इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग २

१८६३ मध्ये सर अलेक्सझांडर कनिंघम यांनी मेजर मिड यांना बुद्धगया येथे उत्खनन करण्यास सांगितले. नंतर १८८० मध्ये, बंगालचे लेफ्ट.गव्हर्नर सर ऍशली इडन यांनी बेग्लर यांना महाबोधी महाविहाराचे संवर्धन करण्यास सांगितले. उत्खननामध्ये अनेक प्राचीन शिल्प, नाणी, स्तंभ, शिलालेख सापडले जे महाबोधी महाविहाराच्या इतिहासावर प्रकाश टाकू शकले.

सिंहली भिक्खू बोधिरक्षित यांच्या शिलालेखांवरून कळते कि या महाविहाराला सर्वात प्राचीन भेट सिंहली भिक्खू चुल्ल तिस्स यांनी इ.स.पूर्व १०० मध्ये दिली होती.

वज्रासनाच्या पायथ्याशी सापडलेली सोन्याची व चांदीच्या नाण्यांवरून लक्षात येते कि इ.स.१४० मध्ये कनिष्काचा मुलगा राजा हुविष्का याने या महाविहाराचा जिर्णोद्धार केला. वज्रासनाच्या व भ.बुद्धांच्या मूर्तीच्या पायाशी इंडो स्किथियन शिलालेख याची खात्री देते.

इ.स. ३९९ – ४०९ दरम्यान फा हियान या चिनी बौद्ध भिक्खूने महाविहाराला दोनदा भेट दिल्याचा उल्लेख आहे. यात त्याने महाविहाराच्या परिसराचे तपशीलवार वर्णन केले आहे.

सोने आणि रत्नजडित वस्तू ज्या वज्रासनाच्या खाली सापडले असून ते सध्या ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवण्यात आले आहेत.

इ.स. ४थ्या शतकाच्या पूर्वार्धात, श्रीलंकेचा राजा मेघवन याचा भाऊ बुद्धगयेला आला असता, त्याला राहण्यासाठी ठिकाण सापडले नाही. आपल्या भावाला सांगितल्यावर, मेघवन ने बुद्धगया येथे मुख्य महाविहाराच्या पूर्वेला एक महाबोधी विहार बांधले जेथे सर्वांना प्रवेश होता. या विहाराच्या दारावर एक पितळी धातूपट्टी होती ज्यावर लिहिले होते, “प्रत्येकाला, कोणत्याही अटींशिवाय मदत करणे हे बुद्धांचे सर्वश्रेष्ठ विचार होय”. कालांतराने हे विहार एक महत्त्वाचे बौद्ध विद्यापीठ झाले ज्याचा शैक्षणिक स्तर नालंदा किंवा विक्रमशिला सारखा होता.

हुयान त्सांग ने याचे वर्णन करताना म्हटले आहे कि यात सहा मोठी विहारे, तीन मजली टेहळणी बुरुज व संपूर्ण विहाराला सुरक्षेसाठी चाळीस फूट उंच भिंत होती. आतमध्ये भ.बुद्धांची सोनं व चांदीची मूर्ती होती व ती रत्नजडित होती. त्याकाळी तेथे जवळपास १००० भिक्खूंचे वास्तव्य होते. याच विहारात जगप्रसिद्ध बौद्ध आचार्य बुद्धघोष यांनी श्रीलंकेला जाण्यापूर्वी “अठ्ठसालिनि” व “ज्ञानोदय” (जो आता नष्ट झालाय) लिहिला. चिं हुन, हुआन चाऊ, धर्मपाला (माध्यमकाचतुःसटिका चे लेखक) आणि रत्नवज्रा हे काही प्रसिद्ध भिक्खू याच विहारात होऊन गेले. येथे उत्खनन करताना, कनिंघम यांना या विहाराचा परिसर २००० फूट लांब व १००० फूट रुंद दिसला व त्याची भिंत ९ फूट जाड होती. हे महाबोधी विहार १३व्या शतकापर्यंत सुरु होते, नंतर ते लयाला गेले. आजही त्याचे उरले सुरले अवशेष पाहायला मिळतात.

अतुल भोसेकर (लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *