रकारचे हार, बाहूबंद आणि मनगटाबर रुद नक्षीदार कंकणे आहेत. त्रिविक्रमाचा उजवा पाय खाली सोडलेला असून, डावा बैठकीच्या कडेने उंचावलेला आहे. या उंचावलेल्या पायाखाली बळी राजा, बलिपत्नी इत्यादी मुर्ती आहेत. बौद्ध चैत्यगृहाचे नंतरच्या काळात वैष्णवीकरण झाल्याचे हे एक उदाहरण आहे.

या वैष्णव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी चैत्यगृहातील (कदाचित शहाबादी फरशीचा) स्तुप उखडून टाकला गेला असावा. विटांनी बांधलेल्या अशा चैत्याच्या फक्त दोन नामांकित वास्तू ज्ञात आहेत. त्यातील एक तेर येथील आणि दुसरी आन्ध्र प्रदेशातील चेझर्ला येथील. ही दोन्ही चैत्यगृहे समान मोजमापाची आणि अलंकरणाची असून, चेझर्ला येथील चैत्याची सविस्तर माहिती अलेक्झांडर री यांनी १८८८-८९ साली प्रसिद्ध केली. या दोन्ही बास्तूंची मोजमापे सारखी असून त्यांच्या बांधणीत वापरलेल्या विटाही सारख्याच आकाराच्या आहेत. आन्ध्र आणि महाराष्ट्रात सांस्कृतिक संपर्क बौद्ध धर्माच्या माध्यमातून प्राचीन ऐतिहासिक कालात निकटचे झाले असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

चेझर्लाप्रमाणेच, तेर येथील चैत्य पाहिल्यावर मद्रासजवळील महाबलिपुरमच्या खडकात कोरलेल्या रथांची आठवण येते. मात्र तेरची वास्तु अत्यंत साधी, शिल्प आणि अलंकरणविरहित आहे. त्रिविक्रम मंदिराच्या गर्भगृहासमोर मंडप आहे. हा मंडप चैत्यगहापेक्षा नंतरच्या काळातील असला तरी तो काळ दृष्ट्या फार नंतर बांधला गेला असे वाटत नाही. त्यावरील थर (moulding) आणि अर्धस्तंभ (pilasters) मुळ चैत्यगृहाप्रमाणेच असल्याने, हा पूर्वेस आणि उत्तरेस प्रवेशद्वारे असलेला मंडपही प्राचीन असावा. विटांनी आणि लाकडी खांबांच्या सहाय्याने बांधलेला हा मंडप चार ते सव्वाचार मीटर उंचीचा आहे. याचे छप्पर सपाट असून ते लाकडी खांबांनी तोलन धरलेले आहे. छपरांवर विटांचा थर असून मंडप बाहेरून चून्याने लिपलेला आहे. मंडपाच्या बाहेरील भागावर उठावात अर्धस्तंभ असून गोलाईच्या थराचे (roll moulding) अलंकरण आहे. ही दोन्ही वैशिष्टये चैत्यगृहाच्या बाहेरील भागावरही दिसून येतात.

मंडप आणि चैत्यगह या दोन भागांची काही वैशिष्टये लक्षात घेतली तर हे दोन्ही भाग एकाच वेळी सलग बांधले गेलेले नाहीत हे समजून येते. त्याचा दर्शनी भाग मंडपाच्या छतापेक्षा साडे चार मीटर उंच आहे. मंडपाच्या बांधणीत वापरलेल्या विटा चैत्यगृहाच्या बांधणीत वापरलेल्या विटांच्या मापाच्या नसून त्यातील काही लहान आकाराच्या तर आहेतच, पण त्यांची मांडणी रेखीव नाही. चैत्यगृहाची बांधणी आणि मंडपाची बांधणी सलग नाही. मंडपाचे खांब, चार मोठे आणि चार लहान, लाकडी असून ते, कझिन्सच्या मते, वास्तूच्या प्राचीनतेशी काहीसे विसंगत वाटतात. खांब चौरस असून त्यांच्या माथ्याला काही नक्षीदार अलंकरणात्मक थर (mouldings) आहेत. मंडपाच्या छताच्या मध्यभागी उत्कृष्ट कोरीव काम केलेले पुष्पवर्तुल (rosette) आहे.

तेरच्या चैत्यगृहावर, म्हणजेच आताच्या त्रिविक्रम मंदिरावर, नक्षीकाम केलेल्या दगडी फरशा बसविलेल्या असल्या पाहिजेत.अशा नक्षीकाम केलेल्या फरशा तेर येथील जैन मंदिरात पहावयास मिळतात. यातील काही बांधकामात बसविलेल्या आहेत. यापैकी एकीवर पुष्पवर्तुल, वेली, इत्यादींची उठावात नक्षी असून दुसरीवर चैत्यगवाक्ष आणि वेदिका (railing) ही बौद्ध शिल्पांशी निगडीत असलेली नक्षी आहे.

 

तेरच्या त्रिविक्रम मंदिराची, म्हणजे मूलतः बौद्ध चैत्यगृहाची, काही वैशिष्ट्ये लक्षात घेणे आवश्यक आहे. विटांनी बांधलेली बौद्ध चैत्यगृहे अत्यंत दुर्मिळ आहेत. तेर आणि चेझर्ला ही दोनच उदाहरणे आतापर्यंत माहीत आहेत.आणि केवळ यांच्यावरूनच बौद्धांची बांधीव-खडकात कोरलेली नव्हे ..चैत्यमंदिरे कशी असतील याची कल्पना येऊ शकते. त्यामुळे तेरच्या या वास्तूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या वास्तूचा काळ स्थापत्य वैशिष्ट्यानुसार पर्सी ब्राउन यांच्या मते इसवी सनाचे पाचवे शतक, कझिन्सच्या मते इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या नंतर निश्चितपणे नाही.

‘तेर’ मध्ये बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माचे अनेक पुरातन अवशेष मिळाले आहेत. तसेच तेर येथील बसस्थानकाच्या समोरच एक बौद्ध स्तूप सापडलेला आहे. गावात अनेक प्राचीन अवशेष आपल्याला पाहावयास मिळतील. एकदा ‘तेर’ला भेट देऊन आपला प्राचीन वारसा पाहू शकता.

माहिती संकलन – जयपाल गायकवाड, नांदेड
सर्व छायाचित्र – पंकज कहाळेकर, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *