इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग १

बुद्धगया (बोधगया) हे जगभरातील बौद्ध अथवा बुद्ध विचार मानणाऱ्यांसाठी एक अतिशय पवित्र श्रद्धा स्थळ आहे. याच ठिकाणी राजपुत्र सिद्दार्थाला अतिशय खडतर प्रयत्नांती ज्ञानप्राप्ती होऊन बुद्धत्त्व प्राप्त झाले होते. जगातील अंतिम सत्य हे चार अरिय सत्य असून अरिय अष्टांगिक मार्गाने मनुष्य निब्बाण पर्यंत पोहचू शकतो हे त्यांनी प्रतिपादले.

बुद्धांच्या काळी बुद्धगयेचे नाव “उरुवेला” होते व ते नेरंजना नदी किनारी वसले होते. आता या नदीचे नाव फाल्गु झाले आहे. साधारणतः इ. स. पूर्व २५० मध्ये सम्राट अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या ११व्या वर्षी येथे येऊन येथील “बोधीवृक्षाला” वंदन केले होते. या जागेचे पावित्र्य ओळखून अशोकाने येथे १,००,००० सोन्याच्या मोहरा दान देऊन विहार बांधण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर येथील बोधीवृक्षाचे योग्य जतन व्हावे यासाठी त्याच्या भोवती १० फूट उंच भिंत देखील बांधली.

भ.बुद्धांना ज्याठिकाणी ध्यान करून बुद्धत्त्व प्राप्त झाले त्या ठिकाणी शिल्पाकृतीने सजवलेले एक चकाकते वज्रासन बनवले. मुख्य विहाराच्या जवळ, पूर्वेकडे भ. बुद्धांनी ‘चंक्रमण’ केलेल्या ठिकाणी सम्राट अशोकाने २२ कोरीव दगड ठेवले व प्रत्येकावर धम्मलिपि मध्ये अ ते ट हा अक्षरे कोरून ठेवली. अशोकाने केलेल्या या सर्व कामाचा उल्लेख त्याच्या ८व्या शिलालेख, सांची स्तूप क्र.१ च्या तोरणावर आणि भारहूत स्तूपाच्या पट्टीवर पाहायला मिळतात.

अतुल भोसेकर (लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)

2 Replies to “महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग १

  1. 🙏🏻☸️🌷 नमो बुद्धाय जय भीम 🌷🌻🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *